सूर निरागस हो!

सूर निरागस हो!

एका अवचित क्षणी जाग येते. चांदण्यांची दुलई दूर सारून आपण बाहेर गार वारा अंगावर घेत असतो, त्या वेळी स्वरपहाट उमलू लागलेली असते. ही निरागस सुरातील पाखरगाणी आपल्याला मुग्ध करतात.

भल्या पहाटे कोकीळ स्वरांनी जाग आली. कुहुऽ कुहुऽ
अहाहा!! किती मुग्ध स्वर! केवढी विलक्षण स्वर लकेर!
चैत्रातली पहाट होती ती. पश्‍चिमेकडून येणारा गार वारा, सगळीकडे भरून राहिलेली निरव शांतता अन्‌ भूलोकीच्या गंधर्वानं लावलेला सप्तसूर. कुहूऽ कुहूऽ
बाल्कनीचे दार उघडून सरळ बाहेर आले. पहाटेच्या गार वाऱ्यासोबत गर्द पहाटगंध नाकात शिरला. खोलवर श्वास घेऊन तो गंध आत आत भरून घेतला. बाहेर अजूनही काळोखाचे साम्राज्य! एक एक नक्षत्राचा दिवा अजूनही आभाळात तेवणारा. चमचमणाऱ्या ताऱ्यांचा प्रकाश आभाळाची निळाई पिऊन आभाळभर पसरलेला. अन्‌ त्या शीतल चंदेरी प्रकाशाआडून उमलू पाहणारं पहाट-सौंदर्य. अंधुकसं. धूसर! माणसाची चाहूल नसलेली अस्पर्श कोरी करकरीत पहाट. सगळंच सौंदर्य हे अनिमिष नेत्रांनी बघायचं नसतं, तर मनाच्या गाभाऱ्यातून झिरपत थेट मनाच्या डोळ्यांनी सुद्धा अनुभवायचं असतं, याची ती एक सुंदर प्रचीती!

कुहुऽ कुहुऽ. कोकिळेनं पुन्हा सूर छेडायला सुरवात केली. त्या निरव शांततेत फक्त एकमेव स्वर्गीय सूर! सारा आसमंत व्यापून टाकणारा. झाडाच्या पानापानांतून झिरपत अवकाशात मिसळून जाणारा. कणाकणाला स्वरमयी करणारा. केवढी विलक्षण जादू असते स्वरात! कोणत्याही वाद्याशिवाय तना-मनाला गारुड घालणारा तो अलौकिक सूर! ज्यानं हा स्वर कोकिळेच्या कंठाला अर्पण केला त्या जगनियंत्याला श्रद्धेनं नतमस्तक झाले. स्वरांचा मागोवा त्या धूसर प्रकाशात डोळ्यांनी घेणं शक्‍यच नव्हतं. पण कानांनी तो अचूक घेतला. काही क्षण स्वर थांबला. बराच वेळ फक्त शांतता, नि:शब्द. कितीतरी वेळ फक्त शांततेचा नाद. आणि पुन्हा कुहुऽ कुहुऽ. पुन्हा तोच स्वरभास. क्षणभर शांतता. स्वर अन्‌ नि:शब्दतेचा जणू लपंडाव सुरू राहिलेला. दूरवरून तसाच एक कोकीळ स्वर ... जवळच्या कोकिळा स्वराला उत्कट प्रतिसाद देत आसमंतात घुमला. इकडून आणि पलीकडून कोकीळस्वरांची काही वेळ जुगलबंदी रंगली. पुन्हा काही वेळ निरव शांतता.

अचानक काही वेळानं समोरच्या आंब्याच्या पर्णराशीतून भारद्वाजाचा घन गंभीर हुंकार जवळून ऐकायला आला. ऐटदार भारदस्त हुंकार त्या शांततेला चिरत थांबत थांबत पुन्हा पुन्हा त्या निरवतेत दमदार घुमत राहिला. खर्जातला सूर जणू तो भारद्वाज लावत होता. मग कुठूनतरी जवळूनच दबक्‍या आवाजात बुलबुल पक्ष्यांची कलरव चिवचिवली. बराच वेळ फक्त ती चिवचिव. अखंड अन्‌ अविरत. कोणताच सूर नाही फक्त बुलबुलची ती कलरव... त्या हलक्‍या चिवचिवाटानं कितीतरी वेळ आसमंतात भरून राहिलेली निःशब्दता क्षणभर ढवळून निघाली. निःशब्दतेला जाग यावी इतका हलका स्वरतरंग.

मनात एक रम्य काव्य उमलत राहिलं. समीप असलेल्या सख्याच्या; केवळ श्वासानं सुद्धा चांदणपहाट जागी होईल की काय, अशी प्रणयी कुजबुज त्या बुलबुलच्या गळ्यातून उतरत राहिलेली. त्या अविरत नादानं पहाट जागी झाली तर! त्या कलरवाला छेदत एक सुरेल पण उनाड शीळ कानावर आली. नक्कीच हा दयाळ पक्षी! शीळ इतकी दमदार होती की कुणाही तरुणीचं हृदय घायाळ व्हावं, आणि त्या शिळेसोबतच चर्रर्र ... चकचक ... मैनेचा खट्याळ स्वर मागून आला आणि मग हळूहळू असंख्य सुरांचा मेळाच सुरू झाला. स्वरांच्या मैफलीत एक एक गायक हजेरी लावत राहिला अन्‌ स्वरमैफल फुलत गेली. कुठेही माणसाची चाहूल नाही. पायरव नाही. जमली होती निसर्गातल्या अनभिषिक्त तानसेनांची स्वरमैफल! वयात येऊ लागलेल्या पहाटेला जणू या तानसेनांनी मुग्ध स्वरांचा नजराणा बहाल केला होता. असंख्य स्वरांची रुणुझुणु पैंजण लेऊन पहाट गुलाल उधळत पूर्वेकडून हलक्‍या पावलानं येत होती. नादमय चालीनं. कितीतरी वेळ हे स्वर-सौंदर्य कानांनी मुक्त अनुभवत मी बाल्कनीत उभी होते.

काळोखाचा पडदा हळूहळू दूर सरकताना तारकाही मंद मंद होत राहिल्या. चारी दिशा उमलायला सुरवात झालेली. पूर्व दिशा क्षितिजावर रक्त लाल रंगात हळूहळू उजळत होती. पक्ष्यांची एक चित्रलिपी किलबिलाट करत आभाळात प्रकटली आणि डोक्‍यावरून दूर जात नाहीशी झाली. त्या पाठोपाठ असंख्य पाखरांच्या लाटाच एका मागून एक आभाळात उमटत राहिल्या. त्या लाटांवर स्वार होता एक लोभस नाद. पहाटेलाही इतका अनवट नाद असतो!

थोड्याच वेळात माणसांचा दिवस सुरू होईल. पण हे स्वरांचं मुग्ध स्वर-सौंदर्य! चित्तवृत्ती प्रसन्न करणारं! ते दिवसभर असेच गारुड बनून राहील. खोल खोल अंतर्मनात.
"काढ सखे, गळ्यातले
तुझे चांदण्यांचे हात
क्षितिजाच्या पलीकडे
उभे दिवसाचे दूत'
या रसरसलेल्या ओळी कुसुमाग्रजांना सुचल्या असतील तेव्हाही अशीच भारावलेली स्वरपहाट पूर्वेच्या कोनाड्यात उमलत असेल!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com