दिलासादायक: राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांच्या तुलनेत घट

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 24 April 2020

  • आज राज्यात 394 नवीन रुग्णांचे निदान
  • तर 18 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू
  • राज्यातील एकूण रुग्ण 6817 करोना बाधित रुग्ण 
  • मृतांचा आकडा 300 पार

मुंबई : आज राज्यात 394 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या 6817 झाली आहे आज 117  रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण 957 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

आज राज्यात 18 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई  येथील 11, 5 पुणे येथे तर 2 मृत्यू मालेगाव येथे झाले आहेत. आज झालेल्या मृत्यूंपैकी 12 पुरुष तर 6 महिला आहेत. आज झालेल्या 18 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 9  रुग्ण आहेत तर 6 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत तर 3 रुग्ण 40 वर्षांखालील आहे. या 18 मृत्यूंपैकी 12 रुग्णांमध्ये ( 67 %)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड 19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 301 झाली आहे. 

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सध्या राज्यातील कोविड19 आजाराचा मृत्यूदर हा 4.4 टक्के आहे. राज्यातील 269 मृत्यूंचे वयोगटानुसार विश्लेषण केले असता 50 वर्षांखालील व्यक्तींचा मृत्यूदर हा कमी आढळून येतो, विशेषतः 21 ते 30 वर्षे वयोगटात मृत्यूदर 0.64 % इतका आहे तर त्यापुढील वयोगटात मृत्यूदर वाढताना दिसून येतो.  61 ते 70 या वयोगटात मृत्यूदर सर्वाधिक म्हणजे 17.78 % एवढा आहे . यामुळे 50 वर्षांवरील आणि इतर अतिजोखमीचे आजार असणा-या व्यक्तीमध्ये कोविड19 आजारामुळे गुंतागुंत होण्याची शक्यता अधिक असल्याचे अधोरेखित झाले आहे. 

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या  102189 नमुन्यांपैकी 94,485 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर  6817 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 512 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 7702  सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी 28.88 लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.  

  अधिक आणि सविस्तर बातम्या वाचण्यासाठी ईपेपर वाच

आजपर्यंत राज्यातून 957  रुग्णांना ते बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 1,19,161 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 8,814 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 394 new patients were registered in the maharashtra. This brings the number of corona affected patients in the state to 6817