मुक्‍या सावल्या

विजया कामत
मंगळवार, 22 मे 2018

आयुष्यात शेवटच्या टप्प्यात आयुष्यातील जुन्या चांगल्या आठवणीच मनाला उभारणी देतात. त्याच्या आधारे आयुष्य जगावे लागते. स्मृतीच्या मुक्‍या सावल्या अलगदपणे डोळ्यांसमोरून जात असतात.

आयुष्यात शेवटच्या टप्प्यात आयुष्यातील जुन्या चांगल्या आठवणीच मनाला उभारणी देतात. त्याच्या आधारे आयुष्य जगावे लागते. स्मृतीच्या मुक्‍या सावल्या अलगदपणे डोळ्यांसमोरून जात असतात.

आज मी 80 वर्षांत पदार्पण केले. खरेच वाटत नाही. ऋतुपाठोपाठ आयुष्याची पाने वाऱ्यासारखी फडफडत गेली. कशी कळणार? पैशांची कसरत, सासू-सासऱ्यांच्या आवडीनिवडी, नणदांचे टोमणे हे झाले भूतकाळातले; पण वर्तमान आठवला तेव्हा खरंच पायाला जणू चक्र लागलेले. लेकीचे, सुनेचे बाळंतपण, बारसे यातून नातवंडाचे बारसे ""आजी शिरा कर ना ग!, तर सून लाडात येऊन सासूबाई, काही म्हणा. तुमच्या पुरणपोळ्या जणू रेशमी साडीची घडी उलगडावी तशा अगदी लुसलुशीत होतात.'' करा म्हणून नाही सांगणार; पण हलकासा इशारा देणार.

अशा अनेक मागण्या पुरवता पुरवता नातवंडं मोठी झाली. दिवस कसे गेले आणि आता काय उरले? काही नाही! चार विटांच्या भिंतीचे घर व फर्निचर, अबोल ठोकळे, ना पलंगावर सुरकुत्या, पायांचे डाग पडतील म्हणून आजोबांचा ना राग! चित्रासारखे स्तब्ध, कोणासाठी मी इथे राहते. अहो कोणासाठी म्हणजे? माझा श्‍वास चालतो ना? घड्याळाच्या टिक्‌टिक्‌प्रमाणे बॅटरी जुनी झाली की घड्याळ बंद पडते. पण या शरीराच्या आतील बॅटरी बंद पडायला त्यात खूप गोष्टी सामावलेल्या असतात. आपल्या इच्छा, चांगल्या, वाईट कृती, मोह, आसक्ती या सर्वांना सोडून ती थोडीच जाणार?

"अरे नानू, टीव्ही किती वेळ चालू ठेवला आहेस? आता पुरे रे'' असे आजोबा ओरडायचे. ती इंग्लिश गाणी, ना सूर ना लय असह्य वेदनांनी कोणीतरी ओरडत आहे, असे वाटायचे. बोलणार कोण?
टीव्हीचा ठोकळा पाहिल्यावर भूतकाळातील स्मृती ओलावल्यावर आजोबांचा राग पाहिल्यावर नातवंडं म्हणायची, ""आजू इंग्लिश गाणी अशीच असतात. म्हणून तर वृद्ध "ओल्ड होम'मध्ये जाऊन राहतात. पण ओरडायला आज आजोबाच कुठे आहेत? म्हातारपणाचा ताप म्हणून काठी धरण्याआधीच परतीची वाट धरली. नातवंडं लहान असताना आजोबा हात धरून फिरायला नेत असत. शिक्षणाने डिग्रीची फुले, फळे मिळायला लागली. पैशांना नवे पंख दिसू लागले. कोणी पीएचडी करायला अमेरिकेला जाण्याचा विचार करू लागले. धाकटी जान्हवी बारावी झाल्यावर पुढच्या शिक्षणासाठी परदेशात जायची स्वप्ने पाहत होती. मी काय बोलणार? आताच सूनबाईने जान्हवीला ताकीद दिली. ""जा तू सेटल झाल्यावर येईन बघ तुझ्याकडे!'' माझ्या डोळ्यांपुढे मात्र टीव्हीचा काळा स्क्रीन डोळे वटारून बघत होता.
तरीही आज चार भिंतीच्या आत मी एकटी राहते. पाय कधीमधी डगमतात. मन तरुण असले तरी शरीर काही गोष्टींना साथ देत नाही. तसे न चुकता योगा, प्राणायाम वगैरे मी करते. नाहीतर ठोकळाच झाला असता माझा.

पण मनाने ठरवले, मी एकटी कुठे आहे? आईने मला छोट्या बालगोपाळला नमस्कार करायचे संस्कार शिकविले. गोपाळ मोठा होऊन माझ्या पाठीशी आहे. त्याने माझ्या पदरात कितीतरी कलेचे दान दिले. त्या कलेचा उपयोग करून माझ्या बुडत्या संसाराला मदत केली. माझ्या गोपाळाने अदृश्‍य रूपाने मला आधार दिला व कलेच्या बहुतेक सर्व पायऱ्या मी अवगत केल्या. मुक्‍या सावल्या पुढे सरकत होत्या. माझा सुपुत्र माधव बायकोला घेऊन अमेरिकेला गेला. जान्हवीला धीर द्यायला पण आई एकटी असणार, तिला धीर द्यायला कोणीतरी हवे, असे कोणालाही वाटले नाही आणि कन्या ऑस्ट्रेलियाला जाऊन तिथेच स्थायिक झाली.
मुक्‍या सावल्यांनी भूतकाळात प्रवेश केला. कधी एकटी असल्यावर भूतकाळातल्या जुना बटवा उघडून त्यातील गोड आठवणीची चव घेत बसते. माझ्या गुरूने मला भरपूर साथ दिली. जुन्या आठवणीत वर्तमानातील म्हातारपणची सूचना अगदी नकळत जाणवू लागल्या.

मनाच्या स्वच्छ तळ्यात कधी गढूळता आली नाही. त्यामुळे मनातून एकटेपणा जाणवत असला, तरी विचारांना गरुडपंख लावून उंच भरारी मारण्याचे स्वभावात मुरलेले! म्हणजे माझ्या स्वाभिमानाच्या स्वच्छ पांढऱ्या वस्त्रांवर कधी खोटेपणाचा डाग पडू दिला नाही.
स्मृतीच्या मुक्‍या सावल्या तिन्ही सांजेप्रमाणे पुढे सरकल्या. पिकले केस. तोंडावरच्या सुरकुत्या, थरथर कापणारे हात, याने खूप काही सहन केल्याचे उदाहरण देत होते. स्पर्शावरून मुलांची, नातवंडाची आठवण आली. प्रत्येक स्पर्शाचा अनुभव वेगळा. बाज वेगळा. मुलांच्या प्रेमाचा स्पर्श अगदी गोड. समर्पणाच्या भावनेने केलेला स्पर्श, वात्सल्याच्या भावनेत प्रेमाने भिजलेला आईचा स्पर्श, आठवणी जिवंत झाल्या हुंदक्‍याची माळ सरसरली.

सूर्याच्या अस्तास जाणाऱ्या प्रकाशाचा माझ्या मुक्‍या सावलीने आधार घेतला. नारिंगी रंगाची शाल पांघरून क्षितिजाने सूर्याचे स्वागत केले. आकाशाच्या आंतरपाटामध्ये लुकलुकणाऱ्या चांदण्याचा मुंडावळ्या बांधलेला सूर्य क्षितिजाला माळ घालायला उभा आहे, असा मला भास झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vijaya kamat write article in muktapeeth