अस्सं सासर सुरेख बाई...

वैजयंती वर्तक
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

सुनेचा बोनस तिच्या माहेरी पाठवणारा, भाडेकरूला जागा सोडू न देणारा एक माणूस या पुण्यात होता.

सुनेचा बोनस तिच्या माहेरी पाठवणारा, भाडेकरूला जागा सोडू न देणारा एक माणूस या पुण्यात होता.

पन्नास-बावन्न वर्षांपूर्वीची गोष्ट. माझे लग्न झाले आणि मी वर्तकवाड्यात आले. लग्नापूर्वी मी लोणी येथे फिलिप्स इंडिया या रेडिओ निर्मिती कारखान्यात नोकरी करत होते. लग्न झाल्यावर मी नोकरी सोडली होती. लग्नानंतर वर्षभराने मला माझ्या या नोकरीचा बोनस मिळाला. माझे सासरे (कै.) वामन गजानन वर्तक मला म्हणाले, ""तू लग्नापूर्वी नोकरी करत होतीस. त्या काळातील हा बोनस आहे. तेव्हा मिळालेला बोनस तू तुझ्या आईकडे दे. त्यावर त्यांचा हक्क आहे, आपला नाही.'' हे ऐकून मी आश्‍चर्यचकित झाले. माझ्या सासऱ्यांचा लाखमोलाचा स्वभाव त्यानंतरही अनेकदा अनुभवास आला. किंबहुना, त्यांच्यातील चांगुलपणा त्यांच्या आसपासच्या सर्वांच्याच प्रत्ययास नित्य येत असे. त्यात कोणताही आविर्भाव नसे. तो सहजानुभव असे.
आमच्या वाड्यात सहस्रबुद्धे म्हणून बिऱ्हाड होते. त्यांची कोपरगावला बदली झाली होती. म्हणून ते "जागा सोडतो' असे सांगायला आले. भाडेकरू कधी एकदा जागा खाली करतो आणि ती जागा आपण ताब्यात घेतो, अशी त्या काळी वाडेमालकांची घाई होत असे. पण माझे सासरे म्हणाले, ""परत पुण्यात बदली झाली तर जागेची कुठे शोधाशोध कराल? कुलपू लावून ठेवा तुमची जागा.'' भाडेकरू चकितच झाले. "असे घरमालक शोधूनही सापडणार नाहीत,' असे ते नंतर नेहमी सांगत. जशी घरातली माणसे मोठ्या मनाची, तसाच आमचा मेहुणपुऱ्यातला वर्तक वाडा. नऊ हजार चौरस फुटांचा, तीन अंगणे असलेला. आमच्याकडे काम करणाऱ्या लक्ष्मीबाई, शेजारच्या करंबेळकरांच्या गोठ्यातून शेण आणून द्यायच्या. अंगण शेणाने सारवून रांगोळी काढायला खूप छान वाटायचे. वाडा संस्कृतीमुळे वाड्यातली माणसे एकमेकांच्या अडचणीला सतत धावून येत. सर्व सण एकत्रपणे करण्यात खूप मजा यायची. आता जुनी माणसे काळाच्या पडद्याआड गेली. वाड्यात फ्लॅट संस्कृती आली. अनेक नवीन बदल या वाड्याने पाहिले, रिचवले आणि पचवलेही. पण आमच्या वर्तकवाड्याच्या मधुर आठवणी बकुळ फुलाप्रमाणे मनात दरवळत आहेत.

Web Title: vaijayanti vartak write article in muktapeeth