एक दिवस आनंदातला...

एक दिवस आनंदातला...
एक दिवस आनंदातला...

संसारात पडले की बालपण हारवून जाते. मग लहान-लहान गोष्टीवर देखील त्रागा सुरू होतो. त्यात नेहमीच भेडसावणाऱ्या प्रांपचिक समस्या त्यात दिवस कोठे निघून जातो कळत नाही. नोकरीला असल्यावर तर कामाच्या कटकटीत मुलांसाठी वेळ देता येत नाही. केस पांढरे पडायला लागले की जुन्या आठवणी तरळून जातात. बालपणी तरूणपणी आलेल्या अनुभवाचे पाढे वाचायला सुरूवात होते. मनोरंजन करून स्वतःसाठी वेळ काढण्यासाठी वेळ मिळत नाही. पण कवठे येमाई (ता. शिरूर, जि. पुणे) येथील मित्रांनी असेच एकत्रीत येत एकदिवसीय सफर काढत जीवनाचा आनंद लुटला. सुख-दुःखाच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आनंदात एक दिवस आनंदात घातला.

दहावी झाली अन सगळ्यांमध्ये दुरी निर्माण झाली होती. अभ्यासात प्रावीण्य मिळविल्यावर बारावी व पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊन बहुतेक सर्वजण नोकरीला लागले होते. शिक्षक, पोलिस अधिकारी, अभियंता, शिक्षण विभागात अधिकारी पदावर तर कोणी उद्योजक म्हणून नावलौकीक मिळवला होता. नोकरी निमित्त सगळेच जण वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने भेट होत नसे. वयाच्या पन्नाशीला भिडल्यावर मागे वळून पाहताना मित्रांची आठवण होणे सहाजीकच आहे. त्यामुळे या मित्रांनी एकदिवसीय सहल काढण्याचे ठरविले. तसे ते एकत्रीत आले देखील... त्यातून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

पाऊस पडू लागला की खुपसा खुपसी अन्‌ उन्हाळ्यात तिरपाणी खेळण्यात दंग. मग काय दिवसभर गोसावीची विहिरीवर दिवसभर पोहायचे. शिवनापानीचा खेळ खेळून दमल्यावर त्यांच्याच आंब्याच्या कैऱ्या तोडायच्या. गावरान बोरांवर ताव मारायचा. रविवार हा आपुलकीचा वार असायचा. कोणाशी भांडण झाल की कट्टी करत बट्टी करण्यासाठी सलगी असायची. आळींना वेगवेगळी नावे देऊन समाज उपयोगी कामाला एकत्रीत येऊन पुढाकार घ्यायचा. अशाच काही गोड, तिखड, आंबड अनुभवाने या मित्राचे बालपण गेले होते. त्याचाच पाढा एकमेक वाचत होता.

एकदातर काय झाल पावसाळ्यात गांडूळ निघाले. मित्रांमध्ये ठरले की त्याला मारायचे नाही. मग काठी आणून त्याला वारूळात सोडायचे ठरले. एकाने काठी आणली त्याला उचलून जवळच असणाऱ्या वारूळात ठकलले. गांडूळ जसे आत गेले तसे त्यातून नागाने फडा बाहेर काढला. नागाला पाहून या मित्रांची चांगलीच पाचावर धारण बसली होती. दुष्काळी भाग व रोजगार हमीची कामे यातून सर्वांचीच गरीब परीस्थीती होती. त्यामुळे सुकट खावून दिवस काढणारे हे मित्र होते.

शिक्षणात मात्र कधीच कोणी मागे पडले नाही. अभ्यासाच्या वेळी अभ्यास तर खेळण्याच्या वेळी खेळ असायचा. त्यामुळे शॉटी व्हॉलीबॉल सारख्या खेळात या मित्रांनी चांगलीच आघाडी घेतली होती. कान्हाचा शॉट अन्‌ भरतची नेट कधी चुकली नाही. कॅरम, कब्बडी सारख्या खेळात देखील त्यांनी प्राविण्य मिळविले होते. काही गरीब मित्रांना एकमेकांकडून नेहमीच मदत मिळत असे. त्यावेळी पुणे व शिरूरवरून येणारी एकच गाडी अन्‌ तिच्यातून येणारा रोजचा डबा हा खरा चर्चंचा विषय होता. मुलगा शहरात शिक्षण घेतो म्हटल्यावर आईवडीलांनी जेवनाच्या डब्याची घेतलली काळजी डोळ्यात पाणी आणणारी ठरणारी होती. त्यातील काहींचे आईवडील हायात नसल्याने त्यांच्या आठवणींनी काही वेळ गांभीर्यात गेला.

एकमेकांना जीवनात मिळालेला अनुभव शब्द रुपात उतरत होता. मित्राच्या आयुष्यात तरूणपणात आलेल्या सहचारीनी म्हणून मिळालेल्या सौभाग्यवतीना त्यांनी सामिल करून घेतले होते. गावाकडची मजाच न्यारी म्हणत सगळ्यांच्या सौं.ची ओळख करून देत सगळेच गप्पा मारत होते. कुणी कॅरम तर कोणी टॅकींग करत होते. रेनडान्स, स्विमींग, बैलगाडीत बसून आनंद मिळवला. एकत्रीत भोजन करत बालपणीचे मित्र एक दिवसाच्या सफरीत रंगून गेले होते.

परतीच्या प्रवासात मात्र परत आपन लवकरच एकत्रीत यायच... असे सांगत सगळ्यांनीच निरोप घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com