
नांदेडचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या मुंबईतील राहत्या घरात चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या चोरट्यांनी त्यांच्या घरातून तब्बल २५ लाख रुपये लंपास केलेत. इतकेच नाही तर चोरट्यांनी त्यांच्याकडे ३० लाखांची खंडणी देखील मागीतली आहे. मात्र चक्क आमदाराच्या घरी चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून याप्रकरणी एन एम जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
मुंबईतील सोढा बिलिसिमो को. ऑपरेटिव्ह सोसायटीतील शामसुंदर शिंदे यांच्या राहत्या घरात १ एप्रिल ते २८ मे दरम्यान घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान आमदार शिंदे यांच्या ड्रायव्हरने त्याच्या मित्राच्या मदतीने ही चोरी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. इतकेच नाही तर आरोपींनी आमदार श्यामसुंदर यांना फोन करून ३० लाखांची खंडणी देखील मागीतली. साम टीव्हीने याबद्दलचे वृत्त दिले आहे.
तसेच ड्रायव्हरने १ जूनपर्यंत पैसे न दिल्यास रायगडवर जाऊन बरेवाईट करून घेईल आणि सोशल मीडियावर बदनामी करेल अशी धमकी देखील आमदार शिंदे यांना देण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी शिंदेंचे स्वीय सहायक यांनी तक्रार दिली असून ना.म.जोशी मार्ग पोलीस ठाण्यात ड्रायव्हर चक्रधर पंडित मोरे आणि त्याचा साथीदार अभिजीत कदम या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.