अकरावी प्रवेश प्रक्रिया रखडणार, दुसरी गुणवत्ता यादी लांबणीवर

तेजस वाघमारे
Thursday, 10 September 2020

गुरुवारी सकाळी 10 वाजता जाहीर होणारी दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार नाही. सरकारचे आदेश आल्यानंतर प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.

मुंबई:  सर्वोच्च न्यायलयाने मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या आदेशामुळे अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया शिक्षण विभागाने पुढे ढकलली आहे. यामुळे गुरुवारी सकाळी 10 वाजता जाहीर होणारी दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार नाही. सरकारचे आदेश आल्यानंतर प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत अंतिम निर्णय येईपर्यंत लागू करण्यात आलेले सर्व लाभ रद्द करण्याचे अंतरिम आदेश दिला आहे. इयत्ता अकरावीची पहिली गुणवत्ता यादी 30 ऑगस्टला जाहीर झाली. यानंतर आज सकाळी 10 वाजता दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार होती. यासाठी मुंबई विभागातून एक लाख 49 हजार 12 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. यातच न्यायालयाच्या निर्णयामुळे ही प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे अकरावीत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थांना प्रवेशासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने यापुढील इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेची सदर कार्यवाही पुढे ढकलण्यात येत आहे असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

अकरावी प्रवेश प्रक्रियेचे सुधारीत वेळापत्रक शासन आदेश प्राप्त झाल्यानंतर जाहीर करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात अकरावी प्रवेशसाठी 12 टक्के मराठा आरक्षण लागू करण्यात आले आहे. यानुसार मुंबई विभागात पहिल्या फेरीसाठी 17844 जागा उपलब्ध होत्या. या जागांवर 2923 अर्ज आलेत त्यापैकी 2788 विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरले होते.

-------

(संपादनः पूजा विचारे)

11th admission process delayed second quality list will be extended


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 11th admission process delayed second quality list will be extended