देव ते अंतरात नांदती, श्रमिक हो घ्या इथे विश्रांती..'

डॉ. लीना सतीश निकम
शनिवार, 23 मे 2020

दीनबंधू' संस्थेने अन्नछत्र उघडलंय. मानवी संवेदनशीलतेचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे हे अन्नछत्र. नितीन सरदार,अभिजीत परागे आणि त्यांची साठ जणांची टीम इथं अहोरात्र राबत आहे.

लॉकडाऊन सुरू झालं. फिरतं चक्र थांबलं. पण मजुरांच्या पायाचं चक्र मात्र महामार्गावरून गरगरू लागलं. काळजाच्या चिंध्या चिंध्या करणारी वाट अन त्या वाटेवरील भळभळत्या जखमा..हातावर पोट नी पाठीवर बिर्‍हाड घेऊन मजुरांचे लोंढेच्या लोंढे हैदराबाद-नागपूर हायवेवरून धावत आहेत. कधी ट्रकमध्ये कोंबून तर कधी बसच्या टपावर सुद्धा जीव मुठीत धरून दिसताहेत.

जेवण दिसताच ते थांबतात. लेकरं काखेत घेऊन धावतात.पण आधी त्यांना हात स्वच्छ धुवायला सांगितले जाते. मग पत्रावळ दिली जाते. गरम-गरम वांगे बटाट्याची भाजी, वाफाळलेला भात, पोळ्या,लोणचं ,मुलांना बिस्कीटचा पुडा, गुळ शेंगदाण्याचा पॅक, ग्लुकोज पावडरचा डबा... सगळे तृप्त होऊन जेवत आहेत. मनात कृतज्ञता आहे आणि नजरेसमोर आपली माती.
हे दृश्य आहे नागपूर जवळील जामठा स्टेडीयम जवळचे. तिथं' दीनबंधू' संस्थेने अन्नछत्र उघडलंय. मानवी संवेदनशीलतेचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे हे अन्नछत्र. नितीन सरदार,अभिजीत परागे आणि त्यांची साठ जणांची टीम इथं अहोरात्र राबत आहे.जेवणाआधी त्यांच्यासाठी माईकवर प्रार्थना केली जाते.
"सावकाश जेवा. हे जेवण आम्ही तुम्हाला देत नाही. तो तुमचा हक्क आहे. तुम्ही श्रम करून आमचं जीवन सुंदर बनवलं आहे. तुमचे हात सुंदर आहेत. तुमच्या मनात कदाचित येत असेल की गरज होती तेव्हा आपल्याला वापरलं आणि आता वाऱ्यावर सोडून दिलं. पण त्यांचाही राग धरू नका. त्यांना माफ करा.आपण आपल्या प्रवासात सुरक्षित घरी पोहोचावेत म्हणून आम्ही प्रार्थना करतोय..."
‌मी डबडबल्या डोळ्यांनी हे सगळं अनुभवत होते. घशात दुःखाचा आवंढा गिळून. अण्णाभाऊ साठे आठवत होते."ही पृथ्वी शेषाच्या डोक्यावर नाही तर श्रमिकांच्या  हातावर तोलली गेली आहे..."
‌सोबत आमच्या मैत्रिणी होत्या. संध्या राजूरकर, डॉ. वीणा राऊत ,गुरुदेव सेवा मंडळाचे ज्ञानेश्वर दादा रक्षक, विलास भाऊ गजभिये ,सिद्धार्थ कांबळे आणि आणखी बरेच जण. ही मंडळी तिथं आपली सेवा देत आहेत...
‌ मजूर बांधवांशी आणि भगिनींशी आम्ही बोललो.वेदना जाणून घेतल्या.
‌ 'पुन्हा परत शहरात जाणार का?'
‌ 'मिट्टी खायेंगे लेकिन वापस नही जायेंगे 'हे त्याचं कातर आवाजातलं वाक्य हृदयाला चरे पाडून गेलं. हा रस्ता किती पिळवटणाऱ्या वेदनांचा साक्षीदार ठरतो याची तर मोजदादच नाही.
आतापर्यंत 60 हजार कामगारांना जेवण या संस्थेने दिलं आहे. जेवणा सोबतच मजुरांच्या पायांची मालिश, औषधोपचार पण ही संस्था करते आहे. आमच्याच समोरची गोष्ट...
एक सायकल स्वार किती किलोमीटर सायकल चालवित आला माहिती नाही पण' दीनबंधू' दिसताच धाडकन कोसळला .पायाच्या पोटऱ्या तट्ट फुगलेल्या. चालण्याचं बळ अंगात नाही. त्याही परिस्थितीत त्याला सॅनिटाइज्ड करून अभिजीतने त्याच्या पोटऱ्यांची तेल लावून मालिश करून दिली. केसांवरून हात फिरवून त्याला आश्वस्त केलं.. कोणत्या सेवेत बसते हो ही सेवा? आज माणसा माणसात अस्पृश्यता आहे, संशयकल्लोळानं  सारेच पछाडलेले.. त्या पार्श्वभूमीवर ही सेवा खऱ्या अर्थाने ईशसेवा नाही का?
काही वेळातच एक दुचाकी चालक आपल्या पत्नीला घेऊन इथं आला. सोबत एक अडीच वर्षांचे ,एक साडे चार वर्षाचे आणि फाटक्या साडीत गुंडाळलेले चाळीस दिवसांचे मूल. विजयवाडा येथून गोरखपूरला जाण्यासाठी निघाले होते. सतराशे किलोमीटरचा प्रवास. त्यांना येथे बरीच मदत केली. सोबत फळं, फराळाचं साहित्य सुद्धा दिले गेले. अगदी सॅनिटरी नॅपकिन्स सुद्धा. जाताना नवरा-बायकोच्या डोळ्यात पाणी होतं. अशा रोज एक ना अनेक कहाण्यांचे साक्षीदार आहे हे अन्नछत्र..
‌यांच्या रक्ताळलेल्या पायांनी महामार्ग खराब होत आहे म्हणे!या ओल्या बाळंतिणीच्या पान्ह्यानं तरी भिजतील का हो कोरड्या संवेदना? विजयाताई चे शब्द आठवले.
‌ "अब तो सहाही जाता नही
‌ लब्जो को सिलते  सिलते
‌ कही चिंख न निकल आए
‌ खामोश रहते रहते.."
‌ या संस्थेच्या मदतीला अनेक हात सरसावत आहेत. पण सगळ्याच गोष्टी पैशाने पूर्ण होतात का हो?  सेवेचे हातच माणसाला जगवतात शेवटी ! तरुण पिढीच्या मनात या गोष्टी रुजणं किती गरजेचं आहे हे उगाचच आठवत राहिलं.. फक्त सोशल डिस्टन्स ठेवूनच हे प्रश्न सुटणार नाहीत तर त्यासाठी कुठेतरी कनेक्ट होता आलं पाहिजे मजुरांच्या वेदनांशी एवढं मात्र खरं. 'दीन बंधू 'सेंटरवर आम्ही 'शायनिंग इंडिया' नाही तर 'सफरिंग भारत' बघत होतो.
‌ नितीन दादा बोलत होते. 'जात, धर्म ,पंथ काही नसतं हो.. जागी असते ती फक्त माणुसकी. ती माणुसकी जपा. हा कोरोना काय आज नाहीतर उद्या आपल्यातून निघूनही जाईल.. पण आपण माणसंच एकमेकांसोबत राहणार आहोत हे लक्षात घ्या..'
‌‌ मानवतेच्या या मंदिराला आहे नमस्कार केला. मनात आशेची नवी पालवी घेऊन बाहेर पडलो.
ओठांवर शब्द होते..
‌' बंधुत्वाची येथ सावली
‌ अनाथ आमचे माय माऊली
‌ कधी दिसे का ईश राऊळी
‌ देव ते अंतरात नांदती
‌ श्रमिक हो घ्या इथे विश्रांती..'
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: They serve migrated labours by providing food