आम्ही 'आर्मी'कर

वसुधा माझगावकर
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

"आर्मी' म्हणजे युद्ध, तोफा, रणगाडे, अगदी फारच झाले, तर आर्मी म्हणजे मेसमध्ये होणाऱ्या पार्ट्या हा सर्वसामान्यांचा समज असतो; पण लष्कराचे स्वतःचे असे एक मोठे कुटुंबच असते.

"आर्मी' म्हणजे युद्ध, तोफा, रणगाडे, अगदी फारच झाले, तर आर्मी म्हणजे मेसमध्ये होणाऱ्या पार्ट्या हा सर्वसामान्यांचा समज असतो; पण लष्कराचे स्वतःचे असे एक मोठे कुटुंबच असते.

लग्नानंतर सासरचा उंबरठा ओलांडून नवीन घरी प्रवेश केल्यानंतर त्या घरातील नवीन रितीभाती, त्यांच्या दिनचर्या, खाण्याच्या पद्धती या सर्वांबरोबर जुळवून घेताना नवीन सुनेची जशी तारांबळ उडते ना, तसेच काहीसे या "आर्मी'च्या कुटुंबाचा उंबरठा ओलांडल्यावर होते. प्रत्येक दोन वर्षांनी नवीन शहरातील वातावरण, मिळालेले घर, नवीन शेजारी तेही वेगवेगळ्या प्रांतातील. या सर्वांशी जुळवून घ्यावे लागतेच; पण त्याखेरीज अशा बऱ्याच गोष्टी असतात, त्याची सवय करून घेणे सुरवातीला खूप जड वाटते. त्यातही एक गोष्ट म्हणजे काही नवीन व कधीही न ऐकलेल्या शब्दांची अनोखी भाषा.

माझे लग्न एका लष्करी अधिकाऱ्याशी झाले. कामाच्या ठिकाणी घर मिळालेले नव्हते. त्यामुळे माझे यजमान नोकरीवर रुजू होण्यासाठी एकटेच गेले. मी सासरी पुण्याला. एक महिन्यानंतर यजमानांचा फोन आला. ""अगं, आपल्याला घर मिळाले आहे. आता तुला लवकर इथे येता येईल. मी "वॉरंट' पाठवतोय...'' वॉरंट हा शब्द ऐकताच दचकायला झाले. आतापर्यंतच्या उण्यापुऱ्या आयुष्यात "वॉरंट' हा शब्द पोलिसांशी निगडित असतो एवढेच ठाऊक होते; पण आर्मीमध्ये बायकोला नवऱ्याकडे जाण्यासाठी वॉरंट वगैरे काढावे लागते!... काय गं बाई!

""अहो, वॉरंट वगैरे कशाला, तुम्ही बोलवले की, मी येणारच ना.'' माझा एक केविलवाणा प्रयत्न. त्यानंतर वॉरंट म्हणजे आर्मीमध्ये नवीन बदलीच्या जागी जाण्यासाठी देण्यात येणाऱ्या प्रवासखर्चासाठी भरावा लागणारा अर्ज, हे समजावण्यात आले. निघण्याच्या आदल्या दिवशी यजमानांचा फोन आला, "मी स्टेशनवर तुला नेण्यासाठी जीप घेऊन येईन. सामानासाठी "थ्री-टन' येईलच.' माझे यजमान स्टेशनवर प्रतीक्षेत उभे होते. तब्बल महिन्यानंतर एकमेकांना भेटत होतो. आमच्या त्या भेटीच्या सोहळ्यात त्यांच्याबरोबर आलेल्या जवानांनी माझे सामान कधी जप्त केले हे कळलेच नाही. आम्ही स्टेशनबाहेर आलो. "थ्री-टन' पाहायची उत्सुकता होती. मी पाहातच राहिले. "थ्री-टन' म्हणजे "शक्तीमान' या कंपनीचे ट्रकसदृश अवाढव्य वाहन उभे होते. माझ्या दोन सुटकेस आणि बेडिंग नेण्यासाठी एवढ्या "शक्ती' प्रदर्शनाची काय गरज होती, याचे कोडे उलगडेना!

कॅंटॉनमधील आमच्या घराजवळ पोचलो. एका जवानाने स्वागत केले. तो माझ्या यजमानाचा सहायक. गुलबचनसिंगने मोठ्या उत्साहाने घर दाखवण्यास सुरवात केली. दोन बेडरूमचे टुमदार घर. एक बेडरूम आमची होती, दुसऱ्या बेडरूममध्ये प्रवेश केला आणि थबकलेच. समोरच यजमानांच्या बुटांच्या पाच-सहा जोड्या अगदी व्यवस्थित मांडलेल्या होत्या. "ये साहबके डीएमएस बूट, ये पीटी शूज' तो आपला धडाधडा सांगत होता. डीएमएस परत एक नवीन शब्द. त्यात त्याने सतत एकच जप चालवला होता, ही खोली साहेबांची आहे. त्यांना सर्व शिस्तीत लागते. त्याच्या साहेबांचे त्यालाच कसे करावे लागते वगैरे. स्वयंपाकघरात जाऊन पाहिले, तर बरेच काही सामान हवे होते. गुलबचनला सांगितले, "दाल चावल लाना पडेगा'. तो म्हणाला, "चंगाजी'. पुढचा अर्धा तास माझ्या प्रत्येक सूचनेवर तो "चंगाजी' म्हणत होता. ऊर अगदी भरून आले, म्हणजे भारतीय जवान युद्धकाळातच "चंग' बांधत नाहीत, तर मला साधीशी मदत करण्यासाठीही चंग बांधत होता. नंतर कळले, की "चंगाजी' म्हणजे "ठीक आहे'.

आमच्या पलटनीच्या वर्धापन दिनाची आमंत्रणपत्रिका आली होती. त्यात सकाळी सात वाजता "एमएमजी' लिहिले होते. रात्री यजमानांनी नेहमीप्रमाणे सूचना केल्या, "उद्या साडी नेस गं.' अजूनपर्यंत एमजी म्हणजे मशिनगन ऐकले होते. मग आता साडी, एमएमजी यांचा मेळ लागेना. दुसऱ्या दिवशी सकाळी निमुटपणे वेळेवर साडी नेसून तयार राहिले. आमची गाडी पलटनीच्या आवारात थांबली. गाडीतून उतरल्यावर समोर दिसलेच एमएमजी, मंदिर-मस्जिद-गुरुद्वारा. संध्याकाळी आमच्या एका ऑफिसरकडे जेवणाचे निमंत्रण होते. जेवणानंतर निघायची वेळ आली आणि आमच्या कमांडिंग ऑफिसरने यजमान ऑफिसरला सांगितले, ""चलो भाई, मॅडमको बोलो हमे मूव्हमेंट ऑर्डर दिजीये, तो हम निकले।'' "मूव्हमेंट ऑर्डर' ही आर्मीतील एखादी व्यक्ती किंवा पलटन एखाद्या कामगिरीवर रवाना होणार असते, तेव्हा दिली जाते; पण खरे तर आज कोणाच्या तरी घरून निरोप घेताना पण "मूव्हमेंट ऑर्डर'ची गरज होती. गृहस्वामिनी उठून आत गेली आणि पान, बडीशेप याने सजवलेले तबक घेऊन बाहेर आली. ओह, "मूव्हमेंट ऑर्डर' म्हणजे निरोपाचा विडा-बडीशेप. त्या अन्नपूर्णेचा निरोप घेऊन घराबाहेर पडताना माझ्या या नवीन कुटुंबाच्या अनोख्या भाषेचा शब्दकोश छापून आणण्याचा चंग बांधला पाहिजे, असा एक खट्याळ विचार मनात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vasudha mazgaonkar write article in muktapeeth