तीन कोटींची सुकी मासळी कचऱ्यात

प्रमाेद जाधव : सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

रायगड जिल्ह्यात तीन दिवसांपासून पडणाऱ्या परतीच्या पावसामुळे उन्हात वाळत ठेवलेली मासळी भिजली आहे.

अलिबाग : रायगड जिल्ह्यात तीन दिवसांपासून पडणाऱ्या परतीच्या पावसामुळे उन्हात वाळत ठेवलेली मासळी भिजली आहे. त्यामुळे त्यांचे तब्बल तीन कोटींचे नुकसान झाले आहे. या अचानक आलेल्या संकटामुळे मच्छीमार हवालदिल झाले आहेत. 

जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन आणि उरण या चार तालुक्‍यांमध्ये ४३ मासेमारी बंदरांच्या परिसरात सुक्‍या मासळीची केंद्रे आहेत. त्यांना परतीच्या पावसाचा तडाखा बसला असून वाळत ठेवलेली पापलेट, बोंबील, सुरमई, मांदेली, बांगडा आदी प्रकारची मासळी भिजली आहे. 

रायगड जिल्हा मच्छीमार संघाचे अध्यक्ष शेषनाथ कोळी यांनी सांगितले, की प्रत्येक दिवसाची ५०० रुपये मजुरी देऊन काही मच्छीमारांनी मासे सुकत घालण्याचे काम सुरू केले होते. त्याला परतीच्या पावसामुळे फटका बसला आहे. नवगाव, अलिबाग, थळ, चाळमळा, थेरोंडा, आग्राव, बोर्ली, कोर्लई आदी ठिकाणी भिजलेल्या मासळीला उग्र वास येत असल्याने ती टाकून देण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे चार तालुक्‍यांतील शेकडो मच्छीमारांचे सुमारे तीन कोटींचे नुकसान झाले आहे. 

वाळत ठेवलेली मासळी परतीच्या पावसात भिजली आहे. अलिबागमधील अनेक मच्छीमारांचे किमान ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सरकारने त्याची दखल घेऊन भरपाई द्यावी. 
- प्रभाकर पाटील, उपाध्यक्ष, मार्तंड मच्छीमार सहकारी सोसायटी, वरसोली 

मच्छीमारांनी सुकत ठेवलेली मासळी भिजली असेल, परंतु याबाबत अद्यापपर्यंत मच्छीमार सोसायटींकडून प्रस्ताव कार्यालयाला सादर झालेले नाहीत. सरकार अशा नुकसानीची भरपाई देत नाही. 
- अभयसिंह शिंदे, सहायक आयुक्त, मत्स्य व्यवसाय

परतीच्या पावसात फार मोठे नुकसान झाले आहे. सुकवलेली मासळी टाकून द्यावी लागली. त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने कसानभरपाई द्यावी. 
- धर्मा घारबट, मच्छीमार, वरसोली 

१५ टक्‍क्‍यांनी भाववाढ 
परतीच्या पावसात सुकवलेली मासळी खराब झाली. त्यात मोठ्या प्रमाणात मच्छीमारांचे नुकसान झाले आहे. मासळीची कमतरता निर्माण झाल्याने सुक्‍या मासळीचे दर 15 टक्‍क्‍यांनी वाढण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. 

दृष्टिक्षेप 
मच्छीमारांची संख्या : १,००,०००
नौका : २२००
सुक्‍या मासळीची वार्षिक उलाढाल - २०० कोटी 
परतीच्या पावसात झालेले नुकसान - ३ कोटी 
नुकसानीमुळे मासळीच्या भाववाढीची शक्‍यता - १५ टक्के 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 3 Crore Dry Fish in bin