मैत्री निसर्गाशी

सुजाता आल्हाद लेले
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

विकासासाठी निसर्गाशी वैर धरले अन्‌ केरळमध्ये पूर आला. निसर्गाशी मैत्र केले तरच जगणे सुंदर होईल.

विकासासाठी निसर्गाशी वैर धरले अन्‌ केरळमध्ये पूर आला. निसर्गाशी मैत्र केले तरच जगणे सुंदर होईल.

उन्हाच्या तीव्रतेने कोमेजलेली वृष्टी वर्षा ऋतूला साद घालत असते. अधीर अधराने धरा पावसाचा प्रत्येक थेंब पिऊन तृप्त होते. अशावेळी पानांवरील थेंबांवर किरण उतरला, तर पान जणू पाचूसारखे चमकते. पिवळी फुले पुष्कराज, धवलशुभ्र फुले मोती अन्‌ लाल फुले माणिक भासतात. अलंकारांनी सजून येते सृष्टी. पावसाच्या पाण्याने तृप्त झालेली सरिता दुथडी भरून वाहते. ती सागराच्या ओढीने त्याच्या खाऱ्या पाण्यात स्वतःला झोकून देते. सागराशी एकरूप होत पुन्हा पावसाला साद देते. आकाशातील ग्रह, तारे यांची धरतीवरच्या सजीव-निर्जीवांबरोबर असलेली निसर्ग चक्राला बांधून ठेवणारी एक अतूट मैत्री मजसमोर येते. जंगलातील प्राणिमात्र ऊन, वारा, पाऊस यांच्यापासून संरक्षण मिळण्यासाठी वृक्षांशी मैत्री करतात. वृक्षांच्या हिरवाईवर अवलंबून असणारे शाकाहारी प्राणी, तर त्यांच्यावर अवलंबून असणारे मांसाहारी प्राणी, हे भूक सोडून इतर वेळी एकमेकांच्या वाटेला न जाणारे.. हे खरे मैत्र. सृष्टीचक्राचा तोल सांभाळायला पक्ष्यांचीही मदत होते याची जाणीव वृक्षांना असते. म्हणूनच झाडे त्यांचा निवारा बनण्यासाठी हात पसरून उभी असतात. घरट्यासाठी हक्काची जागा मिळतेच, पण फुलांतील मकरंद, फळे, झाडाझुडपावरील किडे-मकोडेही मिळतात. पण सर्वभक्षी माणूस या झाडाझुडपांवरही स्वार्थाची कुऱ्हाड चालवत आहे. त्या वेळी या झाडाना आपण तोडले जाण्याच्या दुःखापेक्षा घरट्यांचा मजबूत आधार, किलबिलीचा सुरक्षित आसरा गेल्याचे दुःख अधिक होत असेल. मैत्रीला साद आणि साथ देणारी वृक्ष संपदा ही खऱ्या मैत्रीची संपत्ती! विविध रंग आणि विविध सुवास बरोबर घेऊन वाऱ्यासंगे डोलणारी टवटवीत फुले-फळे खऱ्या मैत्रीचे साक्षीदार आहेत. हे मैत्र करायला निसर्गाचे मन हवे. ते डोंगर, ती दगड-माती यांच्यांशी कधी तरी हितगुज करून बघा, तिथला मृद्‌गंध सांगेल खऱ्या मैत्रीचा सुगंध!

गौरी-गणपतीचा उत्सव म्हणजे खरे तर निसर्गाचीच पूजा आहे. निसर्गातील सर्जनाची, सहवासाची पूजा आहे. म्हणूनच निसर्गाशी मैत्र केले तर जगणे अधिक सुंदर होईल!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sujata lele write article in muktapeeth