यंगिस्तान

यंगिस्तान
यंगिस्तान

"स्कूल रियुनिअन'च्या निमित्ताने बरोबर 30 वर्षांनी आमची 10वीची बॅच शाळेत एकत्र जमली होती. आयुष्यातील सगळ्यात तरल, संवेदनाक्षम, जीवन घडवणारा महत्त्वाचा काळ आम्ही या शाळेत जगलो. इथला प्रत्येक कोपरा एके काळी आमच्या परिचयाचा होता. पण आता मात्र तिथली प्रत्येक गोष्ट अनोळखी, परकी वाटत होती. शाळेच्या त्या भव्य, दगडी वास्तूचं अस्तित्व आता फक्त त्या जागी उभ्या राहिलेल्या चकाचक इमारतीच्या लॉबीत लावलेल्या फोटोपुरतंच शिल्लक राहिलेलं. भूतकाळातील आठवणी जपणाऱ्या त्या फोटोच्या रांगेतच शाळेचं "वर्तमान' सॉफ्ट बोर्डवरच्या इतर फोटोतून झळकत होतं. स्मार्ट युनिफॉर्म, टाय, शूज घातलेल्या फोटोतल्या confident studentsचा, आमच्यातल्या, त्या 30 वर्षांपूर्वीच्या, बाळबोध, काहीशा वेंधळ्या विद्यार्थांना हेवाच वाटला. अत्याधुनिक लॅब, ऑडिटोरिअम, कॉम्प्युटर लॅब! आजची पिढी एकंदर भाग्यवान म्हणायला हवी.

शाळेच्या "कायापालटा'बरोबर शाळेचा आत्माही बदलला होता. आमची मातृभाषा समृद्ध करणारी मराठी माध्यमातील शाळा आता इंग्रजी माध्यमाची शाळा झाली होती. इतर बहुसंख्य शाळेप्रमाणे इंग्रजी भाषेचे आक्रमण तीही रोखू शकली नव्हती. खरं तर, शाळेत जाणवणारा बदल तसा समाजात सगळीकडेच दिसत होता. आमच्या मुलांमार्फत तो आमच्यापर्यंत पोहचून आमच्यातही झिरपलेला. आम्हीही आता, उद्याच्या महासत्तेच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या देशातील, जग कवेत घेणाऱ्या टेक्‍नोसॅव्ही, स्मार्ट मुलांचे parentsबनलेलो. आणि स्वत: आम्ही तरी 30 वर्षांपूर्वीचे कुठे राहिलो होतो? "खाऊजा' धोरणामुळे देशाला आलेली आर्थिक आणि तंत्रज्ञानातील समृद्धीची झळाळी आम्हा मध्यमवर्गावरही पसरली होतीच.
शाळेचा आजूबाजूचा परिसरही हाय-फाय झालेला. आमच्यावेळी गावाबाहेर, तुरळक मध्यमवर्गीय वस्ती असलेल्या या भागाचा आता चांगलाच विस्तार झालेला. उच्चभ्रु लोकांसाठी डेव्हलप केलेले टाऊनशिप, मल्टीप्लेक्‍स, सीसीडीज, मॅकडीज आणि शॉपिंग मॉल! कुठल्याही मेट्रो सिटीत by default आवश्‍यक असणारं सर्व काही !
दुपारच्या जेवणासाठी आम्ही शाळेच्या कोपऱ्यावरच्या पॉश रेस्टॉरंट मध्ये शिरलो. 30 वर्षांपूर्वी या ठिकाणी हॉटेलची टपरी होती. नववी-दहावीच्या वर्षी, सटीसहामशी इथेच आमच्या चहा-वड्याच्या "पार्ट्या' होत. त्या वड्याची चव आठवतच आम्ही तंदुरी-बिर्याणीच्या प्लेट्‌स चाखत-माखत संपवल्या. मघापासून काहीशा मुक्तपणे शाळकरी वयात असल्यासारख्या फसफसणाऱ्या सगळ्याजणी आता हळू-हळू पोक्त संसारी बाईच्या भूमिकेत आक्रसू लागल्या. घरी नवऱ्याच्या, मुलांच्या रात्रीच्या जेवणाची सोय करण्यासाठी जवळजवळ सगळ्यांनीच पार्सल घेतलं.After all आम्ही आता आधुनिक काळातील कर्तव्यदक्ष गृहिणी होतो. इतक्‍या वर्षाने जुळवून आणलेली भेट आवरती घेत, हुरहुरत्या मनाने आम्ही कोपऱ्यावर एकमेकींचा निरोप घेत होतो. इतक्‍यात बाजूने अनपेक्षितपणे वेगाने धावत आलेल्या मुलांच्या टोळक्‍याने आमच्या हाताला जोरदार हिसका देऊन हातातलं पार्सल हिसकावून नेलं. त्या अनपेक्षित प्रकाराने गोंधळलेल्या अवस्थेततही एकदम 30 वर्षापूर्वी त्याच कोपऱ्यावर घडलेली घटना आठवली.

तो आमच्या शाळेच्या निरोप समारंभ होता. निश्‍चिंत असं बालपण संपलेलं! इतकी वर्षे पाऊल वाटेवर एकत्र चालणाऱ्या आम्ही आता अनोळखी हम रस्त्याला वेगवेगळ्या दिशेला जाणार होतो. पाऊलवाटेची, त्यावरच्या सख्यासोबत्यांची संगत तुटणार होती. हम रस्त्याच्या उत्सुकतेबरोबर पुढच्या अनिश्‍चिततेचा तणावही होता. मनाच्या अशा विचित्र अवस्थेत कोपऱ्यावर एकमेकींचा निरोप घेताना, बाजूने समोरच्या झोपडपट्टीतून आलेल्या मुलांच्या टोळक्‍याने चपळाईने आमच्या हातातल्या सेंड ऑफला मिळालेल्या चकली-लाडवाच्या पुड्या हिसकावून नेल्या. चांगल्या खात्यापित्या घरातले असूनही त्या चकली-लाडवाचे तेव्हा, आम्हाला आत्ताच्या महागड्या बिर्याणी-तंदूरीच्या पार्सलपेक्षाही जास्त अप्रूप होतं.

काळ बदलला होता. देशाची, पर्यायाने आमची सगळ्यांची आर्थिक स्थिती बदलली होती. ती शाळा, आजूबाजूचा परिसर सगळ्यावरच समृद्धी पसरलेली. पण त्याकाळची त्या परिसरातील झोपडपट्टी मात्र तशीच राहिलेली. मघाशी बोलण्याच्या नादात, आजूबाजूच्या चकाचक माहोलला जागा मिळेल तिथे कडेकडेने विळखा घातलेली झोपडपट्टी, आमच्या झगमगटाने दिपलेल्या जाणिवेपर्यंत पोचलीच नव्हती. पूर्वी विरळ वस्तीमुळे ती झोपडपट्टी लगेच नजरेत भरायची. आता भोवतालच्या आकाशाला भिडणाऱ्या डौलदार इमरतींमुळे ती पटकन लक्षात येत नव्हती. नवीन इमारती बांधताना ती मागे-मागे सरकत गेली असली तरी तिचं स्वरुप तेच होतं. तिथे वाढणाऱ्या आत्ताच्या पिढीचा अवतारही आधीच्या पिढीसारखाच होता. त्यांची भुकेची वेदनाही तशीच होती. आजूबाजूची "समृद्धी ' त्याच्यांपर्यंत पोचलीच नव्हती.

अचानक एक गोष्ट विजेच्या लोळासारखी मनाला जाणवून गेली. हाताला हिसका देऊन पार्सल पळविणाऱ्या मुलांची ती विखारी नजर! आजूबाजूच्या समृद्ध जगावार सूड घेण्यासाठी पेटलेली ! त्या झोपडपट्टीतल्या या पिढीतही बदल झालाच होता. काळजाचा थरकाप उडवणारा बदल ! 30 वर्षांपूर्वीही त्या मुलाच्यांत, जे मिळत नाही ते हिसकावून घेण्याची वृत्ती होतीच. पण त्यांची त्यावेळची नजर फक्त बंडखोर वाटली. पण जसजशी "ते' आणि "आम्ही' याच्यांतली दरी वाढू लागली तसतसं आधीच्या पिढीच्या बंडखोर भावनांचे रुपांतर पुढच्या पिढीत धगधगत्या सूडाग्नीत झालं. त्या आगीत अख्खं जग जाळून टाकण्याइतका दाह होता. यातूनच पुढे उद्याचे आधिकाआधिक हिंस्त्र गुन्हेगार तयार होणार होते.
सर्वाधिक तरुणांचा देश म्हणून खरं तर भारत भाग्यवान म्हटला पाहिजे. तरुणाई म्हणजे सळसळता उत्साह, अमर्याद उर्जा! हा उत्साह, ही उर्जा देशाचा विकास घडविण्यासाठी कारणी लागली तरच भारताचे महासत्ता बनण्याचे स्वप्न साकार होऊ शकेल. महासत्ता बनण्याचा हा प्रवास उद्याचे भविष्य घडविणाऱ्या "आमच्यातील' आणि "त्यांच्यातील' मुलांनी हातात हात घालून केला तर वाटेतले अडथळे सहज पार होतील. त्यासाठी गरज आहे ती आपल्यातल्या समर्थ तरुण हातांची ! जे हात दारिद्रयाच्या, अज्ञानाच्या दलदलीत रुतलेल्या तरुणांना त्यातून बाहेर काढू शकतील. अशी तरुणाई घडविणे हेच आमच्यासारख्या प्रत्येक सुविद्य नागरिकापुढचे आव्हान असेल. हे शिवधनुष्य पेलल्यावरच भारत खऱ्या अर्थाने समृद्ध, सुसंकृत आणि सुरक्षित "यंगिस्तान' बनेल! अन्यथा...

-

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com