

महाड, ता. २१ (बातमीदार) : रायगड जिल्ह्यातील १०३ गावे या वर्षी दरडीच्या छायेत असून सर्वाधिक, ४९ गावे महाड तालुक्यातील आहे. गेले अनेक वर्षे रायगड जिल्ह्यामध्ये होत असलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर भूवैज्ञानिकांनी केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे.
महाड तालुक्यातील पारमाची या गावांमध्ये १९९४ मध्ये पहिली दरड कोसळल्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्तीला सुरुवात झाली. २००५ च्या नैसर्गिक आपत्तीमध्ये महाड तालुक्यामध्ये दासगाव, जुई, कोंडीवते व रोहन गावामध्ये दरड कोसळून १९२ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर जिओ लॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या वैज्ञानिकांनी रायगड जिल्ह्यातील गावांचा सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली होती. २०२१ मध्ये तळिये येथे दरड कोसळून ८६ जणांचा मृत्यू झाला होता. तर गतवर्षी इर्शाळवाडीत दरड कोसळून ८४ जण गाडले गेले. दरवर्षी जिल्ह्यातील दरडग्रस्त गावांचे सर्वेक्षण केल्यानंतर वैज्ञानिकांकडून संभाव्य दरडग्रस्त गावांची यादी प्रसिद्ध केली जाते. त्यानुसार या वर्षी रायगड जिल्ह्यामध्ये १०३ गावे दरडीच्या छायेत आहेत. या गावांचे वर्गीकरण करण्यात आले असून वर्ग एकमध्ये अति धोकादायक ९ गावे, वर्ग दोनमध्ये धोकादायक ११ गावे तर वर्ग तीनमध्ये ८३ सौम्य धोकादायक गावे अशा १०३ गावांचा समावेश आहे.
महाडमध्ये सर्वाधिक ४९ गावे
रायगड जिल्ह्यातील बहुतांशी गावे डोंगरदऱ्यामध्ये वसलेली आहेत. यामध्ये महाड व पोलादपूर हे दोन तालुके अत्यंत दुर्गम तालुके आहेत. त्यामुळे सर्वाधिक धोकादायक ४९ गावे महाड तालुक्यातील आहेत. सह्याद्रीच्या पर्वत रांगात वसलेल्या या गावांमध्ये अतिवृष्टी झाल्यावर डोंगरातील माती सैल होऊन दरड कोसळण्याची भीती निर्माण होते.
ग्रामस्थांचे स्थलांतर हाच उपाय
अतिवृष्टी झाल्यास धोकादायक गावांना प्रशासनाकडून स्थलांतर करण्याच्या नोटिसा दिल्या जातात. याकरिता सुरक्षित ठिकाणी असलेल्या शाळा व मंदिरांमध्ये ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यात येते व तिथे त्यांना काही दिवस सुविधा पुरवल्या जातात. तर काही ठिकाणी कायमस्वरूपी निवारा शेड बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
भूवैज्ञानिकांनी सुचवलेल्या उपाययोजना
- खाणकाम आणि उत्खननावर निर्बंध घालण्यात यावेत.
- डोंगर उतारावर वृक्ष तोडण्यास मज्जाव करण्यात यावा.
- पावसाळ्यापूर्वी डोंगर उतारावर सैल झालेले दगड हटवण्यात यावेत.
- डोंगर उतारावरील पाण्याचा निचरा वेगाने व्हावा यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात
- दरडरोधक संरक्षक भिंतीची उभारणी करण्यात यावी.
संभाव्य दरडग्रस्त गावे
महाड- ४९, पोलादपूर- १५, रोहा- १३, म्हसळा- ६,माणगाव- ५,पनवेल- ३,खालापूर- ३, कर्जत- ३ , सुधागड- ३, श्रीवर्धन- २,तळा- १
अतिवृष्टीच्या सूचना मिळाल्यानंतर धोकादायक गावातील नागरिकांना त्वरित स्थलांतरित केले जात असते. व अशा गावांमधील सर्व हालचालींवर प्रशासन लक्ष ठेवून असते.
- महेश शितोळे, तहसीलदार, महाड
महाड ः तळिये येथील दरड कोसळल्याचे संग्रहित छायाचित्र
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.