एक अवलिया

muktapeeth
muktapeeth

क्रिकेट हा आम्हा दोघांना जोडणारा धागा. कॉफीहाऊसला मित्रांच्या घोळक्‍यात त्याची आणि माझी पहिल्यांदा भेट झाली. त्याच्याजवळच्या क्रिकेटविषयीच्या अफाट माहितीसाठ्याने मी त्याच्याकडे ओढला गेलो.

महाविद्यालयात शेवटच्या वर्षाला होतो. मी संध्याकाळी मित्रांबरोबर पूना कॉफीहाऊसला जाऊन बसायचो. तिकडे गप्पांचा एक मोठा अड्डा भरत असे. तेथेच शरद जोशी आणि माझी ओळख झाली. आम्हाला दोघांनाही क्रिकेटचा चांगलाच नाद होता. त्यामुळे मुख्यतः क्रिकेटवर गप्पा होत. त्या वेळी आपले भारतीय वीर म्हणजे पतौडी व चंदू बोर्डे आणि फिरकी त्रिकूट म्हणजे चंद्रशेखर - बेदी व प्रसन्ना. ही आमची जणू दैवतच होती. त्याखेरीज वेस्ट इंडीजचे सोबर्स, कन्हाय, वॉरेल, हॉल, गिब्ज आणि ऑस्ट्रेलियन खेळाडू हार्वे, ओनील, बेनॉ, लिंडवॉल, मिलर यांचीही उजळणी व्हायची. मला क्रिकेटचे वेड होते खरे, पण शरद त्या बाबतीत माझ्यावरही ताण करणारा ठरला. क्रिकेटपटूंची छायाचित्रे, वर्तमानपत्रांतली कात्रणे, पुस्तके त्याच्याकडे भरपूर होती. त्याचा हा संग्रह नवख्याला थक्क करून सोडायचा. शरद म्हणजे क्रिकेटचा चालता-बोलता ज्ञानकोश जणू. एक कप चहा आणि सिगारेट मिळाली की त्याची रसवंती अखंड चालू व्हायची व ऐकणाऱ्यालाही किती ऐकू अन्‌ किती नाही असे व्हायचे. क्रिकेटमध्ये इतका उत्साह आणि आत्मियता असलेला माणूस माझ्या तरी पाहण्यात आलेला नव्हता. शेवटी अगदी नाईलाजाने आता वेळ संपली अशी घंटा वाजली की आम्ही घरी निघत असू.

पुढे नोकरीनिमित्त दोघेही लांब गेलो व गाठीभेटी कमी झाल्या. पण भेटलो की जुने विषय हमखास निघत. 1971 मध्ये भारताने ओव्हलवर इंग्लंडविरुद्ध जो विजय मिळवला त्या वेळी अगदी अनपेक्षितपणे त्याची गाठ पडली ती टॉकीजमध्ये. पण तेव्हा चित्रपटात कुणालाच इंटरेस्ट नव्हता. सगळे लोक रस्त्यावर येऊन विजयोत्सवात सामील झालेले होते. त्या वेळी चहावाल्यांनी फुकट चहा पाजला होता.
मध्ये काही वर्षे गेली आणि पुढे नव्या पेठेत आम्ही समोरासमोर राहायला आलो. मग काय, भेटीगाठी बऱ्याच नियमितपणे होऊ लागल्या. विषय एकच तो म्हणजे क्रिकेट. चित्रपट गाण्यांचाही शरद चांगला दर्दी होता. नूरजहॉं, सुरैया, खुर्शांद, गीता दत्त, पंकज मलिक, तलत मेहमूद यांच्या चांगल्या दुर्मिळ गाण्यांचा संग्रहही त्याच्याकडे होता. तो कधीतरी ती गाणी ऐकायला बोलवायचा.

एकदा क्रिकेटचा विषय निघाला की, अनेक प्रसंग तो खुलवून सांगायचा. सोबर्सने "नॅश' नामक गोलंदाजाला मारलेले सहा षटकार, डेव्हिडसनने पैज मारून मे याला शतकाच्या आत कसे बाद केले, 1961 मध्ये ओल्ड ट्रॅफर्डवर बेनॉने एकट्याने आपल्या गोलंदाजीने सामना फिरवून कसा जिंकला, ब्रॅडमनने लीडस येथे एका दिवसात केलेले त्रिशतक आणि ब्रिस्बेन येथे झालेली ऑस्ट्रेलिया - वेस्ट इंडीज यातली "टाय' या त्याच्या खास आठवणी होत्या. त्याच्याकडून त्या परत परत ऐकल्या तरी कंटाळा येत नसे.

काही वर्षांपूर्वी मी ऑस्ट्रेलियाला गेलो होतो. तेथून काही क्रिकेटच्या सीडीज घेऊन आलो. त्यात "टाय टेस्ट'ची सीडीही होती. शरदने मला डोक्‍यावर उचलून नाचायचेच बाकी ठेवले होते. "फार फार छान केलंस रे लेका तू'', असे तो वारंवार म्हणायचा. "लेका' हे त्याचे आवडते संबोधन होते. अगदी अलीकडे त्याची प्रकृती जरा बिघडली होती, म्हणून तो रुग्णालयामध्ये होता. पण तेथून त्याला डिस्चार्ज दिला तेव्हा मला जरा हायसे वाटले. काही दिवसांपूर्वी भारताने कसोटी क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध लागोपाठ दोन सामने जिंकून मालिका विजय निश्‍चित केला, तेव्हा मी अगदी हर्षाने उचंबळून गेलो. शरद जोशी याच्याकडे जाण्यासाठी माझी पावले वळली. आता त्यालाही या गोष्टीचा किती आनंद होईल व नेहमीप्रमाणे आपल्या क्रिकेटवरील गप्पांना अगदी उधाण येईल अशी मनोराज्ये रंगवीत मी त्याच्या घराच्या फाटकापाशी पोचलो. तो नेहमी गॅलरीत जेथे बसायचा त्या खुर्चीकडे मी पाहिले आणि भकासपणे बघतच राहिलो. कारण शरद तेथे नव्हता. खरं तर तो आता कुठेच नव्हता. माहित होतं मला, पण सवयीने इथवर आलो. त्याच्या आठवणीने मी विषण्ण झालो. एक इनिंग संपली होती. रिकाम्या मैदानाकडे उदास नजरेने पाहावे, तसे मी त्या रिकाम्या गॅलरीकडे एकदा पाहिले. एक आवंढा गिळून यांत्रिकपणाने एकेक पाऊल टाकीत मी घरी परतलो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com