उफराटे फार कळले माझे मनी, वळचणीचे पाणी आढ्या गेले

Sant-Nivruttinath
Sant-Nivruttinath

ज्ञाना सोपाना चांगदेव आणि सगळ्यात चटका लावून गेली ती माझी मुक्ताई. काळजाचा तुकडा. जाताना बोलणे सुध्दा झाले नाही. हा चटका काळीज जाळत जातो. आयुष्यात सर्वस्वी पोकळी उरली. ज्ञाना सोपानाला निरोप देता आला. पण माझी मुक्ताई आत्ता होती आणि आत्ता नाही. तरी वैष्णवांना म्हणत होतो, सांभाळा सांभाळा ,माझ्या मुक्ताईला सांभाळा..
कसलं वचन घेतल होतंस तू आई? या वेदना मी कशा सहन करतो आहे हे कुणाला समजू शकेल का? तुम्हा पांचा जणांच्या गमनानंतर मी अजूनही देही आहे. आता मलाही या निरस आयुष्याचा अंत करायचा आहे. तिघ भावंड गेले त्याच मार्गाने जायचे आहे. मलाही समाधी घ्यायची आहे.
सहवासाच्या आठवणींनी जीव कासावीस होतो. या इतक्‍या मोठ्या जगात माझं असं कुणीही उरलेलं नाहीय. कोणाकोणाच काय काय आठवू विठ्ठला? यातना मनाचे तुकडे करतात. आतडे तुटतात.

ज्येष्ठांच्या आधी कनिष्ठांचे जाणे
केले नारायणे उफराटे ||
उफराटे फार कळले माझे मनी
वळचणीचे पाणी आढ्या गेले||
अवघ्यापरीस कष्टी केले मुक्ताईने
काहींच बोलणे घडले नाही||

नामदेवा मात्र सतत सोबतीला आहेत. पंढरीहून ते आणि ज्ञाना यात्रेला गेले. त्या क्षणापासून जणू नाळ एक झाली आहे. सगळ्यांच्या समाधीसोहळ्यात ते माझ्या वेदना समजून घेत होते. विठ्ठलाला कळवळून माझ्यासाठी मागणे मागत होते.
" नामदेवा, आता हा देह ठेवावा. तीन लहान भावंड गेले त्या मार्गावर आता मी ही जावे म्हणतो."
" नाथा, मला तुमच्या वेदना समजू शकतात. आपण कोणालाही थांबवू शकलो नाही. सगळ्यांच्या प्रस्थानाचा सोहळा केला. हसत निरोप दिला. पण मनावर काय दगड ठेवला असेल हे मी जाणतो. विठ्ठलाला सांकड घालूयां. ते अनुमती देतील तर मी तुमच्याही प्रस्थानाचे दु:ख सहन करण्याची ताकद त्याला मागतो."
नामदेवांनी त्यांच्या पध्दतीने विठूमाऊलीशी संवाद साधला. ते फार मोठे साधक होते. प्रत्यक्ष माऊली त्यांच्याशी संवाद साधायची.
त्यांनी उजवा कौल दिला.
" विठूरायाला पण तुमच्या सारखी थोर व्यक्ती जवळ असावी असे वाटते. माझी मात्र नुसती घालमेल असेल. मी कोणाकडे पहावे नंतर?"
नामदेवांचे डोळे पाणावले. त्यांना शोक आवरेना.
" माऊली आहे न नामदेवा? ती काहीतरी योजतच असते आपल्यासाठी. आपल्या चांगल्यासाठी. तुम्ही संसारी पुरूष, जबाबदारी आणि कर्तव्य यांचा मेळ घालणे हा सुध्दा एक परमार्थच आहे."
मी देहाची इतिकर्तव्यता आता संपवतो आहे, समाधी घेतो आहे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. परत एकदा सगळे संत वैष्णव जमायला लागले.
गुरू गहिनीनाथांनी मला सार सांगितले वेदांताचे. ज्ञानानी त्याचं सोन केलं. मुक्ताईने अनुभवावर आपल्या आयुष्याचा निकष मांडला. आणि सोपानाने ते सगळे ज्ञान आत्मसात केले.
यात्रा करीत करीत आम्ही सगळे सप्तशृंगीला आलो. अष्टभुजा आदीमाया. ही कुलस्वामिनी. असूर मर्दिनी. तिच्या दर्शनानी मन अजूनच हळवे झाले. मुक्ताई आठवत राहिली. आम्ही सगळ्यांनी पुजा केली. कीर्तन केले.
गोदावरी तीरावरच्या त्र्यंबकेश्वराचे परत दर्शन घेतले. आई-बाबांसोबत केलेली सव्य प्रदक्षिणा आठवली. गुरू गहिनीनाथांचे स्मरण केले. जीव कासावीस होत गेला. हा दु:खाचा भार आता पेलवेनासा झाला होता.
ज्येष्ठ कृष्ण पंचमी तिथी.
गौतमी तीरी पंचवटीस गेलो. तिथे मुक्काम केला. परत त्र्यंबकेश्वरास आलो. ती ज्येष्ठ कृष्ण एकादशी होती. एकादशीचा उत्सव आम्ही सगळे मिळून केला. द्वादशीला पारणे केले. आता फक्त चेतना उरली होती. अहंकार लयाला गेला होता.
विठ्ठल रुक्‍माईची मानसपुजा केली. ध्वज उभारले. पश्‍चिमेची जागा निश्‍चित केली. समाधीस्थळाची शिळा उचलली. तिथे अखंड धुनी पेटलेली होती. जणू तिथे योगेश्वर निजलेला असावा असे वाटत होते. तुळस बेल फुल तिथे वाहिलेले होते. नारा विठा गोंदा तिघाही पोरांना पाठविले होते नामदेवांनी ती जागा स्वच्छ करायला. त्यांनी ती जागा झाडून पुसून लख्ख केली. त्या जागी जणू दिवे तेवत होते असा प्रकाश होता. अनादी कालापासून हे समाधी स्थळ ठरलेले होते जणू.
पुष्करणीवर द्वादशीच्या पारण्याच्या पंगती सुरू होत्या. मी पारणे सोडायला बसलो. सगळा संत मेळा जेवण करून तृप्त झाला. जणू विठ्ठल रखुमाई त्यांना आग्रहाने वाढत असावी.
सगळे संत महंत ऋषीमुनी मधेच शोकमग्न होत होते. मी समाधी घेणार हा जणू वज्राघात होता. समाधी स्थळाभोवताली कुंकवाचे सडे घातले.
मी आजवरच्या आयुष्यासाठी ईशवराचे आभार मानायला लागलो. सगळ्या चैतन्याला, ईश्वरीय शक्तीला, गुरूला विठ्ठलाला नमन केले.
वैष्णव जन ऐकेनासे झाले. त्यानी धूप पंचारतीने ओवाळले. मला गंधअक्षद फुल वाहिले. सगळ्यांच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या. मी माझा ग्रंथ निवृत्तीसार समोर ठेवला. सगळ्यांच्या प्रेमाने माझा जीव व्याकुळला.
मी सगळ्या संताना नमस्कार केला. विठ्ठल मुर्तीचे तीर्थ घेतले. पाऊली भजन करत आम्ही स्थळाजवळ आलो. हाती पताकांची ध्वजा होती. वारकरी पंथाची द्योतक. ती मी नामदेवांच्या हाती दिली. आणि एकेक पायरी खाली उतरू लागलो.
" निवृत्ती नाथा जणू पांडुरंग पंढरी सोडून जातो आहे असं वाटायला लागले आहे"
नामदेवास हुंदका आवरेना. कोणालाच शुद्ध नव्हती. शोक क्षणोक्षणी वाढत होता.
नामदेव म्हणे आता शिळा झाका. नारा महादा गोंदा विठा सगळे शोकाकूल होते. सगळे आक्रोश करू लागले. विसोबा खेचर व्यथित झाले. ज्यांनी जन्मभर नाकारले ते आता दु:खी कष्टी होत होते. जणू सूर्य लोप पावला होता असा अंध:कार सगळ्यांच्या मनात दाटला होता.
मी पद्मासनात स्थानापन्न झालो. मला दुरून नमस्कार करून प्रत्येक जण साश्रू नयनांनी माघारला. नामदेवांना गहिवर आवरत नव्हता.
शिळा बसवली. कितीतरी कालापासून मला हवा असलेला एकांत आता माझ्यात होता. एक परमेश्वर आणि दुसरा मी.
आता त्याच्याच पायी या देहाची समिधा अर्पण करायची होती. मी डोळे बंद केले. चित्त एकाग्र करायचा प्रयत्न करू लागलो. पैलतीरावर आई बाबा ज्ञाना सोपाना मुक्ताई माझी वाट पाहात आहेत. मोक्ष साधायचा आहे.
आईचा प्रेमळ स्पर्श आठवतो आहे. तिने खाऊ घातलेला गरमगरम मेतकुट भात आठवतो आहे. बाबांची धीरगंभीर आवाजातली गीता कानात गुंजते आहे. कपिला हंबरते आहे. सीताकाकू, धोंडूकाका थरथरत्या हाताने आशीर्वाद देताहेत.
हा ज्ञाना बसलाय वेदांतावर चर्चा करीत. कधी जगावर रुसला आहे. लडीवाळ मुक्ताई, माझं लेकरू, त्याची माय झाली आहे. किती सुरेख मांडे करायला लागली आहे आता. एका रात्रीत तिनी आपलं बालपण आयुष्याच्या एका कोपऱ्यात, गाठोड्यात बांधून ठेवून दिलं ते मरेपर्यंत उघडलंच नाही.
आईच्या मायेनी झाडांची काळजी घेणारा सोपाना हा आयुष्याचा वेल किती पटकन खुडून चालता झाला. ज्ञानाच्या माघारी केवळ एका मासात.
किती सुरेल संगीत आहे हे. स्वर्गीय! इथे हे पाऊले कुणाची? गुरू गहिनीनाथांची की माझ्या विठूमाऊलीची? सिध्दबेटावर लावलेल्या मोगऱ्याचा सुगंध इथे दरवळतो आहे. " मोगरा फुलला मोगरा फुलला." ज्ञाना भान विसरून अभंग गातो आहे. पैलतिरावर काऊ माझ्या आईला शकून सांगतो आहे.
" पैल तो गे काऊ कोकताहे
शकून तो गे माये सांगताहे."
ज्ञाना असा रंध्रारंध्रात भिनला होता. त्याच्या समाधीवर शिळा मी ठेवली..
श्वासांच्या समिधा हळूहळू देहयज्ञात अर्पण होताहेत. कोहमने सुरू झालेला प्रवास .. आणि आता सोहम...
वैकुंठीचा राजा खुद्द समोर आहे. मंजुळ पावा वाजतो आहे..
आई बाबा ज्ञाना सोपाना मुक्ताई पांचहीजण हात पसरुन माझं स्वागत करताहेत. त्र्यंबकेश्वराहून उशीरा घरापर्यंत पोहोचणाऱ्या कोकराचं स्वागत करताना जे व्याकुळ भाव आईच्या नजरेत होते ते आताही दिसताहेत.
" ये निवृत्ती, माझ्या लेकरा... आता आपण सोबत राहू. परत एकटा माघारी कधीच राहू नकोस."
आईची ही आर्त हाक मला खेचत होती..
मी हळूहळू ब्रह्मस्वरूप होत होतो...
श्वासांच्या समिधा संपत होत्या...
यज्ञकार्य संपन्न झाले होते.
|ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु||


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com