ढोल वाजे, ताशा वाजे!

सुजाता लेले
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

नदीकाठावर ढोल-ताशाचा सराव जोरात सुरू आहे. घराच्या ओढीने निघालेली वाहनेही रेंगाळत आहेत. ठेका तालबद्ध असेल तर थिरकणारी पावलेसुद्धा मंत्रमुग्ध होऊन नाचतात! हीच तर जादू आहे... ढोल-ताशाची!

नदीकाठावर ढोल-ताशाचा सराव जोरात सुरू आहे. घराच्या ओढीने निघालेली वाहनेही रेंगाळत आहेत. ठेका तालबद्ध असेल तर थिरकणारी पावलेसुद्धा मंत्रमुग्ध होऊन नाचतात! हीच तर जादू आहे... ढोल-ताशाची!

ढोल-ताशांचा सराव सुरू झाला की, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना गणेश स्थापनेचे वेध लागतात, तर महिला वर्गाची गौरी-पूजनाच्या तयारीला सुरुवात होते... मग आपोआपच कॅलेंडर बघितले जाते. जवळ-जवळ सर्व सोसायटी आणि गणेशोत्सव मंडळांमध्ये गणेशचतुर्थी ते अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवसांपर्यंत विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम होतात. मग त्यात नाटके, चित्रपट, एकपात्री प्रयोग, संगीत, नृत्य, इतर स्पर्धा यांचा समावेश असतो. पूर्वी सोसायटी नव्हत्या, पण वाडे-चाळींमध्ये हे कार्यक्रम व्हायचे. त्यावेळी मुख्यतः अंगण असे. त्यामुळे ऐसपैस जागा असायची. माझ्या माहेरी व सासरीही असे कार्यक्रम होत.

सासरी आल्यावर गणेशोत्सवाच्या वेळी मला एका वेगळ्याच आनंद सोहळ्यात सामील व्हायला मिळाले. तो आनंद म्हणजे ढोल-ताशाच्या गजरात शिस्तबद्ध नाचणे! पण काही वर्षापूर्वी रात्री दहानंतर संगीत व इतर आवाजाच्या कार्यक्रमावर बंदी आली आणि आम्ही सर्व जण या आनंदाला मुकलो. इतक्‍या वर्षांची सवय असल्यामुळे, वेळ बदलून एक-दोन वर्षे या सोहळ्याचे आयोजन केलेही होते; पण फारसा प्रतिसाद मिळाला नाही. एकतर वाड्यातले लोक दुसरीकडे राहायला गेले, शिवाय दिवसभरातील आपली कामे उरकून वाहनांच्या गर्दीतून घरी यायलाच साडेसहा-सात वाजतात. त्यानंतर ढोल-ताशाला येणार कधी? नेहमीची गर्दी आणि त्यातून गणेशोत्सवाचे देखावे पाहायची गर्दी. येणेच शक्‍य नसते. त्यामुळे बदललेल्या सात ते दहा या वेळेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आता मिरवणुकीमध्ये मुली व महिलाही सहभागी होतात. यामुळे खासगी ढोल-ताशांचे नाविन्यही संपले.

पूर्वी महिलांना मिरवणुकीमध्ये सामील व्हायला मिळायचे नाही. ढोल-ताशाचा ठेकाच असा आहे की, आपोआपच पावले थिरकतात. मग याला मुली-महिलांचा अपवाद कसा असेल? म्हणूनच महिला वर्गाला या तालावर नाचायला मिळावे म्हणून लेले वाड्यात खास महिलांसाठी ढोल-ताशाचे आयोजन केले जात असे. गौरी विसर्जनानंतर येणाऱ्या शनिवारी रात्री दहा ते बारा या वेळेत ढोल वाजायचे. माझे लग्न होण्याआधीपासून हा कार्यक्रम होत होता.

साधारणपणे त्या दिवशी रात्री साडेनऊ ते दहाला आम्ही वाड्यातील सर्व मंडळी, सर्वांचे नातलग, मित्र-मैत्रिणी हळूहळू "गोवर्धन'च्या मांडवामध्ये जमायला लागायचे. त्या आधी दोन-तीन दिवसांपासूनच माझे चुलत दीर रमणबाग किंवा मोतीबागेमधून ढोल-ताशा मिळवण्याच्या तयारीला लागलेले असायचे. त्या दिवशी सर्व जण जमेपर्यंत ढोल-ताशाचा सराव चालू व्हायचा. अशावेळी एवढ्या गोकुळात एखादे रांगणारे मूल प्रत्येक वर्षी असायचेंच! ठेका सुरू झाला रे झाला की, ते बाळ दुडूदुडू रांगत यायचे स्वतःभोवती गिरकी घ्यायचे. मग तिथे बसून स्वतः टाळ्यांचा ठेका द्यायचे. हे दृश्‍य बघून जमलेल्या मुली, "अय्या, कित्ती गोड!' असे म्हणत त्याच्याभोवती फेर धरू लागायच्या. त्यांच्या साथीला साधारणपणे सात-आठ वर्षापुढची मुले-मुली येत. ते नाचू लागत. मग बाकीचे टाळ्या वाजवायचे. एकदा ठेका बसला की माझा मोठा दीर सर्वांना ढोल-ताशाच्या ठेक्‍यावर शिस्तबद्ध नाचायच्या स्टेप्स समजावून सांगायचा. जेव्हा स्टेप बदलायची असेल त्यावेळी तो शिट्टी वाजवायचा. मग आम्ही स्टेप बदलायचो आणि इथेच बरेच जण चुकायचे. मग काय हशा सुरू. कोणी चुकवले असेल. यावर नाचता नाचताच चर्चा व्हायची. सर्वांनाच नाचता यायचे नाही. पण त्या गजरात पावले थिरकायचीच! ढोल-ताशाच्या तालावर तालबद्ध नाचत... कुठेही थिल्लरपणा नसायचा. प्रत्येक जण आपल्याला छानच नाचता येते अशा नादात तल्लीन होऊन नाचत. कोण चुकवतेय, कोणाला ठेक्‍यावर नाचता येत नाही, हे आम्हाला, बाहेर बसणारे प्रेक्षक खुणेने सांगायचे. कारण आवाज ऐकू येणे शक्‍यच नव्हते. हे प्रेक्षक म्हणजे आमच्यातले असायचे. कोणाचे गुडघे दुखत असायचे, कोणाला नाचणे आवडायचे नाही. अशी कारणे असणारे बाहेर बसून मजा लुटायचे! पण हे प्रेक्षक लहान लहान मुलांना सांभाळायचे. त्यामुळे लहान मुलांच्या आई-वडिलांना सामील होता यायचे. काहीही असो... कुणीही चेष्टा केली तरी रुसवे-फुगवे नसायचे. कारण नाचायला मिळते याचाच आनंद असे. कारण या ठेक्‍याची जादूच अशी काही और आहे की शब्दात वर्णन करणेच अशक्‍य आहे... अशा ठेक्‍यात मंगळागौरीचे खेळ कधी सुरू व्हायचे तेच कळायचे नाही. म्हणजे "गोफ विणू बाई गोफ विणू', गाठोडे किंवा कोंबडा, झिम्मा असे खेळा व्हायचे. थोड्या वेळाने नाचणारे स्त्री-पुरुष-मुली ढोल-ताशा वाजवत आणि वादक मंडळी नाचायची. हे थोडा वेळच. कारण भूमिका बदलेल्या असायच्या. त्यामुळे काय होत असेल हे तुम्ही जाणलेच असेल. मग बारा वाजता चुलतदीर कोरडी भेळ किंवा शेंगा आणि कॉफीची व्यवस्था करत असे.

आता हा आनंद ओसरला असला तरी... काही वेळा भूतकाळातील आठवणीमध्ये मन रमले की पुन्हा नवीन उत्साह येतो... ज्यांनी...ज्यांनी या सोहळ्याचा आनंद लुटला असेल ते या आठवणीमध्ये नक्कीच रमतील!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sujata lele write article in muktapeeth