सहज आणि थेट

विजय तरवडे
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

आपले लेखन वाचकांपर्यंत पोचवण्यासाठी वाचकांच्या दिशेने आपणदेखील काही पावले टाकायला हवीत, असे एका अभिजात लेखकाने म्हटले आहे. लेखकाची इच्छा उत्कट आणि प्रामाणिक असेल, तर तो वाचकांपर्यंत सहज पोचू शकतो.

आपले लेखन वाचकांपर्यंत पोचवण्यासाठी वाचकांच्या दिशेने आपणदेखील काही पावले टाकायला हवीत, असे एका अभिजात लेखकाने म्हटले आहे. लेखकाची इच्छा उत्कट आणि प्रामाणिक असेल, तर तो वाचकांपर्यंत सहज पोचू शकतो.

पूर्वी दुर्बोध लेखनाच्या संदर्भात एका अभिजात लेखकाची मुलाखत वाचली होती. आपले लेखन वाचकांपर्यंत पोचवण्यासाठी वाचकांच्या दिशेने आपणदेखील काही पावले टाकायला हवीत, असे काहीसे विधान त्यांनी केले होते. ते विधान बरेच दिवस मनात रुजलेले आहे. कुठल्याही विषयावर आणि कुठेही लिहिताना माझ्या मनात दोन विचार असतात - वाचकांना हे समजेल का आणि आवडेल का... कोणत्याही विषयावर लिहायचे असेल, तर आपले मत आणि मतभेद वाचकांना समजतील आणि आवडतील अशा पद्धतीनेच मांडायचे.

हे वाचक आहेत तरी कुठे? काय करतात ते? त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी मला काय करावे लागेल? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मी "सोशल मीडिया'कडे वळलो आणि सांगायला अतिशय आनंद होतो, की तिथे मला माझे वाचक सापडले. सेवानिवृत्तीनंतर मी "सोशल मीडिया'त प्रवेश केला. योगायोग असा, की त्या वेळी मी ज्या नियतकालिकांसाठी लेखन करत होतो, त्यांनीदेखील "सोशल मीडिया'त पदार्पण केले होते.

मी माझ्या लेखनातील काही अंश (ट्रेलर किंवा टीझर्स) प्रसारित करायला सुरवात केली. "सोशल मीडिया'त मित्रांची निवड करताना आधी कला, साहित्य आणि माध्यम क्षेत्रातील मित्र निवडले. त्यांच्याशी सूर जुळल्यावर इतर क्षेत्रातील समानशील स्नेही शोधले. गेली सहा वर्षे ही प्रक्रिया चालू आहे. "मेसेंजर' किंवा अन्य माध्यमांतून आम्ही मित्र बोलतो तेव्हा फक्त साहित्य आणि कला विषयांवरच बोलतो. आमचे विविध मित्रसमूह आहेत. त्यातले स्नेही विविध क्षेत्रातले असले तरी साहित्य आणि कलेवरील प्रेम हाच आम्हाला जोडणारा एकमेव धागा आहे.

या स्नेहीजनांशी संवाद साधताना, क्वचितप्रसंगी प्रत्यक्ष भेटताना मला जाणवत होते, की चांगला चित्रपट, चांगले नाटक, चांगला कार्यक्रम आणि चांगले पुस्तक असेल, तर माणसे त्यासाठी खर्च करायला तयार होतात. चित्रपट-नाटके चालत नाहीत, पुस्तके खपत नाहीत, ही ओरड खरी असेल, तर त्याची दोन कारणे ः चित्रपट-नाटके-पुस्तके ही ग्राहकांना आवडत नाहीत किंवा त्यांच्यापर्यंत पोचत नाहीत.

चित्रपट-नाटकांच्या निर्मितीविषयी मला कल्पना नाही; पण पुस्तकांची मला आवड आहे. आवडलेली पुस्तके मी आवर्जून विकत घेतो. माझ्या वर्तुळातले स्नेहीदेखील विकत घेताना दिसतात. एकदा माझ्या मित्रयादीतले एक लेखक स्नेही डॉक्‍टर अशोक माळी मिरजेहून पुण्याला आले होते आणि त्यांनी "फेसबुक'वर "पोस्ट' टाकली होती. त्यांच्या लेखनाविषयी आकर्षण असल्यामुळे त्यांना भेटायला मी डेक्कन जिमखान्यावरील एका उपाहारगृहात गेलो. माझ्याप्रमाणेच त्यांचे अनेक चाहते वाचक-मित्र आले होते. आम्ही एकत्र चहा घेतला. सर्व मित्रांनी त्यांच्याकडून पुस्तके घेतली. या घटनेने मला प्रेरणा दिली.

गेली सहा वर्षे केलेल्या लेखनातून निवडक भाग घेऊन मीदेखील पदरमोड करून दोन पुस्तके छापली. निवडक भाग घेऊन याचा अर्थ ज्या लेखनाला "सोशल मीडिया'वर अनुकूल प्रतिसाद मिळालेला होता तो भाग... त्यातल्या एका पुस्तकासाठी मंगला गोडबोले यांनी आटोपशीर "पाठराखण' लिहून दिली. दुकानात जाऊन पुस्तके विकायला ठेवणे या प्रकाराशी मी अनभिज्ञ आहे. मी फक्त माझ्या "सोशल मीडिया'वरच्या मित्रांना पुस्तके द्यायचे ठरवले. परगावच्या मित्रांना पत्ते विचारले आणि कुरिअरने पुस्तके धाडली. पुस्तके वाचल्यावर त्यांनी दिलेला प्रतिसाद अतिशय आनंददायी होता. अगदी पहिला प्रतिसाद आला तो ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांचा. त्यांनी दूरध्वनीवरून माझे अभिनंदन केले, तेव्हा तो सुखद आश्‍चर्याचा धक्का होता. नंतर त्यांनी माझ्या पुस्तकावर एक छान "पोस्ट'च लिहिली. आनंद देशमुख, एकनाथ बागूल, उल्का राऊत, चित्तरंजन भट, जयंत जोशी, मंगला गोडबोले, मुग्धा कर्णिक, रजनीश जोशी, राधा भावे, लीना पाटणकर, विश्वास वसेकर, वैष्णवी देव, संतोष लहामगे, साधना राजवाडकर, सुरेशचंद्र वैराळकर, सुवर्णा भावे जोशी आणि अनेक मित्रांनी विविध माध्यमांत माझ्या पुस्तकाचे रसग्रहण केले.

दर रविवारी सकाळी आम्ही मित्र टिळक चौकातल्या "रिगल हॉटेल'मध्ये चहाला जमतो. "सोशल मीडिया'वर मी हे कळवल्यावर अनेक वाचक-मित्र रविवारी तिथे भेटू लागले. त्यांना पुस्तक आणि चहा देण्यात मला मनापासून आनंद झाला. पुस्तक न्यायला आलेल्या अशा सर्व मित्रांबरोबर मी प्रेमाने छायाचित्र घेतले आणि ते "सोशल मीडिया'वर प्रसारित केले. मोठे लेखक पुस्तके लिहितात. नंतर वाचक त्यांची पुस्तके घेतल्यावर त्यांना भेटून स्वाक्षरी घेतात. मी मोठा लेखक नाही. वेगवेगळ्या विषयांवर माझे विचार मांडणारा, गोष्टी-कादंबऱ्या लिहिणारा एक छोटा लेखक आहे; पण "सोशल मीडिया'च्या मदतीने मी शंभरहून अधिक वाचकांपर्यंत थेट पोचलो. त्यांच्याशी दूरध्वनीवर किंवा "मेसेंजर'वर संवाद केला. पुण्यातल्या वाचकांना तर प्रत्यक्ष भेटून आम्ही चहादेखील घेतला.

लेखकाची इच्छा उत्कट आणि प्रामाणिक असेल, तर तो वाचकांपर्यंत सहज पोचू शकतो.
इतकेच.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vijay tarawade write article in muktapeeth