प्राणवायू देवोनिया...

सुशीला संकपाळ
शनिवार, 6 एप्रिल 2019

त्या चमूतील ते सर्वांत कनिष्ठ डॉक्‍टर. शिकत असलेले. पण त्यांनी सहज म्हणून सुचवला उपाय आणि काका शुद्धीवर आले.

त्या चमूतील ते सर्वांत कनिष्ठ डॉक्‍टर. शिकत असलेले. पण त्यांनी सहज म्हणून सुचवला उपाय आणि काका शुद्धीवर आले.

अण्णा माझे चुलते. त्यांचा भुसार मालाचा व्यापार व लाकडाची वखार होती. भाड्याने सायकली देण्याचे दुकान अण्णांनी आजीसोबत सुरू केले. ते सुगीमध्ये खेड्यापाड्यातून धान्य विकत घेत. शहरातील आडतीवर घालत. पुढे व्यापारात तोटा झाला. कुटुंब विभक्त झाले. त्यात एकाहत्तरचा दुष्काळ. पण अण्णांनी वाहणी बदलली नाही. भुकेल्याला जेऊ घालण्याची, गरजूंना मदत करण्याची त्यांची वृत्ती होती. रोजच्या जेवणाच्या पंक्तीलाही ते कोणाला तरी सोबत आणत. त्यांनी सातारला पेंटिंगचा व्यवसाय सुरू केला. त्यात चांगला जमही बसवला. चाळीस वर्षांपूर्वी त्यांनी साताऱ्यात बंगला बांधला. मोटार घेतली. गावापासून सातारा दूर. गावातील कोणीही सातारला गेले तर अण्णा त्यांचा आग्रहाने साग्रसंगीत पाहुणचार करत. नात्यातले, कुटुंबातले सारेच त्यांच्याकडे राहत असत. त्यांना अण्णा महाबळेश्‍वरला फिरवत. त्यांचे सगळ्यांशीच स्नेहाचे संबंध होते.

अण्णा एकदा थंडीतापाने आजारी पडले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. चूक डॉक्‍टरांच्या उपचाराची, की अण्णांच्या प्रकृतीची, माहीत नाही; पण अण्णा कोमात गेले. साधा थंडीताप म्हणता म्हणता आजार विकोपाला गेला. त्यांना पुण्याला आणले. तेथे तपासण्या केल्या, पण काही कळले नाही. डॉक्‍टरांचा चमू प्रयत्नांची शिकस्त करत होता, पण पंधरा दिवस झाले तरी अण्णा कोमातून बाहेर येत नव्हते. नळीने त्यांना द्रवपदार्थ देत होते. त्यांच्या आंगावर सूज आलेली. पोट नगाऱ्यासारखे फुगलेले. कोणत्या क्षणी काय होईल कळत नव्हते. घरचे सारे घाबरलो होतो. शेवटचे पाहायला लोक येत होते. अण्णांची मुले लहान होती. काकूना काय करावे सुचत नव्हते. अशा परिस्थितीत एक निवासी डॉक्‍टर म्हणाले, ""आपण यांना थोड्या थोड्या वेळाने ऑक्‍सिजन देऊन पाहूया.'' बाकीच्या डॉक्‍टरांच्या संमतीने तसे करणे सुरू केले आणि चौदा तासांनी अण्णांची हालचाल सुरू झाली. ते पूर्ण बरे झाले. त्या निवासी डॉक्‍टरांनी आणि अण्णांच्या अन्नदानाने त्याना पुनर्जीवन दिले होते.

Web Title: sushila sankpal write article in muktapeeth