ऐसे त्यांचे बोलू! (मुक्तपीठ)

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 सप्टेंबर 2016

आसपासच्यांचे बोलणे ऐकले पाहिजे. कोण कधी काय बोलेल आणि त्यातून अभावितपणे गंमत होईल हे सांगता येत नाही. 

आसपासच्यांचे बोलणे ऐकले पाहिजे. कोण कधी काय बोलेल आणि त्यातून अभावितपणे गंमत होईल हे सांगता येत नाही. 

आम्ही अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे सुटीसाठी गेलो होतो. तिथल्या त्या चार दिवसांच्या वास्तव्यात एका सायंकाळी सूर्यास्त बघण्यासाठी ‘सनसेट पॉइंट’ला गेलो होतो. ते मनोहारी दृष्य अनुभवण्यासाठी खूप गर्दी जमलेली. बघता-बघता तांबूस रंगाचा सूर्याचा गोळा डोंगरांच्या आड लुप्त झाला. चला, आता उद्या नवीन उमेदीने सूर्य परत उगवणार, असा विचार मनात येतो न येतो तोच एक काकू मोठ्या कळकळीने म्हणाल्या, ‘गेला बिचारा घरी’. जणू काही यांचा जवळचा भाचा खूप दिवस त्यांच्याकडे राहून आता त्याच्या घरी गेला असावा, अशा शैलीत त्या बोलल्या.

एकदा मी माझ्या तीन वर्षांच्या मुलाला, झाडे त्यांचे स्वतःचे अन्न कसे तयार करतात, हे सांगत होते. झाडांच्या शरीरात एक प्रकारच्या पेशी असतात, त्यापासून ती स्वतःचे अन्न तयार करतात. अमेयला जेवणाचा खूप कंटाळा. त्यामुळे त्याची प्रतिक्रिया म्हणजे ‘झाडांना जेवावे लागत नाही ना? मग तू असे कर, त्या पेशी माझ्या शरीरात टाक. म्हणजे मला पण जेवावे लागणार नाही.’

माझ्या एका आठवीच्या विद्यार्थिनीच्या वहीचे पान वाया गेले की, तिला फार वाईट वाटायचे. गणितात पूर्ण पानाचा उपयोग होत नाही. गणित किंवा समीकरण लहान असेल तर उरलेल्या पानावर काहीच लिहीत नाहीत. तिला वाटायचे, तो पानाचा भाग वाया गेला. त्यावर ती लिहायची, ‘सॉरी पेज’. बाकी मुलांना मात्र गंमत वाटायची. काहींची प्रतिक्रिया अशी की, गेले एक पान वाया तर एवढे काय त्यात.

एकदा माझ्या दोन वर्षांच्या मुलाला मी संध्याकाळच्या संधिप्रकाशाने नटलेले आकाश दाखवित होते. त्यावर तो पटकन म्हणाला, ‘हे सगळे औषध कोणी सांडून ठेवलेय?’
एकदा रेल्वेने प्रवास करीत होते. नागपूर ते नाशिक रेल्वेत एक तरुण स्त्री तिच्या दोन-अडीच वर्षांच्या मुलाला जेवण भरवित होती. मुलाचे जेवणाकडे लक्ष नव्हते. कदाचित त्याला भूक लागली नसावी. ती स्त्री त्याच्यापुढे बोट नाचवत म्हणाली, ‘अरे, जेवला नाहीस तर बोटासारखा बारीक होशील. इतरांना दिसणार नाहीस’. त्यावर त्याने घास खाल्ला नाहीच, वर आईलाच विचारले, ‘आई, तुला हे बोट दिसत नाही? नाही दिसत?’ आईला बोट दिसत नाही, म्हणून त्या छोट्यालाच आईची काळजी वाटायला लागली होती.

मुलांच्या प्रतिक्रियाही आपल्याला विचार करायला लावतात. आमच्या शेजारी राहणाऱ्या एक बाई त्यांच्या तीन वर्षांच्या मुलाकडून ‘गुड मॅनर्स’ ही कविता पाठ करून घेत होत्या. कविता मोठी होती. दुसऱ्या दिवशी त्याला ती कविता वर्गात म्हणून दाखवायची होती. पाठ करून घेत असताना त्या मुलाला रागवतही होत्या. खूप बोलणी खाल्यावर त्या मुलाची प्रतिक्रिया अशी की, ‘तुला तरी ‘गुड मॅनर्स’ आहेत का? मला केव्हापासून रागावत आहेस?’ असेच एका दुसरीतल्या मुलाला शाळेच्या परीक्षेत कमी गुण मिळाले. म्हणून त्याने आईचे खूप बोलणे ऐकले. त्यावर त्याने लगेच प्रतिक्रिया दिली नाही; पण दोन तासानंतर त्याने फळ्यावर आईसाठी ओळी लिहिल्या ः 

Words are like swords
They hurt me a lot.

माझ्या मैत्रिणीचे नुकतेच लग्न झाले होते. जेवायला बसल्यावर नवऱ्याने अचानक विचारले, ‘आज खूप रडलीस का? माहेरची आठवण येत आहे का?’ तिला कळेचना, नवरा असे का विचारीत आहे? ती जेवायला बसल्यावर तिला उलगडा झाला. कारण भाजीत मीठ जास्त पडले होते. आठवीच्या वर्गातला एक मुलगा ‘गजनी’ चित्रपट बघून शाळेत आला. जरा खोडकरच होता म्हणा तो, त्या दिवशी प्रत्येक तासाला त्याचे उत्तर ठरलेले ः

Mam, short term memory loss.
एखाद्या दिवशी स्वतःचीच  छायाचित्रे बघत असताना वाटते, ‘अरे, आपण अजून चाळीशी पार केलेली वाटत नाही.’ पण नेमके त्याच दिवशी पस्तीशीची तरुणी आपल्याला ‘काकू’ म्हणणार. मग खूप राग येणार. पण, आपण ‘जाऊ दे, पाच सहा वर्षांनी तिला पण असाच अनुभव येईल कदाचित’ अशी प्रतिक्रिया देऊन आपले समाधान करून घ्यायचे.

जगात वाईट काहीच नाही. आपले अनुभव, वय, ज्ञान आणि परिस्थिती यानुसार प्रत्येकाची प्रतिक्रिया वेगळी असते एवढेच! हे बोलु श्रवणाचिये मौज आणिती गा।  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vaishali pandit articles