आपण डोळ्यांवर पट्टी तर बांधून घेत नाहीये ना?

gandharii
gandharii

नेत्रहीन धृतराष्ट्राच्या दिशाहीन महत्वाकांक्षा आणि बुद्धिहीन डोक्‍यावर ठेवलेल्या मुकुटाची लालसा या दोहोंनी कुरुवंशाचे वारे चांगलेच न्यारे केले. बहुधा अशाच बुद्धिहीन आणि लालसेपोटी घेतलेल्या निर्णयांचे परिणाम भोगायला लागतातच आणि तेही त्या चौकटीत असलेल्या प्रत्येकाला. खरेतर धुतराष्ट्र जन्मतः नेत्रहीन होता. मात्र त्याला मिळालेला जोडीदार डोळस होता. अर्थातच, आपण इथे गांधारीविषयी बोलतो आहोत, हे स्पष्ट आहेच.

गांधारी डोळस होती आणि तिला बुद्धीसुद्धा होती. गांधार राज्याची ती राजकुमारी होती. पण स्वतःच्या बुद्धीला तिने आपल्या डोळ्यांसहित कायमची पट्टी बांधून घेतली होती. विचार करा, जर गांधारीने विनाकारण पत्नी धर्म म्हणून डोळ्याला पट्टी न बांधता, धृतराष्ट्राला डोळसपणे साथ दिली असती, तर जे घडलं ते एखादे वेळी टाळता आल असतं. नाही का वाटत असे ? अहो ती राजकन्या होती आणि तिला नीती न्याय राज्य या सर्वांची चांगलीच माहिती होती. या ठिकाणी जर तिने तिची डोळस बुद्धी वापरली असती तर जन्म असा डोळे असूनही अंधारात घालवावा नसता लागला.

आता आपण थोडा विचार करूयात. पहा पटतंय का ?
धृतराष्ट्र जन्मापासून नेत्रहीन आणि लालसेपोटी बुद्धिहीन, वर गांधारीने डोळ्यांना पट्टी बांधली आणि त्याच्या आंधळेपणाची सोबती झाली. पुढे झाला तो विनाश आणि सत्यानाश आपल्याला माहिती आहेच. या विनाशाचे मग भागीदार होते शकुनी, दुर्योधन, कर्ण यांच्यासारखे दृष्टी आणि बुद्धी दोन्ही असूनही दोन्हींचा विपरीत वापर करणारे. त्यात काही कर्णाला वगळतील कारण तो उपकाराच्या धाग्याला बांधील होता, असो ती एक वेगळी कहाणी. पण या बुद्धी असलेल्या मुर्खांच्या टोळीला कितीतरी विद्‌वान मग बळी गेले आणि झाला तो विध्वंस जगजाहीर आहे. कोण कशाला कारण आहे हे आपण कधीच सांगू शकत नाही पण काही चुका जर आधीच ओळखून टाळता आल्या तर जे केले ते व्यवस्थापन नक्कीच उपयोगाचे.

आपण ज्या वेळी म्हणत असतो की आम्हांला व्यवस्थापन करायचे आहे, म्हणजे नक्कीच आपण तेवढ्या काळापुरता वेळ भागवणारा विचार कधीच करीत नाही. खरंतर आपण विचार करीत असतो त्या क्षणाचा आणि पुढे येणाऱ्या काळाचा. तात्पुरते व्यवस्थापन तर आपण क्षणोक्षणी करीत असतोच त्याला काही पर्याय नाहीच. पण जेव्हा या व्यवस्थापनाचा परीघ वाढलेला असतो आणि जिथे आपल्या खेरीज इतर अनेक गोष्टी आपण सुदृढ करू पाहतो, तिथे मग गांधारी होऊन चालत नाही. तिथे गरज असते डोळसपणाची. जसजसा व्यवस्थापनाचा व्यास वाढत जातो तसतसा आपल्याला त्या व्यवस्थापनात इतर धागे जोडत जायला लागतात. मात्र जो धागा आपण जोडतो, त्याची सूत्र आपण ज्याला देतो, तो कोण आणि कसा पुढे व्यवस्थापन करील यावर देखील आपल्याला बारीक नजर ठेवायला लागते. डोळ्याला पट्टी बांधून तिथे विश्वास ठेवता येत नाही. आता पहा ना, आपल्या डोळ्याला पट्टी असली तरी सगळेच विदुर, भीष्म वा द्रोणाचार्य राहत नाहीत, त्यात साधा एक शकुनी पण सगळा डाव त्याच्या हिशोबाने मांडू आणि मोडूही शकतो.

व्यवस्थापनाचं ठिकाण कोणतही असलं तरी व्यवस्थापनाची पद्धत फारशी बदलत नाही. फरक फक्त त्याच्याशी संबंधित इतर धाग्यांचा असतो. तेव्हा गांधारीच्या पद्धतीचे व्यवस्थापन हे कधीही स्वतःला धोका दिल्यासारखेच. जसे तिने सद्यस्थितीपासून सहज नजर फिरविली तसे आपले होता कामा नये. जिथे ती बरेच काही करू शकली असती, तिने भावनेच्या भरात म्हणा वा तिच्या सोबत झालेल्या अन्यायाच्या रागात, पण स्वतः बरोबर कित्येकांच्या झालेल्या हानीचे कुठेतरी ती पण कारण आहे. अंधत्व पत्करणे वावगे नाही पण ते जर विवेक बुध्दीलाही आंधळे करीत असेल तर त्यापासून होईल ती नासाडीच, व्यवस्थापन कधीच होणार नाही. आणि हो जर गांधारी व्हायचेच असेल तर मग शकुनीच्या हाती सत्ता दिल्यासारखी आहेच तेव्हा पुढे निकालाच्या समयी कृष्णाला शाप देण्यात कुठलंही शहाणपण नाही हेही तितकच सत्य. कारण, डोळ्यांना पट्टी बांधून व्यवस्थापन कधीच करता येत नाही हे शेवटी कळण्यापेक्षा आधीच वळलेले बऱ्या. इथे एक तर गांधारी होता येईल किंवा व्यवस्थापक, पण गांधारी होऊन व्यवस्थापन जरा कठीणच. आपण आपल्या डोळ्यांना पट्टी तर बांधून घेत नाहीये ना? विचार करा नक्की !!

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com