बेघर पिता

विलास पळशीकर
शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018

उतारवयात घर, रिक्षा मुलाच्या नावावर केले आणि जन्मदात्यालाच बेघर व्हावे लागले. कुणाच्या तरी कृपेवर आता तो जगतो आहे.

उतारवयात घर, रिक्षा मुलाच्या नावावर केले आणि जन्मदात्यालाच बेघर व्हावे लागले. कुणाच्या तरी कृपेवर आता तो जगतो आहे.

वॉकिंग ट्रॅकच्या कट्ट्यावर एक साठी-पासष्टीचे गृहस्थ तीन-चार कॅरी बॅगमधून आणलेले अन्न जेवत बसले होते. मी त्यांना "रामराम' अशी हाक देताच त्यांनी "या जेवायला' असे निमंत्रण दिले. मी त्यांच्या बाजूला बसलो. विचारले, 'भाऊ, तुम्ही असे मळके कपडे, अस्वच्छ चेहरा, केस अस्ताव्यस्त, बरेच दिवस स्नान न केलेले असे का आहात?'' ते म्हणाले, 'मी पूर्वी स्वारगेटजवळ फ्लॅटमध्ये राहत होतो. व्यवसायाने रिक्षा ड्रायव्हर आहे. पत्नी नऊ वर्षांपूर्वी गेली. मुलाचे लग्न झाले.'' 'अहो मग तुम्ही असे रस्त्यावर का?'' 'आम्ही स्वारगेट जवळचा फ्लॅट चाळीस लाखांना विकला. इकडे नऱ्हे धायरी भागात बारा लाखांत चांगला फ्लॅट घेतला. उरलेल्या पैशात एक नवीन रिक्षा घेतली. राहिलेले पैसे व सर्व प्रॉपर्टी मुलाच्याच नावाने केली. कारण मी आता थकलोय. मी रोज आठ-दहा तास रिक्षा चालवून हजार-पंधराशे कमवत होतो. छानच चालले होते. पण अचानक एकेदिवशी मुलाने रिक्षासाठी वेगळा ड्रायव्हर ठेवला. माझे काम बंद केले. नुसते कामच बंद न करता त्याने मला घरातून हाकलूनही दिले. तेव्हापासून मी असाच वेड्यासारखा भटकत आहे. कोपऱ्यावरचा हॉटेलवाला लोकांनी टाकलेले अन्न दोन-तीन पिशव्यांमध्ये वेगवेगळे ठेवतो. मला रोज बारा-साडेबाराला जेवण मिळते. ते अन्न घेऊन रोज मी या कट्ट्यावरच जेवतो. एक पाण्याची बाटली आणली की झाले. कधी कधी मानसिक अवस्था चांगली असेल तर कॅनॉलमध्ये अंघोळ करतो. या एका मोठ्या पिशवीत माझे सर्व कपडे, लायसेन्स, कागदपत्रे असा माझा संसार आहे.''

मी एक शंभराची नोट त्यांच्या हातात दिली, म्हणालो, 'जर माझ्या ऑफिसमध्ये आलात व मला कामात थोडी मदत केली तर तुमची दोन वेळची जेवणाची सोय नक्की होईल. एवढे काम मी तुम्हाला देईन.'' माझे व्हिजिटिंग कार्ड त्यांना दिले व आमची भेट संपली. घरी परतताना एकच विचार छळत होता, मुले जन्मदात्यांशी अशी का वागतात?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vilas palshikar write article in muktapeeth