गतीमंद बालसुधारगृहातील कोरोना बाधितांवर 'या' रुग्णालयांमध्ये उपचार सुरू; 29 व्यक्तींना झाली लागण

भाग्यश्री भुवड : सकाळ वृत्तसेवा 
Sunday, 26 July 2020

मानखुर्दच्या बालसुधारगृहमधील 29 गतीमंद मुलांना कोरोनाची लागण झाल्याची घटना घडली आहे. या मुलांवर सध्या सायन रुग्णालय आणि बीकेसी कोविड केंद्रात उपचार सुरू आहेत.

 

मुंबई ः मानखुर्दच्या बालसुधारगृहमधील 29 गतीमंद मुलांना कोरोनाची लागण झाल्याची घटना घडली आहे. या मुलांवर सध्या सायन रुग्णालय आणि बीकेसी कोविड केंद्रात उपचार सुरू आहेत. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना आता या कोरोना विषाणूने मानखुर्दच्या बालसुधारगृहामध्ये देखील शिरकाव केला आहे. मानखुर्द येथील गतीमंद व्यक्तींसाठी असलेल्या शेल्टर होममधील 29 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. या शेल्टर होममधील 80 जणांची काही दिवसांपूर्वी कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल रविवारी प्राप्त झाला. त्यात 29 मुलांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. 

मुंबईत लोकल सेवा सुरु होणार?, पालिका आयुक्तांनी घातली 'ही' अट

मानखुर्द बालसुधारगृह परिसरात गतीमंद व्यक्तींसाठी शेल्टर होम असून त्यात लहान मुलांपासून वयोवृद्ध गतीमंद व्यक्तींनाही ठेवण्यात आले आहे. या सुधारगृहात सध्या 268 मुले असून त्यातील 80 जणांना कोरोनाची लक्षणे आढळून आली. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी केली असता, त्यातील 29 गतीमंद मुलांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामधील बहुतांश व्यक्तींना कोरोनाची गंभीर लक्षणे नाहीत. मात्र, लागण झालेल्या मुलांमधील काहींना रक्तदाब, मधुमेह आणि क्षयरोगाचाही आजार असल्याचे समोर आले आहे. सध्या त्यांच्यावर सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात आणि बीकेसी च्या कोविड केंद्रात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांशी संपर्क साधून वैद्यकीय सल्ला घेण्यात आला असुन त्याचप्रमाणे कोरोनासह इतर आजार असलेल्या मुलांना तात्काळ रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या शेल्टर होममध्ये काम करणाऱ्या मुलांना कोरोनाची लागण कोणामुळे झाली? हे अद्याप कळू शकलेले नाही. 

मुंबईतल्या कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या किती?, जाणून घ्या

29 पैकी 3 मुलांवर सध्या उपचार सुरु आहेत. दुपारीच ही मुलं इथे दाखल झाले आहेत. तर, 26 जणांवर बीकेसीतील कोविड केंद्रात उपचार सुरू आहेत. तिघांना जास्त केअरची गरज आहे. म्हणून त्यांना इथे ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार करणं हे एक आव्हान असू शकते.

डॉ. रमेश भारमल, अधिष्ठाता, सायन रुग्णालय

 

गती मंद मुलां पैकी 24 मुले व 5 मुली तपासणी अंती करोना पॉझिटिव्ह झाले आहेत. या ठिकाणी एकूण 268 मुले आहेत. सर्व मुलांना विविध आजार असल्याने सर्वाना उपचारासाठी आणि संसर्ग वाढू नये यासाठी विलगिकरण कक्षात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तिघांना सायन येथील टिळक रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं आहेत तर इतरांना बिकेसी येथील  कोरोना सेंटर मधे हलवल जाणार असल्याची माहिती या विभागाचे मुख्य अधीक्षक विजय क्षीरसागर यांनी दिली आहे. वस्ती गृहात बंदी असताना करोनाचा संसर्ग झाला कसा याचा शोध सुरू आता पालिका आणि डॉक्टर घेत आहेत.

---------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 29 children in Mankhurds balsudhargruh start treatment for covid19