गीरच्या जंगलात...

वामन भुरे
गुरुवार, 1 जून 2017

आपल्याला गीरचे जंगल आठवते ते सिंहांसाठी. पण गीरच्या गाई प्रसिद्ध आहेत. या जंगलातील गावांमध्ये मुलींना लक्ष्मी मानतात. निसर्गावर श्रद्धा असणाऱ्यांचे हे गाव आहे.

आपल्याला गीरचे जंगल आठवते ते सिंहांसाठी. पण गीरच्या गाई प्रसिद्ध आहेत. या जंगलातील गावांमध्ये मुलींना लक्ष्मी मानतात. निसर्गावर श्रद्धा असणाऱ्यांचे हे गाव आहे.

देशी गाई सांभाळायचा विचार बरेच दिवस मनात होता. देशी गाईचे दूध, तूप, गोमूत्र यांचे अनेक फायदे वडिलधाऱ्यांकडून ऐकले होते. खेडेगावात बालपण गेले. गाईच्या शेणाने सारवलेली घराची जमीन, त्याचा वास हे वेगळेच मनाला शांती देणारे वाटायचे. मी देशी गाईंचा अभ्यास करण्यासाठी देशातील वेगवेगळ्या भागात जाऊन तेथील गाईंचा अभ्यास करीत आहे. सर्व प्रकारच्या देशी गाई असलेली एक चांगली गोशाळा निर्माण करायचे मी योजले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सर्व जातीच्या देशी गाई एकाच ठिकाणी पाहता येतील. गीरच्या गाई प्रसिद्ध आहेत. तिकडे एकदा जायचे ठरवले.
नुकताच गुजरातमधील गीर भागात गेलोही. तिकडच्या मेहेता कुटुंबाचा परिचय होता. त्यांच्या ओळखीने गीरच्या जंगलात असणाऱ्या एका कुटुंबात मुक्कामास जाण्याचे ठरले. दर्शूरभाई देऊबहाल यांच्याकडे मुक्कामाला गेलो. त्यांनी त्यादिवशी संध्याकाळी दिलेल्या चहाची चव काही न्यारीच होती.

गाईच्या दुधाची अवीट चव. गीर जंगलातील पाहुणचार आठवणीत राहणारा असा होता. चांदण्याची रात्र. मोकळ्या जागेत बाजा टाकलेल्या आणि जंगली प्राणी-पक्षी याशिवाय कोणाचाच आवाज नाही. आमच्या मोबाईलला नेटवर्क नव्हते. त्या ठिकाणी दोनशे लोकवस्ती असणाऱ्या गावातील लहान मुले व बुजुर्ग सगळी आमची आपुलकीने चौकशी करीत होते, त्यांच्या अडचणी सांगत होते. अडचणी किती असल्या तरी सरकारकडून ज्या सुविधा मिळतात त्यावर सर्व जण खूष होते. सरकारने त्यांना सोलर लाईट, सोलर पंप यांसारख्या सुविधा पोचविल्या होत्या. या व्यतिरिक्त अत्यावशक वैद्यकीय सेवाही उपलब्ध होती. यापूर्वी दवाखाना दूर असल्यामुळे रुग्ण दगावण्याची भीती असायची. ती भीती आता राहिली नाही. डेअरीची सुविधा असल्यामुळे दुधावरच उदरनिर्वाह असलेल्या या गावाची चांगलीच सोय झाली होती. जागेवर दूध खरेदी होते, दुधाला चांगला भाव मिळतो. त्यामुळे जंगलात राहण्यास सारेच खुश होते.

मुलगी जन्माला आली म्हणजे घरी देवीचे आगमन झाले, असे समजणाऱ्यांचे हे गाव होते. जिचा जन्म झाला की घरी लक्ष्मी आल्याचा आनंद होतो, त्या लक्ष्मीला फक्त सातवीपर्यंतच शिक्षण घेता येते. येथून शाळा दूर असल्याने तिची शाळा बंद होते. शिक्षण मिळाले पाहिजे, हे वाक्‍य एका बुजुर्गाच्या तोंडून ऐकले. त्यांचा महिलांबाबत असणारा आदर खूप काही सांगून जात होता. जंगल खात्याकडून बांधकामास परवानगी मिळत नाही, त्यामुळे कुडाच्या भिंती आणि त्यावर छप्पर अशी घरे. या गावात पोलिस कधी आलेच नाहीत, भांडण कधी झालेच नाही, काही कुरबूर झाली तर बुजुर्ग मंडळी गावातच ते मिटवतात. चोरी इकडे कधीच होत नाही, परंतु जंगली प्राण्यांची भीती असते. बाकी त्यांनी ही कधी आम्हाला धोका दिला नाही. पण घर चांगले बांधायची इच्छा असूनही बांधता येत नाही. एक म्हैस सिंहाने मारली तर लाखात नुकसान होते, परंतु शासन तीस हजार रुपयांपर्यंत भरपाई देते. गप्पा सुरू होत्या. लहान मुले त्यांच्याकडे असणारी कला दाखवत होती.

एका मुलाने आमचे गीर जंगल कसे आहे त्याचे वर्णन करणारे गुजराती गीत सुंदर आवाजात व चालीत गायले. रात्री अकरा वाजता मोकळ्या मैदानात झोपण्यासाठी गेलो. थोडी भीती वाटत होती; पण त्यांचा सिंहावर असणारा विश्वास "साहब हमारे पास से जायेगा, पर कुछ नही करेगा, आज तक उसने कभी इंसान के साथ धोखा नही किया' या वाक्‍याने थोडा धीर आला. आकाशाकडे बघत झोपण्याचा प्रयत्न करीत होतो. पण मनावर भीतीचे सावट होते. पण त्या जंगलातील थंड वाऱ्यात झोप कधी लागली हे कळले नाही. अचानक सिंहाच्या डरकाळीने रात्री दोन वाजता जाग आली. माझ्या शेजारी असणाऱ्या सर्वांना उठविले. अगदी हाकेच्या अंतरावर ती डरकाळी होती. आम्ही सर्व तयारीने गेलो होतो, मोठी बॅटरी होती, ती आवाजाच्या दिशेने वळवली. पण त्याचे दर्शन झाले नाही. आवाज मात्र खूप वेळ येत होता. पुढे झोप लागलीच नाही. सिंहाचे दर्शन होईल, अशा आशेने आम्ही सर्वच जण पाहात होतो, पण जंगलच्या राजाने दर्शन दिलेच नाही.

घरातील स्त्रीविषयी गावकऱ्यांना खूप आदर असतो. देवीचे भक्त असलेले हे गाव आहे. वनलक्ष्मीचे भक्त असलेले गाव. मुलीला लक्ष्मी मानणारे गाव. या गावातल्या मुलींच्या शिक्षणासाठी काही करता येईल?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: waman bhure wirte article in muktapeeth