मानधन

वृंदा दिवाण
गुरुवार, 11 जानेवारी 2018

मानधनाची रक्कम जगण्यासाठी हवीच असते. पण अचानक दुसरीला तिच्या जगण्यासाठी त्या रकमेची अधिक जरुरी आहे, हे जाणवलं आणि ते पाकिट तिच्या स्वाधीन केलं.

मानधनाची रक्कम जगण्यासाठी हवीच असते. पण अचानक दुसरीला तिच्या जगण्यासाठी त्या रकमेची अधिक जरुरी आहे, हे जाणवलं आणि ते पाकिट तिच्या स्वाधीन केलं.

लेखनाच्या सुरवातीच्या काळात आपण आपले लेखन नियतकालिकांकडे उत्साहाने पाठवतो. ते छापले जाण्यातही आनंद असतो. छापून आलेला लेख एकांती डोळ्यांनी बघण्यातसुद्धा अप्रूप असतेच. त्यातून ते जर ओळखीच्या कुणा शेजारणीने, मैत्रिणीने वाचले, भेटले की हातात हात घालून त्या लिखाणांविषयी, त्यातून मांडलेल्या विचाराविषयी, अनुभवाविषयी चर्चा केली, तर स्वर्ग दोन बोटे आहे, अशी सुद्धा विलक्षण अनुभूती येतेच. त्यातून मानधनाची मनिऑर्डर आली, तर ते स्वकमाईचे पैसे घेण्यात कोण आनंद! त्या तेवढ्या लेखनावरून आपल्याला लेखक म्हणून ओळखले जाते.

पुढे त्यातली गंमत-थ्रील ओसरते. आपणही सजग होतो. एक वेगळी वाट आपणच आपल्याशी संवाद साधण्यासाठी निवडलेली असते, याचेही समाधान असतेच. मग शोध सुरू होतो नवनव्या वाटांचा. कथा-कादंबरीची स्वप्ने खुणावू लागतात. आपल्या सभोवतालच्या माणसांचे जगणे, त्यांचे अनुभव, घटना-प्रसंग यांचा आपल्या संवेदनशील मनानुसार अन्वय लावण्याचा छंदच लागतो. याच वाटेवर मला अंतर्मुख करणारा आणि त्याचबरोबर कृतार्थही करणारा एक अनुभव आला. मीही त्या क्षणापुरती भारावून गेलेच.

रोजचे सकाळपासूनचे रूटीन सांभाळून, नवरा, मुलगा, मुलगी त्यांच्या-त्यांच्या कामाला गेली, की मी माझी दुपार लिहिण्यात घालवी. त्या दोन-तीन तासांत मी फक्त लिखाणाची असते. तेव्हाही आणि आताही. पण त्यासाठी कामाची बाई वेळेवर येणे, नवरा, मुले घराबाहेर पाच-सहा तासांसाठी असणे माझ्या पथ्यावरच पडायचे. कोरे कागद मला खुणावतच असायचे. त्या दिवशी धुणे, भांड्याची, घर पुसण्याची बाई आली नाही. वाट पाहण्याची वेळ संपली. मी कामे उरकली. लिहिण्याचा मूडच खलास झाला. अचानक कष्टाची कामे अंगावर पडल्याने चिडचिड झाली. दमलेही होतेच. रजा घेण्याचे, न येण्याचे या बायका सांगत का नाहीत आदल्याच दिवशी! ही नेहमीची "टेप' मी वाजवून घेतली.

माझी कामवाली आंध्रांतून आलेली. नवरा ट्रक ड्रायव्हर. एक आठ वर्षांची मोठी मुलगी आणि पाच व तीन वर्षांचे दोन मुलगे असा तिचा संसार. तो कामावर गेला, की आठ-दहा दिवस घरी यायचा नाही. आला की येताना मटण, चिकन आणि बाटली आणणार. दोन-चार दिवस तिचे आनंदाचे जाणार. सर्व जण मजेत होती. ती कामावर यायची. पण थोड्या उशिरानेच, पण खाडा नसायचा. पण सलग चार दिवस ती कामावर आली नाही. निरोप नाही. मला तिचा व माझाही राग आला. संयमच संपला. ही आता नकोच कामावर, या निर्णयापर्यंत आलेही. पण तिचे काम स्वच्छ होते. प्रामाणिक होती. काही उचलायची नाही. पाचव्या दिवशी तिची आठ वर्षांची मुलगी आली. आईने पैसे मागितले, म्हणाली. मी दहा रुपये दिले. पोळ्या दिल्या चार-पाच. भाजीही दिली. ती गेली. दुसऱ्याच दिवशी ती आली. चारच दिवसांत तिची पार रयाच गेली होती. अगोदरच काळी, शिडशिडीत. दारात बसलीच. बोलवेनाच तिला. ""काय झालं गं? बरं नाही का तुला? दिसतंच आहे,'' मी म्हणून गेले. ती रडायलाच लागली. मीच गोंधळले. मारणे, मुलादेखत बायकोच्या अंगचटीला येणे हे तिने मला सांगितलेच होते. तिच्याबरोबर मीही सुन्न. काय बोलावे! "रडू नको गं!' मी म्हणताच म्हणाली, ""कसं रडू नकू गं? खाजतंय खाली. रगत आल्या. हुभं ऱ्हाताच येत न्हायी. डागतराकडं जावं, तं मला तू धाच रुपे दिले. जादा दे की. फेडन की म्या!'' तिने वाहणारे डोळे पुसले.
थोड्याच वेळापूर्वी शंभर रुपये मानधन मनिऑर्डरने आलेले होते. माझेही घर एकट्याच्याच कमाईवर चालत होते. क्षणात माझ्यातही काय परिवर्तन झाले मला कळले नाही. मी आत गेले. आतून ते मानधन आणले अन्‌ तिला दिले. ""हे घे. पुरे का? का अजून हवेत.'' ""नकू गं. फेडावं बी पडन ना'', ती म्हणून गेली. मला वाकून नमस्कार केला. म्हणाली, ""त्यो गेला बग दुसरेच दिसी. ह्यो रोग देऊन. लावू नग बरं दुसरीला कामाला. बरं वाटलं की यीन.''

मी त्याच क्षणी ठरवले, नाही घ्यायचे पैसे परत तिने दिले तरी. ती बरी होऊ दे. तिला ते तिचे लाजिरवाणे दुखणे मलाच येऊन सांगावसे वाटले यातच सर्व आले. नाही लावणार तिच्या जागी दुसरीलाही. करेन आठवडाभर घरी काम. तिची पाच-सात घरे होती कामाची. पण ती फक्त माझ्याकडेच पैसे मागायची. आताच नाही. नेहमीच. ऋणानुबंधाच्या गोष्टी असतात झाले. सूर जुळतात, दुसरे काय?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vrunda diwan write article in muktapeeth