उत्साहाचे गुपित

विठ्ठल मणियार
बुधवार, 18 एप्रिल 2018

काम करणाऱ्यापुढे कामांची रास असते. पण या व्यग्रतेतूनही जुन्या मित्रांच्या भेटीत रमायचे, जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा आणि त्यातून काम करण्यासाठी दुप्पट उत्साह मिळवायचा.

काम करणाऱ्यापुढे कामांची रास असते. पण या व्यग्रतेतूनही जुन्या मित्रांच्या भेटीत रमायचे, जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा आणि त्यातून काम करण्यासाठी दुप्पट उत्साह मिळवायचा.

काही निमित्ताने शरद पवारसाहेब पुण्यात आले होते. मी माझ्या कार्यालयात. साहेबांचा अचानक फोन आला. विचारू लागले, ""अरे विठ्ठल, तुला बाळ दांडेकर आठवतो का रे? कॉलेजमध्ये आपल्या बरोबर होता.'' मला लगेचच काही आठवेना. मी म्हणालो, ""साहेब, आठवत नाही.'' ""अरे, ढोलकी वाजवायचा'', साहेब म्हणाले. आता आठवला. कॉलेजमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त अनेक कार्यक्रमात आम्ही भाग घेत असू. स्नेहसंमेलनातही असू. दांडेकर ढोलकी उत्तम वाजवायचा. एका स्नेहसंमेलनात साहेबांनी लिहिलेला "दोन पायांची शिकार' हा वग बसवला. त्यात साहेबांनी राजाची, आमचा मित्र अभय कुलकर्णी याने प्रधानाची भूमिका केली होती आणि ढोलकीवर होता दत्तात्रय दांडेकर. वगामधील लावणी ढोलकीच्या तालावर गात असताना विद्यार्थी आपोआप ताल धरत. सगळे काही डोळ्यांपुढे आले आणि जवळपास साठ वर्षांनंतर दांडेकर डोळ्यांपुढे उभा राहिला.

संगीताची जाण असलेल्या आमच्या या मित्राच्या घराण्यातच संगीताची परंपरा. आजोबा बाळासाहेब ताशा उत्कृष्ट वाजवायचे. वडील माधवराव पखवाज आणि तबलावादक. आई शांताबाई हार्मोनियम वाजवायच्या, त्यामुळे दत्तात्रयही संगीतात रमलेला असायचा. अजूनही तो त्यातच असतो. साहेबांनाही संगीताची जाण आणि आवड. त्यामुळे गप्पा रंगल्या. दांडेकर कुटुंब मूळचे पालघरचे. स. प. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य सोनापंत तथा मामासाहेब दांडेकर हे बाळचे चुलत आजोबा. एका कार्यक्रमानिमित्त काही दिवसांपूर्वी साहेब पालघरला गेलेले, त्यांना तेथे दांडेकरची आठवण झाली. बाळचे कुटुंब पुण्यात स्थायिक झाल्याची माहिती साहेबांना मिळाली. पत्ता अथवा दूरध्वनी क्रमांक मिळावा म्हणून त्यांनी आपल्या एका कार्यकर्त्यास कामाला लावले. दुसऱ्याच दिवशी दत्तात्रयचा पुण्याचा पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक मिळाला.

आता साहेबांचा फोन हे सांगण्यासाठीच होता. ते म्हणाले, ""आपण बाळला भेटायला जाऊ. तू "बालगंधर्व'ला ये. कार्यक्रम संपला की निघू.'' मी "बालगंधर्व'ला पोचलो. नियोजित वेळेपेक्षा कार्यक्रम थोडा लांबला. दत्तात्रयला आम्ही येतो आहोत हे साहेबांनी आधीच कळवले होते. आम्ही रात्री नऊच्या सुमारास बाळ दांडेकरच्या वडगाव धायरीमधील घरी पोचलो. जवळपास पन्नास वर्षांनंतर भेटणारा हा आमचा मित्र दारातच स्वागतास उभा होता. स्वच्छ नेहरू शर्ट, पायजमा या पेहरावात हसतमुखाने त्याने आमचे स्वागत केले. आनंदून आणि गहिवरून गेला, म्हणाला, ""महाभारतात सुदामा कृष्णाकडे गेला होता, इथे साक्षात कृष्ण सुदाम्याकडे आला.'' सर्व काही अचानक, अनपेक्षित घडलेले. दांडेकर कुटुंबीयांसाठी आश्‍चर्यचकित करणारा असा तो प्रसंग होता. देशातील एक महत्त्वाची व्यक्ती आपल्या व्यग्र कार्यक्रमातून वेळ काढून, रात्री उशीर झालेला असतानाही केवळ महाविद्यालयातील एका मित्राला खास भेटण्यासाठी आली, हा क्षण बाळला खराच वाटेना. मग रंगल्या कॉलेजमधील जुन्या आठवणींच्या गप्पा. सुरवातीला बोलताना बाळ थोडा संकोचला होता, पण हळूहळू खुलत गेला. लोकवाङ्‌मयातील फटका या प्रकारातील "असावा - नसावा'मधील एक कडवे बाळ गायला.
शोधूनी पाहणारा श्रोता परीक्षक असावा ।
आम्ही जे गाणार, ऐकून घेणार, रुसून जाणार नसावा।।

इतक्‍या वर्षांनंतरही गाण्याची त्याची ढब मनाला सुखावून गेली. विडंबन हा बाळचा आवडीचा प्रकार. तो ही कडवी स्वतः रचायचा. प्राध्यापकदेखील त्यांच्यावर रचलेले विडंबन अत्यंत खेळीमेळीने घेत असत.

पालघर येथे वै. सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीची स्थापना, त्या संस्थेला साहेबांनी केलेल्या मदतीचा उल्लेख बाळने केला. या प्रवासात अर्ध्यावरच निरोप घेणारे अभय कुलकर्णी, हुकूम डागळे, भिका वाणी, राम पंड्या, बा. भ. पाटील, अतुल भिडे, धनाजी जाधव या मित्रांच्या आठवणीने आम्ही गहिवरलो. खूप मनमोकळेपणाने साहेब जुन्या आठवणी सांगत होते. एन. ए. मावळणकर, शं. गो. साठे, पी. व्ही. पटवर्धन, अरविंद वामन कुलकर्णी, जसावाला, रघुनाथ खानीवाले या प्राध्यापकांच्या आठवणी निघाल्या. डॉ. प्र. चिं. शेजवलकर, डॉ. सी. जी. वैद्य, एन. डी. आपटे हे प्राध्यापक अजूनही प्रत्येक भेटीत काही नवे सांगतात ही कृतज्ञता व्यक्त झाली.

साहेबांनी बाळच्या कुटुंबीयांची आस्थेने चौकशी केली. बाळचा नातूदेखील चांगला तबला वाजवतो, हे ऐकून आनंद झाला. संगीताचा साज असलेल्या खोलीत पलंगावर बसून संगीताच्या गप्पा झाल्या. घड्याळाचा काटा मध्यरात्रीची आठवण करून देऊ लागला, पण आठवणी संपत नव्हत्या. अत्यंत व्यस्त कार्यक्रम, वेडावाकडा प्रवास, हजारोंच्या भेटीगाठी अशा अनेकविध गोष्टींच्या व्यग्रतेतही आपल्या मित्रांबरोबर काही काळ आनंदाने घालवावा, जुन्या आठवणीत रममाण व्हावे यासाठी साहेब आवर्जून वेळ काढतात. साहेबांच्या सतत प्रसन्न आणि उत्साही राहण्याचे हेच गमक आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vitthal maniyar write article in muktapeeth