महिला खरेच स्वतंत्र आहेत?

ऋता बावडेकर
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

महिलांवर नेमके कोणकोणत्या प्रकारचे अन्याय - अत्याचार होत असतील असे वाटते? घरगुती हिंसाचार, यात हुंड्यासाठी मारहाण - प्रसंगी जिवे मारणे, मनाविरुद्ध शरीरसंबंधांसाठी पतीची बळजबरी, कधी सासरा-दीर, वडील-भाऊ यांची बळजबरी, सासूचा जाच, आईनेच पोटच्या मुलीला वाममार्गाला लावणे.. वगैरे गोष्टी येतात. याशिवाय बलात्कार, मानसिक घुसमट, मनाविरुद्ध लग्न होणे, पुढे शिकायला न मिळणे, लायकी असूनही केवळ स्त्री म्हणून बढतीची किंवा कोणतीही संधी नाकारली जाणे... अशा कितीतरी गोष्टींतून आपण म्हणजे समाज बायकांवर अन्याय - अत्याचार करत असतो.

महिलांवर नेमके कोणकोणत्या प्रकारचे अन्याय - अत्याचार होत असतील असे वाटते? घरगुती हिंसाचार, यात हुंड्यासाठी मारहाण - प्रसंगी जिवे मारणे, मनाविरुद्ध शरीरसंबंधांसाठी पतीची बळजबरी, कधी सासरा-दीर, वडील-भाऊ यांची बळजबरी, सासूचा जाच, आईनेच पोटच्या मुलीला वाममार्गाला लावणे.. वगैरे गोष्टी येतात. याशिवाय बलात्कार, मानसिक घुसमट, मनाविरुद्ध लग्न होणे, पुढे शिकायला न मिळणे, लायकी असूनही केवळ स्त्री म्हणून बढतीची किंवा कोणतीही संधी नाकारली जाणे... अशा कितीतरी गोष्टींतून आपण म्हणजे समाज बायकांवर अन्याय - अत्याचार करत असतो. पण यापेक्षाही वेगळ्या पद्धतीने महिलेवर अन्याय-अत्याचार केला जाऊ शकतो, याचा कोणी विचारही केलेला नसेल. कदाचित तशी उदाहरणे असतीलही, पण अजूनतरी ती समाजापुढे आलेली नाहीत.

काश्‍मिरमधील आयएएस अधिकारी शाह फैजल यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली आहे. त्यांच्या एका महिला सहकाऱ्याने दिलेल्या राजीनाम्यासंदर्भात ही पोस्ट आहे. वर वर दिसायला हे प्रकरण खूपच साधे, नेहमीचे वाटते; पण ते तसे नाही. खूप गुंतागुंतीचे, गंभीर, विचार करायला प्रवृत्त करणारे आहे. एकविसाव्या शतकाच्या गप्पा करणाऱ्या आपल्यापुढे अनेक प्रश्‍न उभे करणारे आहे...

पत्नीच्या नावे राजीनामापत्र
शाह फैजल यांना एक दिवस एक पत्र मिळाले. त्यांच्या एका महिला सहकाऱ्याचे ते राजीनामा पत्र होते. इंग्रजीत लिहिलेल्या या पत्रात राजीनाम्याचे काही विशिष्ट कारण दिलेले नव्हते, पण आता सरकारी नोकरी करायची नसल्याचे त्यात म्हटले होते. सध्या नोकऱ्या सहजा सहजी मिळत नाहीत, अशा काळात हाती असलेली नोकरी कोणी सोडतंय म्हणून शाह यांना आश्‍चर्य वाटले. पण एखाद्याची इच्छाच असेल तर काय? म्हणून त्यांनी ते पत्र पुढील कारवाईसाठी आपल्या सहकाऱ्याकडे दिले. सगळी तपासणी होऊन काही महिन्यांनी पुन्हा ती फाईल शाह यांच्याकडे आली. ती फाईल चाळत असतानाच एक महिला तीरासारखी त्यांच्या केबिनमध्ये शिरली. तिने इकडे तिकडे बघितले आणि शाह यांच्या हातातील फाईल हिसकावून घेतली. कोणाला काही कळण्याच्या आत आतील कागदपत्रे तिने फाडून टाकली. ती महिला तिथेच बसकण मारून जोरजोरात रडू लागली. काही वेळाने शाह यांना कळले, की काही महिन्यांपूर्वी ज्या महिलेने राजीनामापत्र पाठवले होते आणि आत्ता जिची फाईल आपल्या हातात होती, ती हीच महिला आहे. तिच्याही नकळत तिच्या नवऱ्याने तिचे राजीनामापत्र पाठवून दिले होते. कारण एकच तो तिच्यापेक्षा कमी शिकलेला होता. त्याच्याकडे नोकरी नव्हती आणि बायको नोकरी करते, कमावते, यशस्वी होते हे त्याला बघवत नव्हते.. आणि आत्ता "मला माझ्या मुलांसाठी नोकरी करायची आहे,' असे ती परोपरीने शाह यांना विनवत होती. शाह म्हणतात, "या महिलेला तिच्या एका सहकाऱ्याने ही माहिती दिली होती. ती अगदी वेळेत आमच्यापर्यंत पोचली.'

महिलेवरील अन्यायाचा हा प्रकार मला तरी नवीन आहे. म्हणजे पत्नीची प्रगती न बघवणे, तिच्या प्रगतीत खो घालणे; प्रसंगी नोकरी सोडण्यासही तिला भाग पाडणे हे प्रकार कोणालाच नवीन नाहीत. पण पत्नीच्या नकळत तिच्या नावाने, तिचे राजीनामापत्र पाठवणे ही गोष्ट नुसतीच गंभीर नाही तर भयावहही आहे. व्यक्तिस्वातंत्र्यावर तर हा घाला आहेच, पण पती-पत्नी या नात्याला, त्यांच्यात अपेक्षित असलेल्या विश्‍वासाला तडा देणारा आहे. हा तडा कसा भरून निघणार? गमावलेला विश्‍वास कसा परत मिळवणार? मग मनात प्रश्‍न येतो, इतक्‍या थराला जाणाऱ्या माणसाला नातेसंबंधांची खरेच इतकी चाड असेल का? असती तर त्याने आपली मर्यादा ओलांडलीच नसती. महिलांनी सावध राहावे, असे प्रत्येकजणच म्हणतो, पण ज्याच्यावर पूर्ण विश्‍वास ठेवून त्या आपले सगळे आयुष्य ज्याच्यावर सोपवतात, त्या पतीपासूनही सावध राहण्याची वेळ त्यांच्यावर यावी, या दुर्दैवाला काय म्हणावे? अर्थातच सगळे पुरुष-पती असे नसतात किंवा अशा घटनाही रोज रोज घडत नसतात, तरीही शंकेला वाव उरतोच. एका घटनेवरून कोणताही निष्कर्ष काढू नये, तरीही ज्याच्या मनातच पाप आहे अशी समविचारी मने पुन्हा असे कृत्य करणारच नाहीत, याची कोणीच खात्री देऊ शकत नाही.

बाईकडेच नैतिकतेची मक्तेदारी
एखाद्या बाईवर कोणत्याही प्रकारचा अन्याय-अत्याचार झाला, की पहिल्यांदा तिला नैतिकतेचे धडे दिले जातात. तिच्या पेहरावापासून तिच्या वागण्या-बोलण्यापर्यंत सगळ्यावर जोरदार मतप्रदर्शने केले जाते. तिच्यावर अन्याय करणाऱ्या पुरुषावर मात्र अभावानेच टीका होताना दिसते. बलात्कारासारख्या गंभीर प्रकारातही समाज स्त्रीला जेवढा दोष देतो, तेवढा पुरुषाला देत नाही. त्यामुळेच अन्याय झालेल्या स्त्रीवर तोंड लपवून राहण्याची किंवा आत्महत्या करण्याची वेळ येते. पुरुष मात्र राजरोस सगळीकडे वावरू शकतो. अशा सगळ्या पार्श्‍वभूमीवर शाह फैजल जे बोलले ते म्हणूनच वेगळे वाटते. ते म्हणतात - त्या महिलेकडून तिची कहाणी ऐकताना माझी आणि माझ्या इतर पुरुष सहकाऱ्यांची मान शरमेने खाली गेली. आपली पत्नी आपल्यापेक्षा मोठी होऊ नये अशी किंवा या प्रकारची असुरक्षिततेची भावना अनेक पुरुषांच्या मनात असू शकते. या घटनेत ही महिला वेळेत आल्यामुळे तिची नोकरी वाचवू शकली. पण प्रत्येक वेळी प्रत्येक महिला इतकी भाग्यवान असेलच असे नाही. पण या निमित्ताने लक्षात आले - कुठल्याही शाळेत बघा, मुलांपेक्षा मुली अधिक प्रगती करताना दिसतात. बालसुधारगृहातही मुली कमी आणि मुलगेच अधिक दिसतात. तुरुंग, व्यसनमुक्ती केंद्रांतही मुलगेच अधिक दिसतात. रस्त्यावर दंगा करणारे, दगडफेक करणारे, विचित्र हेअरकट करून रस्त्यात कुठेही पचापच थुंकणारे मुलगेच असतात. मी जरी काश्‍मिरपुरते बोलत असलो, तरी देशात कुठेही थोड्याफार फरकाने अशीच परिस्थिती दिसते. हे सगळे बघता, भविष्यात किती नवरे आपल्या पत्नीच्या नकळत तिचा राजीनामा पाठवणार आहेत, याबद्दल चिंता वाटते. एकूणच या परिस्थितीवर उपाय काय?'

विशेष वागणूक नको
आपल्या समाजात पुरुषांना नेहमीच विशेष वागणूक मिळत आली आहे. याउलट महिलांना मिळणारी प्रत्येक संधी ही तिच्यासमोर टाकलेल्या भाकरीच्या तुकड्यासारखीच असते. खूप कमी मुली भाग्यवान असतात, ज्यांना सहजपणे शिकता येते, मनासारखे वागता येते. पण बहुतांश मुलींना संधीची वाट बघत तिचा लाभ घ्यावा लागतो. त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो, खूप झगडावे लागते. सगळ्या गोष्टी सहजपणे, आयत्या मिळणाऱ्या काही पुरुषांना आणि काही भाग्यवान महिलांना याचे मोल समजणार नाही. त्यामुळे महिलांवरील अन्याय - अत्याचार कमी करायचे असतील तर याची जाणीव समस्त पुरुषवर्गाला (खरे तर महिलांनाही) करून द्यायला हवी. (अनेक पुरुषांना याची जाणीव महिलांपेक्षाही अधिक असते, त्यांचा अपवाद आहेच, पण हे प्रमाण वाढायला हवे). त्यासाठी अगदी घरापासून प्रयत्न व्हायला हवेत. दुसरे म्हणजे, महिलांनीच घाबरणे वगैरे सोडून सजग व्हायला हवे. खंबीर व्हायला हवे. आपल्या हक्कांची तिला जाणीव असावी आणि ते तिने वापरावेत. तसेच वर उल्लेख केला, त्याप्रमाणे पुरुषांवर आता "संस्कार' व्हायला हवेत. त्यामध्ये त्याच्या मनातील आणि इतरांच्याही मनातील तो "पुरुष असल्याचा' अहंगंड पहिल्यांदा दूर करावा, त्याच्या मनातील असुरक्षितता कशी दूर करता येईल हे बघावे, त्याच्या जबाबदारीची जाणीव करून द्यावी. त्याचबरोबर समाजमनही बदलण्याचा प्रयत्न करावा. कारण या सगळ्या गोष्टी समाज नावाचा "पुरुष'च करत असतो. हा "पुरुष' एकदा "माणूस' झाला, की त्याच्यासाठीही खूप काही बदलेल...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women are really independent?