esakal | Ganesh Festival : महाडमध्ये गौराईचे धुमधडाक्‍यात आगमन 
sakal

बोलून बातमी शोधा

Ganesh Festival : महाडमध्ये गौराईचे धुमधडाक्‍यात आगमन 

Ganesh Festival : महाडमध्ये गौराईचे धुमधडाक्‍यात आगमन 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

महाड : गणरायापाठोपाठ माहेरवाशीण गौराईचे आज सर्वत्र धुमधडाक्‍यात आगमन झाले. गौरी आगमनामुळे महिलावर्गात उत्साहाचे वातावरण पसरले असून, रविवारी (ता. 16) गौरीपूजन केले जाणार आहे. 

भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आगमन होते. रायगड जिल्ह्यात 13 हजार 370 गौराईंची प्रतिष्ठापना करण्यात आली असून, रविवारी सुवासिनींच्या हस्ते गौरीपूजन होणार आहे. अनेक गावांत आज पारंपरिक पद्धतीने गौराईचे घरोघरी आगमन झाले. कोकणात ग्रामीण भागात गौरीला "गवर' असेही म्हणतात. महिला जवळच्या पाणवठ्यावर गौराई आणण्यासाठी जातात.

नदीपात्रातील सात दगड वेचून त्याची नदीकिनाऱ्यावर पूजा केली जाते. त्यानंतर दगड, फुलोरा आणि गौरीचा मुखवटा वाजत-गाजत घरी आणला जातो, तर काही ठिकाणी रानातून तेरड्याच्या गौरी आणल्या जातात. घरातील गणपतीच्या मखरात गौरींची स्थापना केली जाते. खास भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. रात्री गौरीचे स्तवन, महिलांची नाचगाणी, फुगड्यांचे खेळ होतात. सोमवारी (ता. 17) सायंकाळी गौरींचे पारंपरिक पद्धतीने विसर्जन केले जाणार आहे.