कमावती... गमावती...

सुप्रिया धडफळ-उपाध्ये
बुधवार, 23 जानेवारी 2019

सुशिक्षित कमावत्या मुली आर्थिक विषयाबाबत अशिक्षित का राहतात? कमावत्या मुली गमावत्या का होतात?

सुशिक्षित कमावत्या मुली आर्थिक विषयाबाबत अशिक्षित का राहतात? कमावत्या मुली गमावत्या का होतात?

मैत्रीण नवीन घरात गेलेली. दोघेही आयटीमध्ये. नवीन घर बघायला म्हणून आम्हा मैत्रिणींचे गेट-टुगेदर ठरवले होते. कौतुकाने सांगत होती, आधीपासूनच राजने "इंटेरिअर डेकॉरेटर' ठरवला होता. राज कामानिमित्त सारख्या "फॉरेन टुर्स' करतो, परदेशातून सगळे शो पीस जमवले आहेत. टेरेस गार्डनमध्ये आर्टिफिशीअल लॉन बसवली आहे. आम्ही ऐकत होतो. एक मैत्रीण बॅंकर असल्यामुळे तिने सहजच विचारले, ""लोन कोणाच्या नावावर केले आहे?'' याला उत्तर "राजच्या' असे आले. पण लोनविषयक बाकीच्या कोणत्याच प्रश्‍नाला उत्तर तिच्याकडे नव्हते. तिला त्याबद्दल माहितीच नव्हती. फ्लॅटही नवऱ्याच्या एकट्याच्याच नावावर होता. ""अगं, मला त्यातले काही समजत नाही. मी साधे माझे इन्कम टॅक्‍स रिटर्नही भरत नाही.'' हे ऐकून आम्हाला सगळ्यांना धक्काच बसला! ""मला राजने सांगितले आहे, तू फक्त खर्च कर. पैशांची चिंता करू नकोस. माझी सॅलरी झाली की मी सगळे पैसे राजच्या अकाउंटवर ट्रान्स्फर करते. त्याच्याच क्रेडिट कार्डवर ऍड ऑन कार्ड त्याने मला काढून दिले आहे.'' बोलताना समजले की, तिचा आधीचा फ्लॅट विकून आलेले ऐंशी लाख रुपये नव्या फ्लॅटसाठी वापरले आहेत. हिच्या अकाउंटला काहीही पैसे नाहीत. ते सगळे पैसे त्याच्या अकाउंटला जमा होतात. मग त्या अकाउंटमधून ही खर्च करते. तिच्या नवऱ्याच्या बुद्धी चातुर्याला मनोमन दाद दिली.

मुली शिकतात आणि पैसेही मिळवतात, त्या स्मार्ट फोन वापरतात, ऑनलाईन शॉपिंग करतात, मग आर्थिक विषयांमध्येच का मागे राहतात? आपल्या जोडीदारावर विश्‍वास नक्कीच असावा. पण जोडीदारावर आर्थिक बाबींसाठी किती अवलंबून असावे यालाही काही सीमा असावी. शक्‍यतो उतारवयानंतर बॅंक अकाउंट संलग्न असावेत. गुंतवणुकीबद्दलच्या सगळ्या नोंदी व्यवस्थित ठेवून एकमेकांना त्या बाबतीत माहिती द्यावी. तर येणाऱ्या पैशांचा योग्य प्रकारे विनियोग करणे, ते पैसे कसे गुंतवावे आणि भविष्यकाळाची तरतूद कशी करावी याचे ज्ञान जोडीदाराला असणे आवश्‍यक आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: supriya dhadphal upadhye write article in muktapeeth