'माझे कुटुंब...' मोहिमेतून ठाणे जिल्ह्यात आढळले 418 कोरोना रुग्ण 

राहुल क्षीरसागर
Tuesday, 20 October 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रित करून नागरिकांना आरोग्य शिक्षण देणे, त्यांचे आरोग्य सर्वेक्षण करून संदर्भ सेवा पुरवणे या मुख्य उद्देशाने ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांत पहिल्या टप्प्यात नऊ हजार 916 जणांना "सारी' तापाची लक्षणे आढळून आली. या रुग्णांची कोव्हिड तपासणी केली असता त्यापैकी 418 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे यांनी दिली. 

ठाणे : कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रित करून नागरिकांना आरोग्य शिक्षण देणे, त्यांचे आरोग्य सर्वेक्षण करून संदर्भ सेवा पुरवणे या मुख्य उद्देशाने ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांत पहिल्या टप्प्यात नऊ हजार 916 जणांना "सारी' तापाची लक्षणे आढळून आली. या रुग्णांची कोव्हिड तपासणी केली असता त्यापैकी 418 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे यांनी दिली. 

क्लिक करा : कांदा रडवतोय; किरकोळ बाजारीतल भाव 100 रुपये

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही मोहीम संपूर्ण राज्यात राबवली जात आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, भिवंडी, कल्याण आणि अंबरनाथ या पाच तालुक्‍यांतील ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात आरोग्य विभागाच्या वतीने या मोहिमेची अंमलबजावणी होत आहे.

या मोहिमेचा पहिला टप्पा 15 सप्टेंबर ते 10 ऑक्‍टोबर या कालावधीत पूर्ण करण्यात आला. या कालावधीत जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या पथकामार्फत घरातील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करण्यात आली. यासाठी 738 पथके नेमण्यात आली होती. आरोग्य पथकांमार्फत या मोहिमेअंतर्गत 20 लाख 58 हजार 775 नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये नऊ हजार 916 जणांना सर्दी आणि तापाची लक्षणे आढळून आली.

क्लिक करा : महिलांच्या लोकल प्रवासाबाबत काँग्रेस-भाजपमध्ये खडाखडी

लक्षणे आढळून आलेल्यांपैकी एक हजार 621 नागरिकांची तात्काळ कोव्हिड चाचणी करण्यात आली. त्यामध्ये 418 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. या सर्व बाधितांना तात्काळ रुग्णालयात अथवा कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आल्याची माहिती डॉ. रेंघे यांनी दिली. 

माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहीम जिल्हाभर राबवण्यात येत आहे. कोरोनाचे निदान झालेल्या नागरिकांना योग्य वैद्यकीय उपचार देऊन त्यांच्यापासून होणारा प्रादुर्भावाचा धोका टाळण्यास मदत होत आहे. 
- डॉ. रूपाली सातपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद, ठाणे. 

 

--------------------------
(संपादन : प्रणित पवार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 418 corona patients found in Thane district under 'My family my responsibility' campaign