#WomensDay2019 महिला दिन चिरायु होवो... 

#WomensDay2019 महिला दिन चिरायु होवो... 

नेमेचि येतो मग पावसाळा प्रमाणे नवीन वर्षाची सुरवात होते तसा आठ मार्च येतो. घराघरात शाळा कॉलेजात आॅफीस मध्ये प्रत्येक गावाशहरात अगदी खेडोपाडी पण महिला दिन साजरा होतो आणि महिलांचे दीनवाणे जगणे नवीन वेष्टनात गुंडाळून साजरे होते. आम्ही महिला अगदी खुश होऊन जातो. दुसरा दिवस उजाडला की परत तेच जुने नेसुन आपल्या बाईपणाला सामोरे जातो. 

आता स्त्रिया. शिकल्या नोकरदार झाल्या काही अगदी उच्च पदावर पण पोहोचल्या. पण प्रमाण अजुनही पुरुषांच्या तुलनेत कमी आहे. कारण आजही आपली म्हणजे पुरुषांची तर आहेच पण आम्हा महिलांची देखिल घरातली सगळी जबाबदारी स्त्रिची असते अशी मानसिकता आहे. थोडा फार बदल होतोय पण खुप अल्प प्रमाणात. 

आमची एका ग्रुपवर नुकतीच लेखन करण्यासंदर्भात चर्चा झाली. त्यात जवळपास नव्वद टक्के स्त्रियांचे वेळ मिळत नाही यावर एकमत झाले. आधी नोकरी किंवा शिक्षण सुद्धा घर सांभाळून करायचे, मग त्यात एखादा छंद किंवा कला जोपासायची त्याची साधना करायची तर वेळ तरी हवा ना. 
त्यातही आपण म्हणतो आवड असली की सवड मिळते. ते खरेही आहे, पण त्यामुळे भरीव काम नाही होऊ शकत. थोडेफार होईल त्यावर समाधान मानावे लागते.

पुरूष जसे घरादाराची पर्वा न करता कामात झोकुन देतात तसे स्त्रियांना नाही करता येत. त्यासाठी पाठीमागे भक्कम सपोर्ट सिस्टीम नसते. नसते उद्योग कुणी सांगीतले आहे ते नीट सांभाळा असे घरातल्या किंवा नात्यागोत्याच्या आजुबाजूला असणाऱ्या स्त्रियाच म्हणतात. पुरुषांची गोष्ट सोडाच. 
प्रत्येक गोष्टीत पुरुषांच्या डोक्यावर खापर फोडण्यात अर्थ नाही. 

आपण स्त्रियाच आधी एकमेकींचे पाय ओढतो. दुषणे देतो. मग पुरुषांना हातात आयते रसरसलेले कोलीत मिळतेच की. मुलगा वाईट वागत असेल तर त्याला खडसावण्या ऐवजी आई सुनेला दोष देते. माझा मुलगा चांगला होता हो पण हीच्याच नादाने बिघडला. त्याला तसे वागायचे असते पण मग तुम्ही त्याला दोष न देता सुनेला देता म्हटल्यावर तो कसेही वागायला मोकळा. त्यामुळे आधी बाईने बाईची मदत केली तर पुरूषांना मदतीच्या निमित्ताने पुढे येऊन मग गैरफायदा घेण्याचे प्रमाण कितीतरी कमी होईल यात शंका नाही.

मान्य आहे स्त्री जन्मतःच देहाने नाजुक आहे. त्यामुळे तिला पुरुषाचा आधार हा संरक्षण करण्यासाठी लागतोच. पण त्यांनीही त्याचा गैरफायदा घेऊ नये. सगळ्या स्त्रिया चांगल्या असे नाही तर सगळे पुरुष पण वाईट नसतातच. आपले वडील भाऊ नवरा मुले हे पण पुरुष आहेतच की. तेव्हा सगळ्या पुरुषांना सरसकट दोष देऊन उपयोग नाही. एकमेकींना आधार द्या. आपण कुणाला तरी आधार देतो तेव्हा आपल्याला देखील तो मिळतोच. 
खुप बायका त्यांना नोकरी करणे झेपत नाही गरजही नाही तरी नोकरी करतात त्याचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे घरात सन्मान न मिळणे. गृहित धरल्या जाणे. जेव्हा गर्भात स्त्री अंकुर खुडण्याचा निर्णय होतो तेव्हा ती का नाही प्रतिकार करत? तिच्या संमतिशिवाय हे होत नाही. आजही बहुतांश स्त्रियांना मुलगा हवाच असतो. आपणच म्हणतो मुलगा मुलगी सारखेच मग आपणच हा आग्रह कशासाठी धरतो? आधी स्वतः मानसिकता बदला आणि मग समाजाकडून किंवा पुरुषांकडून तशी अपेक्षा करा. 

आज या महिला दिनी माझ्या मनात उमटलेल्या भावना माझ्याच कवितेत. 

आजच्या दिनी... 
काय सांगु काय आले माझ्या मनी
आजच्या या महिला दिनी. कुठे जन्माआधीच तिला ठेचतात
कुठे देव्हाऱ्यात ठेवुन पुजतात
काय स्थान समजावे तिचे मग यातुनी... 
आजही ना सुरक्षित ती घरीदारी
आजही छळ होतो तिचा वेगळ्या परी
स्त्रीच शत्रु होते स्त्रीच्या जीवनी.... 

जाण येईल का पुरुषांना संस्कृतीची
बीज फळण्या लागते साथ धरतीची
तिच्या वाचुन होईना नवनिर्मितीची लावणी... 
सोडविण्यास यातुन तिला येणार नाही कुणी
तिचे तिलाच मुक्त व्हायचे आहे यातुनी
स्वतःसोबत समाजाचीही मानसिकता बदलुनी... 

एका चाकाने चालेना रथ संसाराचा
भार पेलण्यास लागे दुसरा हात आधाराचा
दोघांचीही महती सारखीच घ्यावे हे समजुनी.. . 
आजच्या महिला दिनी... 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com