एक अधिक संधी देणारा अधिक मास

adhik_20mahina
adhik_20mahina

वशिष्ठ सिद्धांताप्रमाणे प्रत्येक ३२ महिने, १६ दिवस व ८ घटींनतर ‘अधिक मास’ येतो. सौर वर्ष व चंद्र वर्ष यांच्या गणनेत अंतर आहे. या गणनेचं संतुलन राखण्यासाठी तीन वर्षांतून एकवेळा एक चंद्रमास अधिक येतो म्हणून त्याला अधिक मास असे नाव दिले आहे. याविषयी एक रोचक पुरातन कथा आहे. प्राचीन ऋषींनी आपल्या गणना पद्धतीनुसार प्रत्येक चंद्रमासाचे देवता निर्धारित केले. परंतु, अधिक मासाचा अधिपती व्हायला कुणीच देवता तयार नव्हती. तेव्हा विष्णू भगवान या अधिक मासाचे अधिपती झाले व म्हणून अधिक मासाला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात.

ज्या महिन्यात सूर्याचा पुढच्या राशीत प्रवेश होत नाही, अर्थात ज्या महिन्यात सूर्य-संक्रांत येत नाही, तो महिना अधिक मास म्हणून गणला जातो. त्याच्या पुढचा महिना ‘निज’ अर्थात नेहमीप्रमाणे येणारा होतो. या गणितानुसार मार्गशीर्ष, पौष व माघ महिन्यामधे अधिक मास येत नाही.

आजच्या काळात सर्व आधुनिक मोजमापाची साधन सामग्री असताना हे गणित सोडवणं फार कठीण नाही. परंतु, वैदिक काळातील ऋषींना ही विद्या ज्ञात होती व जटिलतम कालगणना त्यांनी श्लोक रूपात करून ठेवलेली आहे, हे त्यांच्या विलक्षण ज्ञानाचे प्रमाण आहे. अथर्व वेदातील सूक्त १९.५३ व १९.५४ यांची देवता ‘काल’ असून, काळ अर्थात वेळेवर अतिशय सुरेख विवेचन ऋषींनी केले आहे.

कालो ह भूतं भव्यं च पुत्रो अजनयत् पुरा ।
कालादृचः समभवन यजु: कालादजायत ॥(१९.५४.३)
नित्य वर्तमान काळ पिता सारखा मागे पण असतो व पुत्रासमान पुढे पण. काळाच्या प्रभावानेच सर्व सृष्टी व वेद ऋचा इत्यादी निर्माण होतात.

काळासारख्या अनवरत प्रवाह असलेल्या अस्तित्वाची दोन्ही टोकांची मोजणी, सूक्ष्मातिसूक्ष्मापासून प्रचंड मोठ्या आकड्यांचे वर्णन वैदिक साहित्यात केलेले दिसून येते. याविषयावर सर्वांत महत्त्वाचा ग्रंथ आहे सूर्य सिद्धांत. वराहमिहीर यांनी लिहिलेल्या पंचसिद्धांतांपैकी एक. सूर्य सिद्धांत हा ज्योतिष विषयी ग्रंथ असून, त्यात सूर्य व सर्व ग्रहांची स्थिती, त्यांचातले अंतर, त्यांची चाल व गतीचे विवरण आहे.

तसेच चंद्रमा, नक्षत्र, ग्रहण व कालमापक यंत्रांची निर्मिती इत्यादी विषयांवर विवेचन आहे. या ग्रंथात काळाचे दोन प्रकार सांगितले आहेत, मूर्त- मोजता येणारा व अमूर्त- ज्याची मोजमाप करता येत नाही. मूर्त काळात सहा प्राणांची (श्वासोच्छ्वास) एक विनाडी (२४ सेकंद), साठ विनाड्यांची एक नाडी (२४ मिनटे) व साठ नाड्यांचा एक दिवस (२४ तास) असे गणित मांडले आहे.

सर्व प्राचीन खगोलशास्त्रीय अभ्यासात हेच परिमाण दिसून येतात. चंद्र मास व त्यानुसार तिथी, सौरमास व सूर्यांचे बारा राशींमधे संक्रमण व अधिक मासाची गणना कशी करायची आणि पंचांग कसे मांडायचे, या सर्वांचे विस्तृत विवेचन सूर्य सिद्धांत या पाचव्या शताब्दीतील ग्रंथात सापडते. (सूर्य सिद्धांत या ग्रंथाचे रचनाकार व रचनेचा काळ, याबद्दल निश्चित माहिती नसल्यामुळे याविषयी मतभेद आहेत.)
काळाचे विवरण मनुस्मृतीत सुद्धा आहे. काळाचे अतिसूक्ष्म माप, निमेष पासून, काळाचे वृहद माप, युगापर्यंतचे प्रमाण अतिशय सुंदर रितीने श्लोकबद्ध आहे.

निमेषा दश चाष्टौ च काष्ठा त्रिंशत्तु ताः कला ।
त्रिंशत्कला मुहूर्त: स्यादहोरात्रं तु तावत: ॥ (१.६४)

निमेष म्हणजे डोळ्याची पापणी लवण्याइतका काळ. हा साधारण १७७.७७ मिलिसेकंद इतका होतो. १८ निमेषांचे एक काष्ठ, तीस काष्ठांची एक कला, तीस कलांचा एक मुहूर्त, तीस मुहूर्तांचा एक अहोरात्र ( दिवस, २४ तास).
सूर्यप्रकाशाच्या असण्या किंवा नसण्यावर दिवस व रात्र अवलंबून असते. दिवस कर्माकरिता व रात्र विश्रामाकरिता असते (१.६५) मनुष्यांचे एक वर्ष देवांचा एक अहोरात्र होतो, उत्तरायण त्यांचा दिवस व दक्षिणायन त्यांची रात्र असते(१.६७) देवांचे चार हजार वर्ष व संधिकाळ मिळून सात युग होतात (१.६९) व प्रत्येकी एक हजार वर्ष वजा करून पुढचे तीन युग होतात (१.७०). हे चतुर्युग मिळून एक दैव युग होतो. असे सहस्र युग मिळून ब्रह्माचा एक दिवस होतो.(१.७२)

भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात,
सहस्त्रयुगपर्यंत महर्यद्ब्रह्माणो विदुः ।
रात्रिं युगसहस्त्रांता तेऽहोरात्रविदोजनाः ॥(८.१७)

सहस्र युग चालणारा ब्रह्माचा एक दिवस व सहस्र युग चालणारी ब्रह्माची एक रात्र असते, जे ज्ञानीजन हे जाणतात. त्यांना दिवस व रात्रीचे ज्ञान होते. तात्पर्य हे की कालचक्रात आपले दिवस व रात्र अगदीच क्षुद्र आहेत व जेवढा थोडा वेळ आपल्याला या जगात मिळाला आहे, त्याचा सदुपयोग केला पाहिजे.

खरंय, आपल्या ब्रह्मांडाच्या अवकाश व काळाच्या अफाट विस्तारामधे आपले आस्तित्व गौण आहे. परंतु, या सर्व जड पसाऱ्यात केवळ जीवा जवळंच चैतन्य आहे. त्यातून मनुष्यजन्म तर जीवात्मेची उच्चतम पायरी. जगाच्या या अफाट पसाऱ्याला समजून घेण्याची क्षमता आपल्याकडे बुद्धी रूपाने आहे. ब्रह्मांडाचे रहस्य जाणून घेणाऱ्या प्रत्येक वैज्ञानिकाला वा भौतिकीतज्ज्ञाला हा अनुभव आला आहे, की विश्वाची रचना करण्याऱ्याला पण हे रहस्य कुणीतरी समजून घ्यावं असे वाटत असेल म्हणून त्याने मनुष्याला एवढा सक्षम मेंदू दिला. परंतु, फक्त ज्ञान उपयोगाचे नाही. त्यासोबत जाणीव असणे आवश्यक आहे.

एवढं मोठं काळाचं गणित बघितल्यावर अधिक महिना हा एखाद्या जादूगाराने आपल्या पोतडीतून काढून दिलेली एखादी विलक्षण वस्तू आहे, असे वाटते. किंवा पसारा आवरताना कपाटात कधीतरी आपणच लपवून ठेवलेले पैसे अचानक सापडल्यासारखे, हे अधिक दिवस आपल्याला मिळतात. त्याकरिताच आपल्या ग्रंथांमधे हा महिना धार्मिक किंवा सामाजिक कार्यात स्वत:ला गुंतवून घेण्यास सांगितले आहे. लोक या महिन्यात जप तप, तीर्थयात्रा, व्रत वैकल्य इत्यादी करतात.

हे झालं आत्मिक उन्नतीसाठी. आजच्या काळात सर्वत्र उदासीनता व भय पसरलेले असताना आपण समाजासाठी काय करू शकतो, याचा शोध घेण्याची संधी या दृष्टिकोनातून पण अधिक मासाकडे बघता येईल. आत्मिक उन्नती व सामाजिक उन्नती हे एकमेकांशी बांधील आहेत. २०२० मधला हा ‘अधिक अश्विन’ आपल्याला दोन्ही प्रकारे चिंतन मनन व कृती करण्यास, व त्या पुरुषोत्तम प्राप्ती कडे वाटचाल करण्यास एक संधी अधिक देतो आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com