वाट पाहे माऊडीची

सुनील गाडगीळ
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

ती अचानक समोर आली. भुकेली. अन्नाची व मायेचीही भुकेली. तिची-माझी दोस्ती जमली आणि अचानक ती निघून गेली. मी वाट पाहतोय.

ती अचानक समोर आली. भुकेली. अन्नाची व मायेचीही भुकेली. तिची-माझी दोस्ती जमली आणि अचानक ती निघून गेली. मी वाट पाहतोय.

मी सकाळी ब्रेकफास्ट म्हणून उकडलेली अंडी घेऊन दुकानात जातो. त्यातील फक्त पांढरा बलक खाऊन पिवळा भाग कावळ्यांना देत होतो. एक दिवस असाच पिवळा भाग कावळ्यांना घालत असताना अचानक ते मांजर आले. कावळ्यांना हाकलून त्याने त्या अंड्यांचा फडशा पाडला. मी त्या धीट मांजराकडे जरा रागानेच बघितले. काळ्या पांढऱ्या रंगाचे. असेल तीन एक महिन्यांचे. नीट खायला न मिळाल्याने कृश दिसत होते. तेही करुण नजरेने माझ्याकडे बघत होते. कावळ्यांना हाकलून देताना त्याच्यात आलेला आक्रमकपणा आता अजिबात दिसत नव्हता. मला त्याची कीव आली. मी सुक्‌ सुक्‌ करत त्याला बोलावले, तसे ते चार पावले पुढे आले. त्याचा उजवा कान आधी कुणाबरोबर कधीतरी झालेल्या मारामारीत फाटला होता. मी जवळ जाऊन हात लावायचा प्रयत्न केला तेव्हा ते दूर पळाले. पण एक-दोन महिन्यांत ते चांगलेच माणसाळले. माणसांबद्दलची भीती हळूहळू कमी होत होती. माऊडीला आता मी हात लावू शकत होतो. तिलाही असे लाड करून घेणे आवडू लागले होते. हळूहळू ती दुकानात आत येऊन माझ्या टेबलाच्या खाली बिनदिक्कत बसू लागली. मी तिचा खुराक बदलला. चहा, पोहे, खिचडी ती आवडीने खाऊ लागली.

सकाळी व संध्याकाळी ती आजूबाजूच्या परिसरात घुटमळत असायची. मी दिसलो किंवा दाराचा आवाज ऐकला की जेथे असेल तेथून दुडक्‍या चालीत पळत यायची. त्या ठरलेल्या वेळा सोडून तिला बोलवायचे असेल तर नुसते सुक सुक केले तरी ती धावत यायची. पायांना आपले अंग घासत, लाडी गोडी करण्याचा प्रयत्न करायची. माझे बोलणे तिला कळू लागले होते. "चल' म्हटले की मागोमाग यायची. "बाहेर जा' म्हटले की निमूटपणे जायची. कधी कधी ती शेजारच्या बंगल्याच्या गराजच्या छतावर बसलेली असायची. वरूनच मला बघून म्याव म्याव ओरडायची. "ये ये' असे म्हटले की गराजवरून शेजारील भिंतीवर एका झेपेत उतरून ती धावत यायची. डोळ्यांचे पारणे फिटवणारी "ग्रेस' त्या उडीत असायची.

तिने तिच्याकरिता जिन्याखाली एक जागा शोधून काढली होती. ती कायम तेथेच पहुडलेले असायची. माझी चाहूल लागली की आळोखे पिळोखे देत, शरीराची कमान करत ती त्या खोबणीतून बाहेर येऊन माझ्या पायाशी बसायची. तिच्या डोळ्यांत, देहबोलीत तिला झालेला आनंद स्पष्ट दिसायचा. एरवी कायम आळसावलेल्या स्थितीत असणारी ती अचानक अतिशय चपळ होऊ शकते हे एक दोन प्रसंगात मला दिसून आले. एकदा एक अनोळखी मांजर तिच्या "प्रदेशात' आल्यावर त्याने त्याच्यावर घेतलेली झेप, तसेच एकदा आम्ही उभे असताना एक मोठा कुत्रा तेथे येऊन टपकला. तो गुरगुरत माऊडीवर धावला. त्या वेळेस विद्युल्लतेच्या वेगाने तिने समोरील झाडावर उडी मारून क्षणात त्याचा शेंडा कधी गाठला हे मला समजलेच नाही.
तिची आणखीन एक विशेषतः म्हणजे तिला पाण्याची प्रचंड नावड होती. पाण्याची बाटली दिसली की ती बावरून जायची. जर बाटलीचे झाकण उघडून बाटली हलवली की ती लांब पळून जायची. मी मध्ये चार दिवस गावाला गेलो होतो. तेथेही मला तिची आठवण यायचीच. मी परत आल्यावर बाहेर जाऊन तिला हाक मारली. त्याबरोबर, भिंतीवरून उडी मारून वेगाने माझ्याजवळ येऊन पायाला बिलगली. डोळ्यांमधील भाव जुना मित्र बऱ्याच दिवसांनी भेटलेल्या आनंदाचे होते. असेच एकेदिवशी तिला भेटून मी घरी गेलो. दुसऱ्या दिवशी सुटी होती. त्या नंतरच्या दिवशी येऊन तिला हाका मारल्या, डबा वाजवला. चाहूल लागताच धावत येणारी माऊडी त्या दिवशी आलीच नाही. मी आणलेली अंडी तशीच पडून राहिली. मी मनात म्हणालो, "गेली असेल हुंदडायला. येईल थोड्या वेळाने. दुपार गेली, संध्याकाळ गेली, तरी ती आली नाही. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकून गेली. ....आज माऊडी बेपत्ता होऊन तीन महिने झाले. सकाळ- संध्याकाळी मी वेड्यासारखा बाहेर जाऊन तिला हाका मारतो. आजूबाजूला कुठे दिसते का बघतो. पण ती गेली ती गेलीच. का गेली? कुठे गेली? नवीन चांगली उबदार जागा मिळाली असेल का? जोडीदार मिळाल्यामुळे ती दुसरीकडे गेली असेल का? तिला एखादा अपघात तर झालेला नसेल ना?

मांजराला नऊ जन्म असतात, असे म्हणतात... त्यावर विश्वास ठेवून, असे वाटते, की ती जिवंत असेल तर एक ना एक दिवस नक्की परत येईल आणि म्याव म्याव अशी साद घालून माझ्या पायाला बिलगेल ... त्या दिवसाची मी मनापासून वाट पाहाण्याचे ठरविले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sunil gadgil write article in muktapeeth