अखेरपावेतो झुंज

सुनील फणसळकर
शनिवार, 6 जानेवारी 2018

विदुला उत्तम ज्युडो खेळाडू होती. तिने अनेक राष्ट्रीय ज्युडो स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावली होती. तिच्यापेक्षा जास्त ताकद असलेल्या व्यक्तीला ती लीलया पाडत असे. असाच खेळ तिला चार वर्षे कर्करोगाशी खेळावा लागला.

विदुला उत्तम ज्युडो खेळाडू होती. तिने अनेक राष्ट्रीय ज्युडो स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावली होती. तिच्यापेक्षा जास्त ताकद असलेल्या व्यक्तीला ती लीलया पाडत असे. असाच खेळ तिला चार वर्षे कर्करोगाशी खेळावा लागला.

नातवाचे बारसे थाटात झाले. मुलगी आदिती विशाखापट्टणला तिच्या घरी गेली. सगळे आनंदात होतो. त्याच महिन्यात शेवटच्या आठवड्यात विदुलाचा कर्करोगाशी सामना सुरू झाला, पंधरा महिने कठोर उपचार घेतल्यानंतर एप्रिल 2015 मध्ये तिचा कर्करोग आता बरा झाला, असे डॉक्‍टरांनी सांगितले; परंतु वर्षभराने पुन्हा कर्करोग उद्भवला. अधिक जोराने; पण ती हरायला सहजी तयार नव्हती. पुढचे दीड वर्ष या आजाराने तिला वारंवार पाडण्याचा प्रयत्न केला; पण प्रत्येक वेळी ती जिद्दीने उभी राहिली. जून 2016 मध्ये तिने "न्यू इंडिया अश्‍युरन्स'मधून निवृत्ती स्वीकारली. त्यानंतर वर्षभर तिची प्रकृती ढासळत असतानाही आम्ही भरपूर फिरलो. जयपूर, जबलपूर, इंदूर, कानपूर, लखनौ अशा विविध ठिकाणी सहलीला गेलो. ताडोबाच्या जंगलात राहून आलो. महाबळेश्‍वर, पाचगणीला तर बरेच वेळा गेलो. नरसोबावाडीला माझ्याबरोबर हट्टाने आली. शारीरिक त्रास तिला प्रचंड होता; परंतु तरीही ती प्रवासात त्रास विसरून आनंद घेत असे. माझ्याबरोबर ती पुरंदरचा किल्ला जिद्दीने चढून गेली होती. ईशान्य भारतात दहा दिवसांच्या सहलीला ती उत्साहाने आली. सर्व प्रेक्षणीय जागा बघितल्या. शॉपिंग आनंदाने केले.

आजाराने आता चांगलाच जोर धरला होता. हाडांमध्ये, फुफ्फुसात, शरीरभर तो पसरला होता. आता तिच्या शारीरिक हालचालींवर मर्यादा येऊ लागल्या. बराचसा वेळ झोपेत जाऊ लागला; पण उरलेल्या वेळात जिद्दीने व हट्टाने घरात ती फिरण्याचा प्रयत्न करत असे. बाहेर फिरायला येण्यासाठी उत्सुक असे. 17 ऑगस्टला तिचा अठ्ठावन्नवा वाढदिवस तिने मैत्रिणींना बोलावून केक कापून साजरा केला. मुलीला बाळंतपणासाठी डिंकाचे लाडू स्वतः बनवून पाठवले. माझा वाढदिवस कॉलेजमधील मित्रांबरोबर कॉफी पिऊन साजरा केला. कष्टाने, तरीही उत्साहाने आमच्या बरोबर हॉटेलमध्ये जेवायला आली. हास्य क्‍लबला दोन दिवस गेली. दिवाळीचा आकाशकंदील आणायला माझ्याबरोबर आली. दरम्यान दुसरा नातू झाला म्हणून रिक्षामधून एकटीने जाऊन परिचितांना आनंदाचे पेढे देऊन आली. दोन्ही नातवंडांशी दोन महिने खेळली. विदुलाने चित्रपटगृहात जाऊन बघितलेला शेवटचा चित्रपट म्हणजे "टॉयलेट'. तिने मिळवलेली राष्ट्रीय स्पर्धांमधील पारितोषिके, मानचिन्हे आणि त्या वेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबरोबर असलेले त्यांच्या ज्युडो संघाचे छायाचित्र पाहिल्यावर अनेक परिचितांनाही आश्‍चर्य वाटायचे. विदुलाचे खेळातील प्रावीण्य, तिचे ज्युडोमधील यश त्यांना माहीत नसायचे. तिने कधीही स्वतःचे गुणगान कुणापाशी गायिले नव्हते. तिचे खेळाडू म्हणून असलेले मोठेपण आता परिचितांनाही कळू लागले.

आता तिचा त्रास आणखीनच वाढला. आजाराच्या मुळांनी मेंदूत शिरकाव केला होता. तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. मृत्यू हळूहळू पाश आवळत जात होता. तिलाही कळत होते. अटळती गोष्ट तिने स्वीकारली होती. त्याही परिस्थितीत आयुष्यात आनंद कसा निर्माण होऊ शकतो, याचा वस्तूपाठ ती देत होती. ते बारा दिवस विदुला सगळ्यांना आनंद वाटत होती. आधुनिक वेदनाशामक औषधांमुळे तिचे ते दिवस कमी त्रासाचे झाले होते. तिच्या बालपणीच्या, शाळेतील मैत्रिणी तिला भेटायला वारंवार आल्या. त्याचा तिला किती आनंद होत असे. नवीन उत्साह तिच्यात निर्माण झाला होता. तिची वृद्ध आई तिला भेटायला आली. भेटायला आलेल्यां सर्वांचा हात घट्ट दाबून तिने निरोप घेतला. जणू तीच सर्वांना धीर देत होती.

या संपूर्ण कालावधीमध्ये विदुलाने कधीही तिला किती त्रास होतो आहे, याबद्दल तक्रार केली नाही. नाकातोंडातून अन्न, पाणी व हवा यासाठी नळ्या असतानाही विदुला माझा हात हातात धरून कधी उठून बसव म्हणायची, तर कधी झोपव म्हणायची. मला जाऊ नको म्हणून आग्रह करायची; पण "मी जाऊन येतो' म्हणालो, तर "लवकर या' म्हणून परवानगी द्यायची. आपल्यामुळे कुणाला त्रास होऊ नये यासाठी अखेरपावेतो काळजी घेत होती.

आता तिला श्‍वास घेताना होणारा त्रास वाढत गेला. ती बेशुद्धावस्थेत गेली; परंतु लवकरच ती शुद्धीवर आली. समोरच्या खेळाडूची ताकद खूप होती आणि विदुला क्षीण झाली होती. तरीही ती इतक्‍या सहज हार मानायला तयार नव्हती. आता समोरून सर्व जोर लागला होता. आता फेरी होणार नव्हती. विदुलाची पाठ टेकल्याशिवाय खेळ थांबणार नव्हता. तिने ते शांत मनाने स्वीकारले होते. त्यादिवशीही गप्पा करून दुपारी ती झोपली. शांत झोपली. पुन्हा न उठण्यासाठी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sunil phansalkar write article in muktapeeth