esakal | स्वप्नपूर्ती : एका अनोख्या छंदाची
sakal

बोलून बातमी शोधा

muktapeeth

स्वप्नपूर्ती : एका अनोख्या छंदाची

sakal_logo
By
विनीत जोशी

मंगेशकर भगिनींच्या आवाजाचा निस्सीम चाहता असल्याने एका अनोखा छंद जोपासला गेला. या छंदामुळेच मला लता मंगेशकर यांच्यासह सर्व भगिनींना थेट भेटून बोलता आले.

आयुष्यात समजायला लागल्यापासून ज्या सुरांनी अव्याहतपणे मनावर अधिराज्य गाजवलं ते सूर म्हणजे अर्थातच मंगेशकर या वलयांकित नादब्रह्माचे. शाळेत असताना आशा भोसले नामक अद्‌भुत आवाजाचा मी निस्सीम चाहता होतो. रेडिओवर आणि कॅसेटवर आशाताईंनी गायलेली आणि पं. हृदयनाथ मंगेशकरांनी स्वरबद्ध केलेली गाणी ऐकणं हा अविभाज्य भाग होता. काही दिवसांनी लता मंगेशकर या दैवी सुरांची ओळख झाली. "सुन्या सुन्या मैफलीत माझ्या', "गगन सदन तेजोमय' अशी काही गाणी मी कॅसेट रिवाईंड करून वारंवार ऐकत असे. त्या आवाजातली आर्तता काहीतरी भलतीच आणि काळजापर्यंत जाणारी होती. नंतर लतादीदींच्या कॅसेट्‌स आणणं आणि ती गाणी ऐकणं हा नादच लागला. त्या आवाजाची नक्कल करणं कोणालाही जमलं नाही. सुरांवर प्रचंड हुकूमत असलेला थेट हृदयापर्यंत भिडणारा आवाज ऐकला तो म्हणजे उषाताईंचा. "आता लावा लावा शिळा,' या ज्ञानदेवांच्या समाधीचं आर्ततेने वर्णन करण्यापासून ते पिंजरा चित्रपटातील लावण्यांपर्यंत आणि मुंगळा मुंगळापासून ते जय संतोषी मॉंच्या आरतीपर्यंत अशी प्रचंड रेंज असणारा आवाज मनावर अधिराज्य गाजवू लागला.

मंगेशकर कुटुंबावर प्रेम करत असताना सुमारे 15 वर्षांपूर्वी मुंबईत असताना एका इंग्रजी दैनिकात मीनाताईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एकत्र जमलेल्या अत्यंत घरगुती वातावरणात हास्यविनोदात रंगलेल्या मंगेशकर भगिनींचे छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. ते मला इतके आवडले, की त्याचं कात्रण करून वहीत चिकटविले. तिथेच माझ्या अनोख्या छंदाची सुरवात झाली.

वृत्तपत्रांमधून या कुटुंबाविषयी छापून येणाऱ्या बातम्या, लेख, छायाचित्र, मुलाखती, किस्से यांची कात्रणं स्पायरल बाइंडिंग केलेल्या कार्डशीट पेपरच्या वहीत चिकटवणं हा नित्याचाच भाग बनला. मग हळूहळू आशाताई, उषाताईंचे वेगवेगळे स्टेज शोज्‌ त्यांना देश-परदेशांत मिळालेले पुरस्कार त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांना लावलेली हजेरी, अगदी वाढदिवसाला केक कापण्यापासून ते रेकॉर्डिंगपर्यंतची वेगवेगळी छायाचित्रे असा सुंदर खजिना तयार होऊ लागला. माझे मित्र, ओळखीचे लोकसुद्धा मला कात्रणं देत.
हे सगळं कलेक्‍शन या बहिणींपैकी कोणीतरी बघावं ही सुप्त इच्छा होती. ती पूर्ण झाली उषाताईंमुळे. त्या 2011 मध्ये एप्रिल महिन्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाआधी शांतपणे संपूर्ण वही पाहून त्यांनी माझं कौतुक केलं. ज्या छायाचित्रापासून माझ्या कात्रणाच्या छंदाची सुरवात झाली, त्या छायाचित्राच्या पानावर त्यांनी स्वाक्षरी केली. नंतर उषाताईंनी सांगितल्यानुसार लगेचच्या मे महिन्यात एका कार्यक्रमात मीनाताईंची स्वाक्षरी मिळाली. नंतर 11-11-11 या दिवशी, आशाताईंनी सर्वाधिक भाषांमध्ये 11,000 हून अधिक गाणी गाण्याचा जो विक्रम केला, त्या निमित्ताने पुण्यात त्यांचा सत्कार आयोजित केला होता. त्या वेळी सुधीर गाडगीळ यांनी मला आशाताईंची स्वाक्षरी मिळवून दिली.

आता त्या छायाचित्रातील चार बहिणींपैकी तीनही बहिणींच्या स्वाक्षऱ्या मिळाल्या होत्या. आता दीदींची स्वाक्षरी कशी मिळेल याकडे मन धावत होतं. प्रयत्न करूनही स्वाक्षरी मिळण्याचा योग येत नव्हता. तो योग 6 वर्षांनंतर ऑगस्ट 2017 मध्ये जुळून आला आणि तो सुद्धा अर्थातच उषाताईंमुळेच.

एका कार्यक्रमाच्या निमित्ताने उषाताई पुण्यात आल्या होत्या. त्यांना भेटलो. वही दाखवीत त्यांना म्हणालो, की या पानावर फक्त दीदींचीच स्वाक्षरी राहिली आहे. ती मिळवून द्यायला तुम्ही मला मदत करू शकाल का? उषाताई थोड्याशा हसल्या आणि म्हणाल्या, की दीदी तर मुंबईत आहे, पुण्यात नाही. मी मनाचा हिय्या करून म्हटलं, की मग मी मुंबईत येऊ का? मी दीदींना अजिबात "डिस्टर्ब' करणार नाही. क्षणाचाही विलंब न लावता उषाताईंनी मला थेट मुंबईत त्यांच्या घरी बोलावले आणि दीदींची स्वाक्षरी मी मिळवून देते म्हणून सांगितले.

आणि शेवटी मुंबईला जाण्याचा दिवस उगवला. 7 ऑगस्ट 2017 श्रावणी सोमवारी नारळी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी प्रभुकुंज येथे उषाताईंना भेटलो. त्या अतिशय आपुलकीने माझ्याशी बोलल्या. हॉलच्या शेजारील खोलीत दीदी विश्रांती घेत होत्या. उषाताईंनी मला दीदींची स्वाक्षरी मिळवून दिली. मी दीदींना मनोमन नमस्कार केला. दीदींवर केलेली कविता आणि हैदराबादहून आणलेली अत्तराची कुपी उषाताईंना दिली. आता त्या पानावर करोडो रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या चारही मंगेशकर भगिनींच्या स्वाक्षऱ्या विराजमान झाल्या. एका अनोख्या छंदाचा 15 वर्षांपूर्वी सुरू झालेला प्रवास प्रभुकुंज येथे सुफळ संपूर्ण झाला. या छंदामुळेच मला भारतरत्न गानसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर यांच्या घरी जाण्याची संधी मिळाली आणि ती फक्त उषाताईंमुळेच ! उषाताई तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद !

loading image