नोटबंदीचा असा पण ‘साईड इफेक्टस’

notes
notes

राधिका कारखानीस (नाव काल्पनीक) पुण्याच्या हिंजवडी येधील एका सॉफ्ट वेअर कंपनीत सॉफ्ट वेअर इंजिनियर म्हणून काम करते. तशी ती मुळची सांगलीची. एका मध्यमवर्गीय कुटुंबातून ती आलेली. तिचे आई वडील दोघेही सरकारी कर्मचारी. सांगलीला तिचे एक छोटेसे घर. एम. सी. एम केल्यावर तिला पुण्याला चांगली नोकरी मिळाली अन् ती पुण्याला शिफ्ट झाली. महिना 40 हजार रुपये पगार तिच्या बँक अकाऊंटला जमा होतो.

लहानपणी बर्‍याच हौसा मौजा मारल्या गेल्यामूळे ती पुण्याला अगदी थाटात रहाते. कोथरूडला पौड रोडवर 1 बिएचके फ्लॅट भाड्याने घेतला आहे. त्याचेच भाडे महिना 10 हजार रुपये आहे. कंपनीत जायला बसची सोय आहे. ब्रेकफास्ट, लंच कंपनीतच असतो. संध्याकाळी व सुट्टीच्यादिवशी वारेमाप उधळपट्टी चालू असते. घरी चांगले किचन असून हॉटेलमध्ये खाण्यावर भरपूर उधळपट्टी चालते. पिझ्झा, बर्गर हे खास आवडते पदार्थ. कधी-कधी कोपर्‍यावरच्या महागड्या हॉटेलमधून शेझवान राईचे पार्सल मागविण्यात येते. पैसा हा उडवण्यासाठीच असतो असा तिचा समज आहे. या वयात मजा नाही करायची तर केव्हा मजा करायची असे तिला वाटते. पुण्यातील सगळी महागडी हॉटेल्स तिला ठाऊक आहेत. सगळे मल्टिप्लेक्स ठाऊक आहेत. सतत रिक्षाने फिरायची सवय आहे. एवढे करुनही पैसे शिल्लक रहातात म्हणून भरपूर शॉपिंग चालते. स्वाती कर्वे ही तिची कंपनीतली मैत्रीण सतत तिला तिच्या उधळपट्टीवरून बोलत असते. म्हणून तिने स्वाती कर्वेला कंजुष, मख्खीचूस ठरवले आहे.

7 नोव्हेंबर 2016 रोजी राधिकाने तिच्या बँकेच्या एटीएम मधून 10 हजार रुपये कॅश काढली. यामध्ये तिला बहुतेक करून 1000 रुपये व 500 रुपयांच्या नोटा मिळाल्या. एका दुकानात तिने एक ड्रेस बघून ठेवला होता. त्याची किंमत 8 हजार रुपये होती. तो ड्रेस घेण्यासाठी म्हणून तिने हे पैसे काढले होते. खरे म्हणजे तिच्या कपाटात कितीतरी सुरेख सुरेख ड्रेस धुळ खात पडले होते. या ड्रेसची तिला काही आवश्यकता नव्हती. पण ड्रेस आवडलाना मग तो घेऊन टाकायचा असा तिचा खाक्या होता. तिचा 1000 रुपये व 500 रुपयांच्या नोटांवर फार जीव होता. 100, 50, 20, 10, 5 रुपयांच्या नोटा तिला आवडत नसत. 1000 किंवा 500 रुपयांच्या नोटांमध्ये मोठी कॅश कशी सुटसुटीत रहाते. पर्स कशी नेहमी कॅशने भरलेली असावी असे तिला वाटत असायचे.

7 नोब्हेंबरला संध्याकाळी दुकानात जाऊन तो ड्रेस आणायचे तिने ठरवले होते. पण रात्री कंपनीतून यायला बराच उशीर झाला त्यामूळे ते काही जमले नाही. 8 नोव्हेंबरला सकाळी ती उठली तेव्हा जाम सर्दी झाली होती, डोके भणभणत होते, थोडा ताप आल्यासारखे पण वाटत होते म्हणून तिने दांडी मारली व दिवसभर पडून राहीली. 9 नेव्हेंबरला पण घरीच होती. संध्याकाळी ताप उतरल्यावर जरा बरे वाटू लागले म्हणून ती बाहेर पडली व ड्रेस आणायला दुकानात गेली. ड्रेस पॅक करून घेतला व 1000 रुपयांच्या 8 नोटा दुकानदाराकडे दिल्या व पार्सल उचलून ती बाहेर पडणार तोच दुकानदाराने दिला आडवले.

‘या नोटा चालणार नाहीत मॅडम!’ दुकानदार म्हणाला.
‘चालणार नाहीत म्हणजे? ठीक आहे मी तुम्हाला एटीएम मधून दुसर्‍या नोटा आणून देते!’ राधीका फणकार्‍याने म्हणाली. आपल्या नोटा चालणार नाहीत हे दुकानदाराचे बोलणे राधीकाला फारसे आवडले नव्हते.
‘अहो मॅडम! काल मध्यरात्रीपासून सरकारने 1000 रुपये व 500 रुपयांच्या नोटा रद्द केल्या आहेत. आता या नोटा चालणार नाहीत. तुम्हाला त्या बँकेतून बदलून घ्याव्या लागतील. दोन दिवस बँका व सर्व एटीएम बंद रहाणार आहेत. तुम्हाला हे कसे ठाऊक नाही? तुम्ही टीव्ही बघत नाही का किवा पेपर वाचत नाही का?’ दुकानदार म्हणाला.

हे सगळे ऐकुन राधिका चाटच पडली. एवढी महत्वाची गोष्ट आपल्याला कशी ठाऊक नाही. ड्रेसचे पार्सल न घेताच राधिका परत आली. पण यापुढचे दिवस कठीण जाणार आहेत याची तिला अजून जाणीव झाली नव्हती. बँकेत नोटा बदलून मिळतील असे कळल्यावर दुसर्‍या दिवशी सकाळी ती घराजवळच्या बँकेत नोटा बदलायला गेली तर तेथे भला मोठी रांग होती. फक्त 4 हजार रुपयांच्याच नोटा बदलून मिळतील असे सांगण्यात आले. त्यासाठी एक फॉर्म भरा. पॅन कार्ड किंवा आधारकॉर्ड जवळ पहीजे. नोटांचे नंबर लिहा असे बरेच सोपस्कार तिला सांगीतले. राधिकाचे पॅन कार्ड कुठेतरी धुळ खात पडले होते ते आता शोधून काढावे लागणार होते. 4 हजार रुपयेच बदलून मिळतील, उरलेल्या रुपयांचे काय? ते केव्हा बदलून मिळणार? कुणीतरी सांगीतले की तुम्ही तुमचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये भरा. तेथे तुमच्या सर्व नोटा स्विकारतील. मग तुमच्या अकाऊंटमधून तुम्हाला पैसे काढता येतील.

राधिका चरफडत घरी आली. पहिल्यांदा पॅनकार्ड शोधून काढले. तिचे अकाऊंट ज्या बँकेत होते ती बँक हिंजवडीला होती. सॅलरी अकाऊंट काढायला म्हणून ती एकदाच बँकेत गेली होती. त्या नंतर तिने कधी बँकेचे तोंड बघीतले नव्हते. त्या बँकेची पुण्यात अनेक ठिकाणी एटीएम होती. त्यातून पैसे काढता येत होते. आता मात्र पैसे भरायला राधिकाला तिच्या या हिंजवडीमधल्या बँकेत जाणे आवश्यक होते. राधीका बँकेत पोचली तेव्हा तेधे सुद्धा भली मोठी रांग होती. राधिका रांगेत उभी राहीली. तिचा नंबर आला तेव्हा ‘पास बुक कुठे आहे’ म्हणून विचारले. पास बुक नाही म्हणून नोटा न घेताच तिला परत पाठवले. राधिकाला आठवले की तिचे पासबुक तिच्या कंपनीतल्या ड्रॉवरच्या लॉकरमध्ये आहे. ती घाईघाईने कंपनीत आली. पासबूक शोधून काढले. परत बँकेच्या पैसे भरणार्‍यांच्या लाइनीत उभी राहीली. पैसे भरून झाल्यावर परत पैसे काढणार्‍यांच्या लाईनीत उभे रहावे लागले. तेवढ्यात बँकेतली कॅश संपली. मग कॅश येईपर्यंत वाट बघावी लागली. कॅश आल्यावर एकदाचे पैसे मिळाले पण ते फक्त 4 हजार रुपये, ते सुद्धा 2 हजार रुपयांच्या नोटांमध्ये! यासाठी राधिकाचा कमीत कमी 5 ते 6 तास वेळ गेला होता. पैसे मिळाल्यावर राधिका हुश्श म्हणत परत आली तेव्हा तिची चांगलीच दमछाक झाली होती.

तिच्या पर्समध्ये आता 2 हजार रुपयांच्या दोन नोटा होत्या. त्या सुट्या करणे आवश्यक होते. घरी आल्यावर राधिका आपला आवडता पिझ्झा खायला बाहेर पडली. सवयीने रिक्षाला हात दाखवणार होती. पण लक्षात आले की रिक्षावाल्याला द्यायला सुट्टे पैसे नाहीत. मग ती चालत निघाली व जवळच्या पिझ्झा जॉईंटमध्ये घुसली. एक पिझ्झा व कोल्ड कॉफी मागवली. 350 रुपये बिल झाले. तिने 2 हजार रुपयांची नोट पुढे केली. ‘सुटे पैसे नाहीत मॅडम! सुटे पैसे द्या!’ हॉटेलवाला म्हणाला. आता काय करायचे राधिकाला समजेना. ‘मॅडम आम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड घेतो! तुमच्याकडे कार्ड असेल तर द्या!’ हॉटेलवाला म्हणाला. राधिकाकडे तिचे एटीएम कार्ड होते ते तिने घाबरत घाबरत पुढे केले. ते चालले, पेमेन्ट झाले. राधिकाच्या लक्षात आले की तिचा हा खर्च ‘रेकॉर्ड’ झाला आहे. आत्तापर्यंत तिचे खर्च ‘रेकॉर्ड’ होत नव्हते. त्यामूळे पैसे कुठे जातात हे तिला समजत नव्हते. ‘वा ही चांगली पद्धत आहे! या पुढे शक्य तेथे डेबीट कार्ड कम एटीएम कार्डच वापरायचे’ तिने ठरवून टाकले.

2 हजार रुपये सुटे मिळवणे आवश्यक होते. दुसर्‍यादिवशी ती शेजारच्या मारवाड्याकडे गेली. त्याच्याकडून 500 रुपयांच्या वस्तू विकत घेतल्या. त्याला 2 हजार रुपयांची नोट दिली व 100 रुपयांच्या नोटांमध्ये सुटे पैसे देण्याची विनंती केली. ‘थोडे थांबा!’ त्याने सांगीतले. सगळेजणच त्याला तशी विनंती करत होते. त्याने राधिकाला मोठ्या मुष्किलीने 300 रुपये कॅश दिली व उरलेले पैसे ऍडवान्स म्हणून जमा करून घेतले. ‘जसे जमेल तसे सुटे पैसे देत जाईन. नाहीतर तुम्ही माल घेऊन जा!’ त्याने राधिकाला सांगीतले.

राधिकाच्या पर्समध्ये आता फक्त 300 रुपयेच होते. पैसे जपून वापरायला हवेत हे तिच्या लक्षात आले होते. रिक्षाने फिरणे बंद करायचे तिने ठरवले. भूक लागली म्हणून ती बाहेर पडली व चालत निघाली. तिला कोपर्‍यावरचे उडप्याचे हॉटेल दिसले. ते तिने अनेक वेळा पाहिले होते पण ‘लो क्वालेटीचे’ म्हणून लक्ष दिले नव्हते. आज ती चक्क या हॉटेलमध्ये घुसली व 40 रुपयांचे डोशाचे पार्सल घरी घेऊन आली. डोसा खाल्यावर तिच्या लक्षात आले की हा डोसा काही अगदीच वाईट नाही. नेहमी शेझवार राईसच मागवायला पाहीजे असे नाही.

तिच्या मैत्रीणीने स्वाती कर्वेने तिच्याकडे 5 हजार रुपये उसने मागीतले. ‘तुला चेक दिला तर चालेल?’ राधिकाने विचारले. ‘चालेल’ स्वाती म्हणाली. राधिकाने चेक फाडला. आजपर्यंत राधिकाने तिला अनेक वेळा उसने पैसे दिले होते. स्वातीने पण ते प्रामाणीकपणे परत दिले होते. पण या उसने दिलेल्या पैशांचे काही रेकॉर्ड नव्हते. आज चेकच्या रुपाने हे रेकॉर्ड निर्माण झाल्याचे राधिकाच्या लक्षात आले. आता चेकबुकचा भरपूर उपयोग करायचे तिने ठरवले आहे.

‘तुझा प्रॉब्लेम काय ठाऊक आहे का? तुझ्या अकाऊंटला भरपूर पैसे दिसतात. त्यामूळे तुला पैसे खर्च करण्याचा मोह होतो. तुझ्या अकाऊंटला कमी पैसे दिसतील असे तु काहीतरी कर. यासाठी बँकेतल्या ठकार मॅडमना भेट!’ स्वाती कर्वे राधिकाला नेहमी सांगायची. आज राधिका ठकार मॅडमना भेटली. ठकार मॅडम म्हणाल्या. ‘ तुम्ही ताबडतोब महिना 20 हजार रुपयांचे रिकरिंग अकाऊंट सुरू करा. तुम्हाला व्याज पण जास्त मिळेल व ते पैसे अकाउंटमधून गेल्याने पैसे कमी दिसतील. घराचे 10 हजार रुपयांचे भाडे पण चेकनेच द्या व उरलेल्या 10 हजार रुपयांमधील पण पैसे वाचवण्याचा प्रयत्न करा!’ राधिकाला ठकार मॅडमचे म्हणणे पटले व तिने लगेच रिकरिंग अकाऊंट चालू केले.

आता राधिकाला कॅशचे, म्हणजे रोकड पैशांचे महत्व कळले आहे. आता ती घरीच स्वयंपाक करून पैसे वाचवण्याचा प्रयत्न करते आहे. पैसे खर्च करण्याआधी ‘हा खर्च करण्याची खरोखरच आवश्यकता आहे का?’ याचा ती विचार करू लागली आहे. वायफळ खर्च कमी झाले आहेत. रिक्षातून फिरणे बंद झाले आहे. महागडी हॉटेल्स आता विस्मृतीत गेली आहेत. राधिकाने क्रेडिट कार्डसाठी अप्लाय केला आहे. डेबिट कार्ड व चेकबुकचा शक्यतो उपयोग करायचे ठरवले आहे. ऑन लाईन पेमेन्टची जेवढी म्हणून ऍप्लिकेशन्स आहेत त्याचा अभ्यास सुरु आहे. बचतीबरोबर गुंतवणूक पण सुरू झाली आहे. राधिकाने आता खर्‍या अर्थाने ‘आर्थिक साक्षर’ व्हायला सुरवात केली आहे. स्वाती कर्वेला हे कळल्यावर ती राधिकावर भयंकर खुष झाली आहे. जी गोष्ट दोन वर्षांमध्ये जमली नाही ती गोष्ट नोटबंदीच्या केवळ 15 दिवसात जमली याचे तिला आश्चर्य वाटते आहे.

राधीका आता खुपच बदलली आहे. घरी आल्यावर स्वयंपाक करण्यात वेळ छान मजेत जातो. घरचे अन्न मिळू लागल्याने तिच्या तब्येतीत चांगलाच फरक पडला असून तब्येत चांगली सुधारू लागली आहे. राधिकाच्या आईलापण ‘मुलगी आता शहाणी झाली’ याचा आनंद वाटू लागला आहे. हे सगळे नोटबंदीमूळे झाले असे राधिकाचे म्हणणे आहे. आपण काटकसरीने राहूनही राजाच्या थाटात राहू शकतो हे तिच्या लक्षात आले आहे. काटकसर व कंजुषी यातील फरक आता ती ओळखू लागली आहे. याचा पहिला फरक म्हणजे स्वाती कर्वे ही कंजुष मुलगी न रहाता काटकसरीने रहाणारी शहाणी मुलगी ठरली आहे.

आज अशा अनेक राधिका समाजात तयार होत आहेत. जे लोक पैशांची उधळपट्टी करत होते त्यांना आता पैशांचे महत्व कळू लागले आहे. खिशात पैसा किंवा रोकड नसेल तर काय हाल होतात याचा अनुभव येऊ लागला आहे. पैसा जपून खर्च करायला हवा हे आता समजू लागले आहे. आपल्या पॉश बाईकमध्ये 500 रुपयांचे पेट्रोल भरणारा मजनू सुद्धा आता 50 रुपयांचे पेट्रोल टाकू लागला आहे. बचतीत वाढ होऊ लागली आहे. समाज ‘अर्थ साक्षर’ होऊ लागला आहे. जे गेल्या 70 वर्षांमध्ये जमले नव्हते ते या 15 दिवसात जमू लागले आहे.

राधिकाने ज्या आता काही बचत व गुंतवणूकीच्या चांगल्या सवयी लाऊन घेतल्या आहेत त्या किती दिवस टिकतील सांगता येत नाही. पण नोटबंदीच्या निमित्ताने तिच्यात जो ‘अवेअरनेस’ किंवा जागृती निर्माण झाली आहे ती महत्वाची आहे. नोटबंदीच्या ‘इफेक्टस आणि साइड इफेक्टस’ बद्दल बरेच काही बोलले, लिहिले व टिव्हीवर दाखवण्यात आले आहे. यामध्ये नोटाबंदीच्या वाईट इफेक्टस व साईड इफेक्टसना प्राधान्य देण्यात येत आहे. पण नोटबंदीचा हा पॉझिटिव्ह साईड इफेक्ट आहे. तोपण तितकाच महत्वाचा आहे. लोकांना याची पण जाणीव व्हावी हाच या लेखाचा उद्देश आहे.

राधिका म्हणते की ही नोट बंदी अशीच अजुन काही काळ तरी चालु रहावी व भविष्यात रोकड रकमेची चणचणच असावी. त्याशीवाय लोक सुधारणार नाहीत.
मला राधिकाचे म्हणणे पटते!
तुमचे काय?
(एका सत्य घटनेवर आधारीत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com