फिलिपिन्सच्या 10 नागरिकांनी वाढवला नवी मुंबईचा ताप! वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 5 April 2020

  • 10 परदेशी नागरिकांवर गुन्हा दाखल
  • नवी मुंबईत बेकायदेशीर वास्तव्य करुन कोरोनाचा फैलाव केल्याचा ठपका  

नवी मुंबई: दिल्ली येथून वाशी सेक्टर-9 येथील नूर ए मस्जिदमध्ये धार्मिक कार्यक्रमासाठी आलेल्या फिलिपिन्स नागरिकांविराेधात रविवारी (ता.५) वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या नागरिकांनी नवी मुंबईत कोरानाचा फैलाव केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. 

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दिल्ली येथून आलेल्या 10 पैकी 3 फिलिपिन्स नागरिकांना कोरोना विषाणूंची लागण झाली असताना देखील त्यांनी प्रशासन आणि पोलिसांना कोणत्याही प्रकारची माहिती न देता वाशीमध्ये वास्तव्य केले होते. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या मशिदीतील मौलवीसह काही कर्मचारी व नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. दरम्यान, कोरोनासंदर्भात गुन्हा दाखल होण्याची राज्यातली ही पहिलीच घटना आहे.  
गत मार्च महिन्यात दिल्ली, निजामुद्दीन येथे आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक कार्यक्रमात फिलिपिन्स देशातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दिल्ली येथील कार्यक्रम संपल्यानंतर 10 मार्च रोजी तबलिग जमातीचे 10 फिलिपिन्स नागरिक वाशी सेक्टर-9 येथील नुरुल इस्लाम ट्रस्टच्या नुर-ए-मस्जिदमध्ये धार्मिक कार्यक्रमासाठी आले होते. या वेळी सर्व फिलिपिन्स नागरिक हे 16 मार्चपर्यंत नवी मुंबईत वास्तव्यास होते. त्यातील 68 वर्षीय व्यक्तीसह तिघांना कोरोना विषाणूंची लागण झाली. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या वाशीतील मौलवींसह इतर अनेकांना कोरोनाची लागण झाली.  

अधिक बातम्यांसाठी "ईपेपर" वाचा।

फिलिपिन्स नागरिकांमुळे कोरोना विषाणुंचा फैलाव होऊन नवी मुंबईतील कोरोना बाधितांची संख्या वाढल्याचे आढळून आले आहे. ज्या 3 फिलिपिन्स नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती, त्यातील 68 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून इतर दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर इतर ७ जण पुन्हा दिल्ली येथे परतले आहेत. याप्रकरणी पोलिस नाईक संतोष कांबळे अधिक तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 10 Foreign nationals charged with crime