नात्यांना बांधणारी चिंधी... 

सुनेत्रा विजय जोशी
सोमवार, 18 डिसेंबर 2017

प्रत्येक नात्याला प्रेमाच्या चिंधीने बांधुन तर बघा. जन्मभर ते नाते सुखात आनंद वाढवायला आणि दुःखात डोळे पुसायला नक्कीच तुमच्या सोबत असेल....

लहानपणी कुणाच्या तोंडुन ऐकल ते आठवत नाही, पण बहुतेक आईकडुनच असाव कारण ती नेहमीच सहज बोलता बोलता अस काही सांगत असते. दागिन्यांसाठी सांभाळावी चिंधी तीच दागिन्यांना बांधी. अशी काहीशी ती म्हण. 

मी विचारले, पण हे कसे? तर पुर्वी काही आतासारखे लॉकर वगैरे नव्हते तेव्हा एका कापडात दागिने ठेवायचे व त्या कपड्याला एका चिंधीने बांधायचे मग ती पुरचुंडी कुठल्या तरी ट्रंकेत ठेवायची पध्दत होती.. ती चिंधी नीट बांधली तर दागिने एकत्र नीट राहतील, नाही तर एक कानातले इकडे तर दुसरे दुसरीकडे अस व्हायचे. 

आज इतक्‍या वर्षांनी मला वाटत आहे ही नाती हळूहळू संपत चाललीत. बहुतेक प्रेमाची चिंधी नीट बांधल्या न गेल्याने संपत तर नसतील ना? कारण बघा ना, भाऊबहीण, जावा-जावा, नणंदा भावजया इतकेच काय तर मुले आणि आईवडील सुद्धा. कुठे काय बरे चुकत असावे? आता भावाच्या नात्याला जपायचे तर त्याच्या प्राणप्रियेला जपायला हवे. तसेच बहिणीला जपायचे म्हणजे तिच्या नवऱ्याला पण प्रेमाच्या चिंधीने बांधायला हवे. आईवडिलांना पण वेळेनुसार मान द्यायला हवा. निदान अपमान होणार नाही, इतकी काळजी तरी घेतली जावी. नाही पटल्या काही गोष्टी तरी ऐकुन सोडुन द्यावे. उलट उत्तर करण्यापेक्षा ते बरे. मित्रमैत्रिणींना आपण आहे तसे स्विकारतो. मग नातेवाईकांना का नाही? मला कळतयं हे म्हणणे जितके सोपे आहे, तितके वागणे सोपे नक्कीच नाही. पण एखादे पाऊल उचलुन बघायला काय हरकत आहे. पुर्वी आठवुन बघा भाऊबीजेला बहीण ओवाळायची, तेव्हा तबकात वाहिनीसाठी ब्लाऊज पिस असायचाच ना. आजकाल रिटर्न गिफ्ट हा देखिल तसलाच प्रकार आहे. अपेक्षा नसते पण प्रेमाच्या बदल्यात प्रेम हवेच ना. एकतर्फी कुठलीच गोष्ट टिकत नाही. नात्यांचेही तसेच असते. साधे वाणसामान आणायचे तरी पुडीला दोरा असतोच बांधायला. नाहीतर घरापर्यंत आत असलेला पदार्थ जाणार कसा? तो रस्त्यावर सांडुन जाईल. तसेच प्रत्येक नात्याला प्रेमाच्या चिंधीने बांधुन तर बघा. जन्मभर ते नाते सुखात आनंद वाढवायला आणि दुःखात डोळे पुसायला नक्कीच तुमच्या सोबत असेल...... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sunetra Vijay Joshi article