मातोश्रीवरुन 'त्या' चार नगरसेवकांची झाडाझडती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्ष तोडीला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कडा विरोध केल्यानंतर शिवसेनेने 3 वेळा या प्रस्तावाला विरोध केला होता.

मुंबई : वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत शिवसेनेचे चार नगरसेवक उशिरा पोहोचल्याने भाजपने मेट्रो कारशेडसाठीचा वृक्ष तोडीचा प्रस्ताव मंजूर करून घेतला. बैठकीला उशिरा पोहोचणं शिवसेना नगरसेवकांच्या अंगलट आलं असून 'त्या' चारही नगरसेवकांची उद्धव ठाकरे यांनी चांगलीच कानउघडणी केल्याचे समजते आहे. इतकंच नाही, तर या नगरसेवकांना लेखी उत्तर घेऊन हजर राहण्याचे आदेश ही 'मातोश्री'वरून देण्यात आले आहेत.

सुवर्णा करंजे, प्रिती पाटणकर, रिद्धी खुरसुंगे आणि उमेश माने यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या रोषाला सामोरं जावं लागतं आहे. मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्ष तोडीला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कडा विरोध केल्यानंतर शिवसेनेने 3 वेळा या प्रस्तावाला विरोध केला होता. मात्र, गुरुवारी (ता.29) झालेल्या बैठकीत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांना हाताशी धरून वृक्षतोडीचा प्रस्ताव मंजूर करून घेतला.

महत्वाचं म्हणजे शिवसेनेचे चार नगरसेवक बैठकीला 40 मिनिटे उशिरा पोहोचले. बैठकीला भाजप, काँग्रेसचे सदस्य उपस्थितीत राहिल्याने कोरम पूर्ण झाल्यानंतर महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी बैठक सुरू करून प्रस्ताव मंजूर केला. यामुळे उद्धव ठाकरे चांगलेच खवळल्याची माहिती मिळत आहे.

मेट्रो कारशेडसाठी आरे मधील 2700 वृक्ष तोडावी लागणार आहेत. या वृक्ष तोडीला मुंबईकरांनी जोरदार विरोध केला आहे. आदित्य ठाकरे यांनीही वृक्ष तोडीला विरोध करत मुंबईकरांना पाठिंबा दिला होता. असं असतांनादेखील पालिकेत सत्तेत असणाऱ्या शिवसेनेच्या नाकावर टिच्चून प्रस्ताव मंजूर करून घेण्यात आला. यामुळे मुंबईकर चांगलेच खवळले असून येत्या विधानसभा निवडणुकीत याची भारी किंमत शिवसेनेला चुकवावी लागू शकते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 4 Councilors have to face the wrath of Shiv Sena chief Uddhav Thackeray