ढोल वाजवलाच!

विद्या नेवे
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

इच्छा प्रबळ होती. महिनाभर घर-कार्यालय सांभाळून सराव केला आणि वय विसरून ढोल वाजवलाच.

इच्छा प्रबळ होती. महिनाभर घर-कार्यालय सांभाळून सराव केला आणि वय विसरून ढोल वाजवलाच.

गणपतीची मिरवणूक बघायला जायचे तेव्हा तेव्हा ढोल-ताशांच्या तालावर पाय ठेका धरायचे, ढोल वाजवण्यासाठी हात शिवशिवायचे. ती शिस्तबद्ध लयीत वाजवणारी, जोशपूर्ण पथके पाहून आपणही ढोल वाजवावा असे वाटायचे. घरच्यांची परवानगी मिळवली. नवरा, मुलांनी पूर्ण सहकार्य करायचे मान्य केले. साहेबांनी एक महिना लवकर जाण्याची परवानगी दिली. एका नामांकित पथकात चौकशी केली. या वयात आपल्याला पथकात घेणार ना? आपल्याला हे सर्व झेपेल? सर म्हणाले, ""या तुम्ही. पण कोणत्याही प्रकारची सवलत मिळणार नाही. ढोल ताणणे, स्वतःच कमरेला ढोल बांधणे, मिरवणुकीच्या जागेवर स्वतः ढोल घेऊन जाणे इत्यादी करावे लागेल.'' सराव सुरू झाला. पहिल्यांदा ढोलची दोरी कमरेभोवती आवळली, तेव्हा जे वाटले ते शब्दात सांगू नाही शकत. इथे नवीन मित्र-मैत्रिणी भेटल्या. रोज महिनाभर न चुकता सराव केला. सरावादरम्यान भलामोठा ढोल बांधून मैलभर चालणे, चालता चालता ढोल वाजवणे सुरू झाले. ध्वज फडकावणे, झांज वाजवणे यांचाही सराव केला. सुरवातीला हात, बोटे खूप दुखायची. टिपरू लागून जखमा झाल्या बोटांना. वादनात चुका झाल्यावर सरांचा भरपूर ओरडा खाल्ला; पण जिद्द होती, मिरवणुकीत ढोल वाजवायचाच.

मिरवणुकीचा दिवस जवळ येऊ लागला तशी अजूनच उत्कंठा वाढली. नवीन बूट, पांढराशुभ्र ड्रेस, भगवी ओढणी अशी जय्यत तयारी झाली. अखेर तो क्षण आला. थोडी उत्सुकता, थोडे दडपण. सराव करताना वाजवणे वेगळे अन्‌ जनसमुदायासमोर वाजवणे वेगळे. कडक वेशभूषा- केशभूषा, कपाळावर गंध, नाकात नथ, फेटा इत्यादी जय्यत तयारी झाली. गणपती बाप्पा, शिवाजी महाराजांच्या नावाचा जल्लोष झाला आणि ताशा कडाडला. ढोलाचा पहिला ठेका पडला. भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाच्या मिरवणुकीत मी प्रथमच तब्बल तीन तास ढोल वाजवला व तृप्त झाले. नंतरही काही मंडळांच्या गणपती मिरवणुकीत ढोल वाजवला. अजूनही डोक्‍यात एकच झिंग.. ताशावर मनमुराद बरसणाऱ्या काडीची... ढोलावर पूर्ण ताकदीने तरंग उठवणाऱ्या टिपरूची....


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vidya newe write article in muktapeeth