
शिवसेना तीनवेळा फोडली
मुंबई - राज्यातील सत्ता संघर्ष रोज वेगवेगळी वळणे घेत असताना मंगळवारी बंडखोर आमदारांच्या गटाने मवाळ भूमिका घेतली असल्याचे जाणवते, तर दुसरीकडे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही एक पाऊल मागे घेत बंडखोर आमदारांना परत फिरण्याचे आवाहन केले आहे. बंडखोर गटाने विविध आमदारांच्या ध्वनिचित्रफिती प्रसारित करून त्यांनी घेतलेल्या भूमिकेचे समर्थन केले आहे, तर बंडखोर गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनीही आपली भूमिका मांडत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेच शिवसेनेचे शत्रू असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मित्र असल्याचा दावा केला आहे. पवार यांनी तीनवेळा शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला.
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या बेताल बोलण्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांचे संबंध बिघडले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यापूर्वी तीनवेळा शिवसेना फोडली आहे. शिवसेना आमदाराच्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्याच पडलेल्या उमेदवाराला ताकद दिली जात आहे. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना त्यांच्यावर विश्वास होता, पण शिवसेना संपवण्याचा त्यांचा एककलमी कार्यक्रम असल्याचे दिसत आहे. सत्तेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना पणाला लावत आहे. आमचा गट भाजपमध्ये विलीन होणार असे सांगितले जात असले, तरी या अफवा असल्याचे केसरकर यांनी सांगितले. बंडखोर आमदारांची बाजू मांडताना दीपक केसरकर यांनी विविध मुद्दे मांडले.
देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपले चांगले संबंध असल्याने आम्ही एकटे पडलो असताना त्यांनीच आम्हाला संरक्षण दिले. भाजपशासित राज्यात आम्हाला संरक्षण मिळत आहे. महाराष्ट्रात लवकरात लवकर येण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. विश्वासदर्शक ठरावावेळी आम्ही आमची भूमिका मांडू. मात्र आज जे महाराष्ट्रात सुरू आहे तो भावनिक ब्लॅकमेल करण्याचा प्रकार आहे.
- दीपक केसरकर, बंडखोर आमदार, शिवसेना.
संजय राऊतांनी राजीनामा द्यावा
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही त्यांनी चांगलेच तोंडसुख घेतले. ‘‘शिंदे गटाच्या आमदारांचा राऊत यांच्याबद्दल राग आहे. आम्ही भाजप-शिवसेना युतीच्या जिवावर निवडून आलो आहोत. तर राऊत आमच्या जिवावर निवडून येतात. त्यांच्यासारखे प्रवक्ते कोणत्याही पक्षाला मिळू नयेत,’’ असे दीपक केसरकर यावेळी म्हणाले. ‘‘एकनाथ शिंदे यांना राऊत रिक्षावाला म्हणतात, पण त्याच रिक्षावाल्याने शिवसेनेचा एक विभाग सांभाळला, ठाण्यातील सत्ता शिवसेनेला मिळवून दिली त्यामुळे अशी भाषा वापरणाऱ्या संजय राऊत आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली.
Web Title: शिवसेना तीनवेळा
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..