प्रेमदिवस... एक संधि.. 

सुनेत्रा विजय जोशी 
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे... तुमच्या आजुबाजुला असणाऱ्या कित्येक व्यक्ती तुम्हाला कळत नकळत जगणे. सुसह्य होण्यासाठी मदत करत असतात त्यांनाही त्यांच्या आवडीप्रमाणे किंवा गरजेनुसार काही भेटवस्तू देऊन तुम्ही त्यांच्यावर असलेल्या प्रेमाची कबुली देऊ शकता.

आज प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. काही लोकांना वाटते की हे काय फॅड. काही जुनी वयस्कर मंडळी म्हणतात आम्ही काही असे कधी सांगितले नाही, पण आमचे संसार झालेच ना चांगले. पण मला खात्री आहे की आजही आजी किंवा आजोबांनी जर माझे तुझ्यावर प्रेम आहे हे सांगितले तर आजी नवपरिणीता सारख्याच लाजतील आणि आजोबा नवयुवकासारखे खुश होतील.

खरे तर रोजच्या धकाधकीच्या जीवनात रूक्ष नोकरीधंदा करताना एकमेकांची विचारपुस देखील करायला वेळ नसतो. आणि रोज कुणी मला तू किती आवडतेस किंवा आवडतोस असे. सांगतही नाही. मग एखादा दिवस ठरवुन हे केले तर काय हरकत आहे? दिवाळी कशी आपण पाच दिवस साजरी करतो, तसेच हे रोझ डे, चाॅकलेट डे  समजायचे. बदलत्या काळाच्या काही गोष्टी स्विकारल्याशिवाय त्या चांगल्या किंवा वाईट ठरवायचे कशाला? या प्रेमदिवसाला नावे ठेवण्याऐवजी तो आनंदाने साजरा करायला काय हरकत आहे? 

आता प्रेम व्यक्त करायचे म्हणजे त्या व्यक्तीला काय आवडेल याचाही विचार व्हावा. गुलाबाचे फुल हे प्रेमाचे प्रतिक मानले जाते. तसेच चाॅकलेट हे गोड आणि नैराश्य घालवणारे असल्याने 
फ्रेश करणारे म्हणुन सगळे प्रेम व्यक्त करण्यासाठी त्याचा आधार घेतात. तुम्ही वेगळे काही आवडणारे पण देऊ शकता. त्या त्या व्यक्तीच्या वयानुसार किंवा आवडीनुसार तसेच नात्यानुसार. 

प्रेम काही फक्त प्रियकर प्रेयसी यांचेच नसते तर पती-पत्नीचे अथवा शुध्द मैत्रीचे, भाऊ-बहिणीचे किंवा अगदी आई-वडील यांचेवरचे पण असु शकते. आईला किंवा वडीलांना घट्ट मिठी मारून तुम्ही मला खुप आवडता असे सांगुन तरी बघा. त्यांना तर आनंद होईलच पण तुम्हाला पण सकारात्मक उर्जा जाणवेल. त्यासाठी काही गिफ्टची देखील गरज नाही. जुने ते सगळे सोने नसते आणि नवीन ते सगळे पितळ नसते. काही जुन्या प्रथा चांगल्या तशाच नवीन पण आहेत. 

फक्त त्या गोष्टीचा अतिरेक नको. कुठलीही गोष्ट प्रमाणात छान वाटते. प्रेम हे प्रत्येक नात्यात असतेच. आपण गृहीत धरतो पण सांगीतले तर ऐकणारा खुश होतोच होतो. आपण कुणाला तरी आवडतो ही भावनाच माणसाला जगण्यासाठी हवीहवीशी असते. 

आपल्याला कोण कशासाठी आवडेल याचा काही नियम नाही. पण एक मात्र खरे प्रेमात जबरदस्ती नसावी. तुमचे ज्या व्यक्तीवर प्रेम असेल त्या व्यक्तीला तुम्ही आवडत असालच असे नाही किंवा आवडता पण तुम्हाला अपेक्षित असलेल्या नात्याने नसेल तर त्याचा सहज स्विकार व्हावा. 

मौनाने सारे साधते असे नाही तर ते बोलुन दाखवायला हवे. 
तरच ते या हृदयीचे त्या हृदयी कळेल. अन्यथा मनातले मनात राहुन दोघेही दुःखी राहतील. तेव्हा हा प्रेमदिवस आवडत्या माणसासवे नक्की आपआपल्या पध्दतीने साजरा करा आणि आयुष्य सुखकर करा. एक तरी दिवस हवाच प्रेमासाठी. म्हटलेच आहे ना क्षण एक पुरे प्रेमाचा... 

आणि शेवटी खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे... तुमच्या आजुबाजुला असणाऱ्या कित्येक व्यक्ती तुम्हाला कळत नकळत जगणे. सुसह्य होण्यासाठी मदत करत असतात त्यांनाही त्यांच्या आवडीप्रमाणे किंवा गरजेनुसार काही भेटवस्तू देऊन तुम्ही त्यांच्यावर असलेल्या प्रेमाची कबुली देऊ शकता.  

तेव्हा प्रेम प्रकट करा. प्रेमाचा स्विकार करा. आणि त्या क्षणाला जागुन आयुष्य भर प्रेमात जगा.
शेवटी एवढेच म्हणेन 

"सारे काही क्षणभंगुर आहे
या नश्वर जगात एक प्रेम सत्य.
प्रेम व्यक्त करण्यासाठी
आजचा प्रेमदिवस फक्त निमित्त." 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sunetra Vijay Joshi article