शिक्षण क्षेत्रात शिक्षकांच्या निवडीचा निकष पैसा?

teacher
teacher

शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्राकडे अजूनही पवित्र क्षेत्र म्हणून पाहिले जाते. मात्र, प्रत्यक्षात या दोन्ही क्षेत्रांमध्ये प्रचंड अशी लूट चालू आहे. या क्षेत्राचे पावित्र्य केव्हाच लोप पावलयं आणि या पवित्र क्षेत्रांमध्ये आज केवळ व्यापार उरलाय. शिक्षण क्षेत्र हा व्यवसाय नव्हे आणि म्हणूनच खासगी अनुदानित आणि आजघडीला अस्तित्वात आलेला स्वयंअर्थसहाय्यित शाळा यांचा ताळेबंद पाहिला तर ना नफा ना तोटा अशी त्यांची मांडणी केलेली असते. मग या संस्थांना मिळणारा प्रचंड नफा जातो कुठे? खासगी अनुदानित संस्थांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास वर्षानुवर्षे या शाळांमधील कर्मचाऱ्यांचा पगार शासन देत असले तरी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची निवड करण्याचे अधिकार संबंधित संस्थांना दिले आहेत. बोटावर मोजता येतील इतक्‍या गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण संस्था सोडल्या तर सर्व शिक्षण संस्थांमध्ये शिक्षक वा प्राध्यापक निवडताना केवळ आणि केवळ आर्थिक व्यवहारच होतो. आज अशा संस्थांमध्ये डी. एड. शिक्षक वीस ते पंचवीस लाख, बी. एड. शिक्षक पंचवीस ते पस्तीस लाख आणि प्राध्यापकांचा जवळपास पन्नास लाख असा "रेट' सुरू आहे. पैसा मोजून शिक्षकाची नोकरी पत्करणाऱ्या गुरुजनांची संख्या फार मोठी आहे. निवडीचा निकष जिथे पैसा असेल तिथे शिक्षकाच्या गुणवत्तेबाबत न बोललेच बरे. आजघडीला जरी काही विषय वगळता शिक्षकांच्या नियुक्‍त्या बंद असल्या तरी ही परंपरा पूर्वापार चालत आली आहे. गावाखेड्यात प्रत्येकाला शिक्षण मिळावे या ध्येयाने झपाटलेल्या लोकांनी कधी काळी खासगी शिक्षण संस्थांचे जाळे विणले. मात्र, आज त्यांच्यानंतर आलेले त्यांचे उत्तराधिकारी शिक्षणसम्राट बनले असून सुरू राहिलीत ती शिक्षणाच्या नावावर केवळ दुकाने.

कधीकाळी हमखास नोकरी मिळवून देणारे डी.एड., बी.एड. कोर्सेसला आज अशी घरघर लागली आहे की अगदी शासकीय डी.एड. कॉलेजलाही विद्यार्थी मिळेनासे झाले आहेत. आज महाराष्ट्रात डी.एड., बी.एड. शिकलेल्या बेरोजगारांची संख्या किमान लाखात आहे. कधीकाळी डी.एड., बी.एड.चे कॉलेजही या दुकानदारीतून बाहेर पडलेल्या बेरोजगारांची ही संख्या आहे. गावखेड्यात नोकरीविना त्यांना काही मिळाले असेल तर ते "गुरुजी' असे नाव. पण, भविष्य अंधकारमय. खासगी शिक्षण संस्थांमध्ये एकीकडे स्वतःची नोकरी सांभाळणे आणि विद्यार्थी शिकवणे अशी सर्कस करताना आपल्या आजूबाजूला कितीतरी शिक्षक आढळतील. शासनाने शिक्षकांचे पगार सुरू ठेवले आहेत आणि संस्थांना मिळणारे अनुदान थांबवले. यातून बाहेर पडण्यासाठी तोडगा म्हणून संस्थांनी अनुदानावर कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या वेतनातून काही दिवसांचे वेतन घेण्याची नवीन प्रथा आता रूढ केली. शिक्षकभरती बंद असताना कित्येक बेरोजगार शिक्षकांनी आपला घामाचा पैसा या संस्थांमध्ये फसवून नोकरी पत्करली आहे. केवळ या आशेवर की केव्हा ही बंदी उठेल तेव्हा आपल्यालाच संधी मिळेल.

सध्या सर्वत्र कॉन्व्हेंटचे पीक आले आहे. या कॉन्व्हेंटमध्ये जिथे पालकांकडून हजारो रुपये शिक्षणाच्या नावावर उकळले जातात तिथे शिकविणाऱ्या शिक्षकांचा पगार अतिशय तोकडा आहे. अगदी दोन तीन हजार रुपयांपासून हे पगार सुरू होतात आणि संस्थेच्या उत्पन्नानुसार फार तर वीस तीस हजारांवर पोहोचतात. कामाचा व्याप प्रचंड असतो. शाळा सुटल्यानंतर शाळेचे काम घरी घेऊन जावे लागते अशी या शिक्षकांची गत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खासगी अनुदानित शिक्षकांच्या शाळा यात काम करणाऱ्या शिक्षकांसाठी विविध शिक्षक संघटना आहेत. मात्र, या स्वयं अर्थसहाय्यित संस्थांमध्ये, कॉन्व्हेंटमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांसाठी संघटना नाही. एका अर्थाने असंघटित कामगार अशी या शिक्षकांची अवस्था झाली आहे.
लॉकडाउनच्या काळात बऱ्याचशा संस्थांनी शिक्षकांचे पगार थांबवले. नंतर शिक्षण विभागाकडून पत्रव्यवहार झाल्यानंतर शिक्षकांना पगार देणे सुरू केले. त्यातही आम्ही आता तुमच्या खात्यावर वेतन टाकतो ते तुम्ही उचलून आम्हाला परत करा, असे सांगायचे प्रकारही झाले. वेगळ्याच पगाराच्या आकड्यावर सही घ्यायची आणि तोकडे वेतन हातावर टिकवायचे हाही प्रकार हल्ली "कॉमन' झाला आहे.

पालकांकडून संपूर्ण बारा महिन्यांचे क्षुल्क घेणारे हे संस्थानिक त्यांच्या शिक्षकांना मात्र केवळ दहा महिन्यांचा पगार देऊन बोळवण करतात. क्षुल्लकशा कारणावरून नोकरीवरून काढून टाकल्यानंतर नवीन शिक्षक रुजू होण्यासाठी फारसा त्रास जात नाही. कारण बेरोजगारांची फौज रांगेत उभी आहेच. स्वयंअर्थसहाय्यित संस्थांना शासनाकडून अनुदान वा वेतन नसल्यामुळे प्रशासन या व्यवहारांच्या मध्ये पडत नाही. तर नोकरीच्या भीतीने अशा संस्थामधील शिक्षक दाद मागण्यासाठी बंडखोरी करीत नाही. पालकाला मुलाच्या शिक्षणापलीकडे संस्थेत काय चालते हे जाणून घेण्यात मुळीच रस नाही आणि म्हणूनच खासगी शाळांमधील हे शोषण अविरतपणे सुरू आहे.

मध्यंतरी नागपूरमधील एका नामांकित शाळेतील शिक्षकाने संस्थेच्या अन्यायाविरोधात आंदोलन उभारले. पुढे त्या आंदोलनाचे आणि त्या शिक्षकाचे काय झाले याची माहिती कुणास असेल तर कृपया कळवा. या अनुषंगाने आपण शिक्षकांविषयी आणि त्यांच्या समस्यांविषयी किती संवेदनशील आहोत, हे कळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com