अकरावीचे पुढच्या वर्षीचे प्रवेशही लांबणीवर? कोरोनामुळे शैक्षणिक वेळापत्रक विस्कळीत

तेजस वाघमारे
Thursday, 21 January 2021

दहावी परिक्षेचा निकाल उशिरा जाहीर होणार असल्याने अकरावीचे पुढील वर्षीचे प्रवेशही लांबण्याची शक्यता आहे.

मुंबई : यंदा कोरोनाचा फटका शिक्षण क्षेत्राला बसला. अकरावी प्रवेशप्रक्रियाही अद्याप पूर्ण झालेली नसून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे अकरावीचे वर्गही सुरू झालेले नाहीत. त्यातच आता एप्रिलमध्ये होणाऱ्या दहावी परीक्षेचा निकाल ऑगस्ट महिनाखेरीस लागणार असल्याची घोषणा शिक्षण विभागाने केली आहे. निकाल उशिरा जाहीर होणार असल्याने अकरावीचे पुढील वर्षीचे प्रवेशही लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे निकाल जाहीर होऊन प्रत्यक्ष प्रवेशास सप्टेंबरचा शेवटचा आठवडा उजाडण्याची शक्यता असून अकरावीचे पहिले सत्र यामुळे विस्कळीत होणार आहे.

दहावी निकाल उशिरा जाहीर झाल्याने अकरावी प्रवेशालाही विलंब झाला आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी यूट्यूबच्या माध्यमातून ऑनलाईन वर्ग सुरू असून पुढे या विद्यार्थ्यांना बारावीत प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करायचे याविषयी लवकरच निर्णय घेतला जाईल, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. यापूर्वी अकरावीचे 70 टक्के प्रवेश पूर्ण झाल्यावर महाविद्यालय सुरू करण्याची परवानगी शिक्षण विभाग देत होते. मात्र अद्याप तरी शिक्षण विभागाकडून कोणतीही सूचना देण्यात आलेली नाही. तसेच काही महाविद्यालयांनी शिक्षण विभागाच्या सूचनांची वाट न पाहता प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग सुरू केले आहेत.

मुंबई, ठाणे परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

अकरावीचे सत्र उशीराने सुरू झाल्यामुळे अभ्यासक्रम कमी होईल, अशी अपेक्षा प्राचार्यांना आहे. शिक्षण विभागाकडून अकरावीचा अभ्यासक्रम किती असेल याविषयी कोणत्याही सूचना न आल्याने परीक्षा कशी घेणार हा प्रश्न महाविद्यालयांना सतावत आहे.

11th next years admission also postponed? Corona disrupts academic schedule in maharashtra marathi educational news

----------------------------------------------- 

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 11th next years admission also postponed? Corona disrupts academic schedule in maharashtra marathi educational news