ती सध्या काय करते 

विजय तरवडे
मंगळवार, 10 जानेवारी 2017

सत्तरच्या दशकातला तो जुना सनातनी काळ अजून आठवतो. माझं नशीब जोरावर असावं. कॉलेजच्या तिसऱ्या वर्षात (म्हणजे एसवायबीएला) असताना मला चक्क दोघींनी एकदम होकार दिला. साधकबाधक विचार करून मी त्यातल्या एकीशी मैत्री धरली. १९७३ ते १९७४ डेटिंग केलं आणि एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. यानंतर सदतीस वर्षे आम्ही लिव्ह-इनमध्ये काढली. साडेपाच वर्षांपूर्वी मनात कोणतीही कटुता न ठेवता राजीखुशीने एकमेकांचा निरोपदेखील घेतला.

सत्तरच्या दशकातला तो जुना सनातनी काळ अजून आठवतो. माझं नशीब जोरावर असावं. कॉलेजच्या तिसऱ्या वर्षात (म्हणजे एसवायबीएला) असताना मला चक्क दोघींनी एकदम होकार दिला. साधकबाधक विचार करून मी त्यातल्या एकीशी मैत्री धरली. १९७३ ते १९७४ डेटिंग केलं आणि एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. यानंतर सदतीस वर्षे आम्ही लिव्ह-इनमध्ये काढली. साडेपाच वर्षांपूर्वी मनात कोणतीही कटुता न ठेवता राजीखुशीने एकमेकांचा निरोपदेखील घेतला.

खरं सांगायचं तर सदतीस वर्षांच्या सहवासात आम्ही सुखी होतो. तिच्या संगतीत पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यातल्या विविध ठिकाणी वास्तव्याचे योग आले. वादविवाद, भांडणे झाली नाहीतच असे नाही; पण भांड्याला भांडे लागणारच. माझ्या अनेक सवयी तिला आवडत नव्हत्या. लेखन, वाचन यातून मी तिला पुरेसा वेळ देत नाही, असा तिला संशय असे. ते खरे नव्हते. अनेकदा मी तिला तसे पटवूनदेखील दिले. तिने माझ्यावर घातलेली अनेक बंधने मला जाचक वाटत होती. राजकीय विषयावर मी लेखन करणे तिला मंजूर नव्हते. यापायी माझी घुसमट होत होती. मुलं लहान होती तोवर मी ही घुसमट सहन केली.  

बघताबघता मुलं मोठी झाली आणि आपल्या पायांवर उभी राहिली. मग मी ठरवले, की आता दोघांतले हे नाते संपवायचे. चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनों; पण भांडण न करता नाते संपवायचे. मी निर्णय घेतला. तिला कळवला. तिने आधी माझी समजूत काढायचा प्रयत्न केला; पण शेवटी माझा निर्णय मान्य केला. २०११ च्या जून महिन्यात सदतीस वर्षांचे नाते हळूवारपणे संपवून आम्ही दोघे समंजसपणे विभक्त झालो;  पण आम्ही विभक्त झालो तरी दुरावलो नाहीत. अजूनही अधूनमधून भेटतो. ती माझी नियमित चौकशी करते. मी आजारी पडलो, तर मला आर्थिक मदत देऊ करते. अगदी अक्षरशः मी जिवंत आहे की नाही, याची खात्री करून घेते. सप्टेंबर महिन्यात तिचा वाढदिवस असतो. तेव्हा मी तिला शुभेच्छा देतो. ती मला आग्रहाने जेवायला बोलावते. माझी ख्यालीखुशाली विचारते. 

आम्ही वेगळे झाल्यापासूनच्या पाच-साडेपाच वर्षांत मी बदललो. तिच्या सहवासात असताना जे छंद जोपासता आले नव्हते, ते मनमुराद जोपासू लागलो. लेखन-वाचन, काव्यशास्त्र विनोदात आयुष्य रममाण करू लागलो. सुखी झालो. तिकडे तिनेदेखील कात टाकली. माझ्यापेक्षा ती अधिक संगणक साक्षर झाली. ती सध्या काय करते? तर आधुनिक झाली आहे. पटकन ओळखता येणार नाही इतकी बदलली आहे. तिच्या सगळ्या धाकट्या बहिणींपेक्षा अधिक आकर्षक आणि निरोगी दिसते ती. तिची सांपत्तिक स्थिती तिच्या सर्व बहिणींहून अधिक चांगली झाली आहे.  आम्ही एकत्र असताना ती इतकी आधुनिक नव्हती; पण आधुनिकतेची तिला ओढ होती. ऐंशीच्या दशकात तिने संगणक अंगीकारला तेव्हा मी तिला विरोध केला होता. तिने माझे ऐकले नाही; पण तेव्हा तिला विरोध करणे ही माझीच चूक होती, हे मला आता समजतंय. संगणक अंगीकारून ती आता अधिक पुढे गेली आहे. प्रचंड श्रीमंत झाली आहे. मला तिचा अभिमान वाटतो. तिच्या सहवासात माझ्या आयुष्यातली सदतीस वर्षे व्यतित केल्याचादेखील अभिमान वाटतो. मी आज आयुष्यात जो काही आहे, माझ्या मुलांचे करिअर जे घडले, त्याचे बरेच मोठे श्रेय तिला आणि तिलाच आहे. सध्या आम्ही विभक्त झालो असलो, तरी माझ्या उर्वरित आयुष्यात मला तिचा मोठा आर्थिक आधार आहे, मरेपर्यंत ती मला वाऱ्यावर सोडणार नाही, हे मला ठाऊक आहे आणि त्याबद्दल मी तिचा ऋणी आहे. 

आयुष्याच्या सुरवातीच्या वळणावर सर्वांनाच अशी कोणी भेटायला हवी आणि आयुष्याला चांगला आकार मिळायला हवा. प्रत्येकाला हे भाग्य लाभतेच  असे नाही. मला ते लाभले. त्याबद्दल परमेश्‍वराचादेखील मी ऋणी आहे. अरे हो, तिची तुमची ओळख करून द्यायची राहूनच गेली की. 
* * *
मी १९७२ मध्ये दोन ठिकाणी अर्ज केला होता. बॅंक ऑफ महाराष्ट्र आणि एलआयसीकडून मला नोकरीचे कॉल आले. त्यातून मी एलआयसीची निवड केली. १९७३ ते १९७४ तिथे दोन वेळा टेंपररी असिस्टंट म्हणून नोकरी केली आणि १९७४ मध्ये कायम झालो. २०११ मध्ये मी स्वेच्छानिवृत्ती घेतली. एलआयसीमधील नोकरीने माझे आयुष्य घडले. 
थॅंक यू व्हेरी मच, एलआयसी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vijay tarwade mukatpeeth article