ती होती म्हणूनी...

स्वाती नाईक
शनिवार, 17 जून 2017

तिला कळत आले तेव्हापासून ती कधीही स्वतःसाठी जगलीच नाही. तिचे आयुष्य सतत दुसऱ्यांसाठीच होते. कधी भावंडांसाठी, तर कधी मुलांसाठी, पतीसाठी. अगदी पक्षाघाताच्या झटक्‍यानंतरही तिची धडपड सेवेचीच राहिली होती.

तिला कळत आले तेव्हापासून ती कधीही स्वतःसाठी जगलीच नाही. तिचे आयुष्य सतत दुसऱ्यांसाठीच होते. कधी भावंडांसाठी, तर कधी मुलांसाठी, पतीसाठी. अगदी पक्षाघाताच्या झटक्‍यानंतरही तिची धडपड सेवेचीच राहिली होती.

नाटकाचा तिसरा अंक रंगात आला होता. प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोचली होती. इतक्‍यात अतिशय सुरेल आवाजात नायिका गाऊ लागली. 'तू मी दोघे मिळुनी सखया, चाल चंद्रावर स्वारी करू या'. कुठल्याही वाद्याची साथ नसताना नायिकेने संपूर्ण गीत इतके काही उत्कृष्ट रीतीने, सुरेल आवाजात म्हटले कि ते संपल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला. प्रेक्षागृहातील दामूअण्णा मालवणकर उठले. रंगमंचाच्या मागे जाऊन त्यांनी नायिकेचे भरभरून कौतुक केले. ही नायिका म्हणजे माझी बहीण-विमल दीक्षित.

तशी ती एक अतिशय साधी, सालस, समंजस मुलगी होती. कुशाग्र बुद्धिमत्तेची, देखणी, हसरी, आनंदी स्वभावाची! तिच्या जन्मानंतर वडिलांना मनासारखी नोकरी मिळाल्याने, त्यांच्या दृष्टीने ती चांगल्या पायगुणाची होती. पोलीस खात्यात वरिष्ठ पदावर असलेल्या वडिलांच्या सततच्या बदल्या व लागोपाठची भावंडे, या सर्वांमध्ये तिचे बालपण नकळत हरवत गेले. मुलांच्या शिक्षणाची होत असलेली हेळसांड बघून एका ठिकाणी बिऱ्हाड थाटण्याचा वडिलांनी निर्णय घेतला. आता तिच्यावर आईच्या बरोबरीने सर्व जबाबदारी आली. शाळेतील स्वतःचा पहिला-दुसरा क्रमांक न सोडता आपल्या भावंडांमध्ये देखील आत्मविश्वास निर्माण केला. स्वतःची गाण्याची आवड बाजूला ठेवून धाकट्या बहिणींचे गाण्याच्या क्‍लासमध्ये नाव दाखल केले.

धाकट्या भावाचे इंटरच्या अभ्यासापेक्षा एनसीसी, ग्लायडिंग प्रशिक्षण, खेळ वाढत चाललेले पाहून तिला काळजी वाटू लागली. परीक्षेच्या दोन महिने आधी रोज रात्री एक-दोन वाजेपर्यंत जागून तिने त्याचे विषय पक्के केले. तिचे शाळेतील उत्कृष्ट यश, बक्षिसे व नंतर गाजवलेले महाविद्यालयामधील दिवस खूपच संस्मरणीय होते. आणि अचानक तिचे लग्न ठरले. तेव्हा देखील तिची स्वतःची डॉक्‍टर होण्याची महत्वाकांक्षा बाजूला ठेवून, तक्रार न करता तिने तो बदल स्वीकारला. प्रयोगशाळेत रमणाऱ्या तिचे आता लग्नानंतर अंगणात सडा घालणे, चुली सारवून सोवळ्यात स्वयंपाक करणे, तऱ्हे तऱ्हेचे कुलाचार, पैपाहुणे यातच तिचे कोवळे वय नकळत सरले. घरातील सर्व वडीलधाऱ्यांना कधी शांतपणे, तर कधी प्रसंगी थोडा विरोध करून, तेही कुणाला न दुखावता, घरातील जुन्या रूढी परंपराच्या बाबतीत मने वळवून हळू हळू बदल घडवून आणले. तीन मुलांच्या जन्मानंतर तिने शिक्षण पुढे सुरु केले आणि आश्‍चर्य म्हणजे बीएस्सी- होम सायन्सच्या परीक्षेत ती विद्यापीठात दुसरी आली. पण तिला नागपूरला नोकरी मिळाली नाही. खरे तर या गुणवंतीला स्वतःला काहीच मिळाले नाही. तिला कळत आले तेव्हापासून ती कधीही स्वतःसाठी जगलीच नाही. तिचे आयुष्य सतत दुसऱ्यांसाठीच होते. कधी भावंडांसाठी, तर कधी मुलांसाठी, पतीसाठी. अगदी पक्षाघाताच्या झटक्‍यानंतरही तिची धडपड सेवेचीच राहिली होती.

मधला काळ असाच भुर्रकन उडून गेला. मुलांचे शिक्षण, नोकरी, लग्न सर्व काही सुरळीत पार पडले. मुलांच्या आयुष्यातील कठीण प्रसंगात देखील त्यांना तिचाच आधार जास्त होता. त्या नंतर वडिलांचे आजारपण, अगदी शेवटच्या घटकेपर्यंत केलेली त्यांची सेवा, प्रसंगी स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष केलेले, या नंतर तिला पक्षाघाताचा झटका आला. ही गोष्ट सर्वांसाठी कमालीची धक्कादायक होती. पण ती पुन्हा खंबीरपणे उभी राहिली आणि उजवी बाजू पूर्णपणे निष्क्रिय असताना तिने तऱ्हे तऱ्हेचे फिजिओथेरपीचे प्रयोग करून काठी घेऊन चालण्याइतपत प्रगती केली. एवढेच नव्हे तर, पुढे काही वर्षांनी अंथरूणावर असलेल्या आईची सेवा करण्यासाठी तिने वॉकरसह पुण्यात मुक्काम ठोकला.

वर्षे भराभर उलटत होती. बुद्धी तीक्ष्ण असूनही शरीर हळू हळू साथ देईनासे झाले होते. त्यातच धाकट्या मुलाच्या आकस्मिक निधनाने ती मनातून पूर्णपणे खचून गेली. संसारात चांगली-वाईट पती-पत्नींची एकमेकांना असलेली साथ कितीहि मोलाची असली तरी पोटाच्या गोळ्याचे, तोही करिअरच्या अतिशय उच्च पदावर असताना, जाणे ती सहन करू शकली नाही. तिला आयुष्यात तक्रार हा शब्द माहीत नव्हता. हसऱ्या चेहऱ्याआड ती सोसत राहिली. तिची खळबळ तिने कोणालाच जाणवू दिली नाही. मूकपणे आलेले दुखणे सोसत तिने निरोप घेतला.

ती आम्हा भावंडांसाठी दीपस्तंभासारखी होती. आमच्या आवडीनुसार योग्य दिशा देत ती राहिली. आमच्या वाटा प्रकाशमान करीत राहिली. आमची जहाजे प्रवासाला निघालेली असताना ती आव्हानांच्या लाटा झेलत स्थिर राहिली.

ती गेली नाही, तर आम्हा सर्वांच्या आयुष्यातील 'दीपस्तंभ' कोसळला. त्या दीपस्तंभाचे सागरासारख्या लाटा झेलून देखील खंबीरपणे उभे राहणे, आठवत राहणे, संकटाच्या वेळी तिने काय केले असते हे शोधणे हीच आमच्यासाठी शिदोरी उरली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: swati naik wirte article in muktapeeth