लग्नाच्या आणाभाका करत आला अन भलतच करुन गेला

सकाळ वृत्तसेवा
Monday, 23 December 2019

लग्न जुळवण्याच्या वेबसाईटवर स्वत:साठी वर शोधण्याच्या प्रयत्नात असलेल्या खारघर येथील एका ५५ वर्षीय महिलेला अज्ञात टोळीने तब्बल ४२ लाख नऊ हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

नवी मुंबई : लग्न जुळवण्याच्या वेबसाईटवर स्वत:साठी वर शोधण्याच्या प्रयत्नात असलेल्या खारघर येथील एका ५५ वर्षीय महिलेला अज्ञात टोळीने तब्बल ४२ लाख नऊ हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खारघर पोलिसांनी या टोळीविरोधात फसवणूक व आयटी ॲक्‍टनुसार गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

या प्रकरणातील ५५ वर्षीय तक्रारदार महिला खारघरमध्ये राहावयास असून तिचा पती कामानिमित्त परदेशात राहावयास आहे; तर मुलगी शिक्षणासाठी हैदराबाद येथे राहत आहे. या महिलेचा पती तिच्याकडे लक्ष देत नव्हता, त्यामुळे महिलेने दुसरे लग्न करण्याचा विचार करून सप्टेंबर महिन्यात मेट्रीमोनी वेबसाईटवर स्वत:चे प्रोफाईल बनवले होते.

ही बातमी वाचा ः मूड इंडीगो मध्ये 230 कार्यक्रमांची मेजवानी
 त्यानंतर १५ दिवसांत शौकत अली (५५) नावाच्या व्यक्तीची वेबसाईटवरून आलेल्या रिक्वेस्टनुसार तिने निवड केली. दरम्यान, ऑक्‍टोबर २०१९ मध्ये शौकत अली याने या महिलेला संपर्क साधून त्याच्या आईला हार्ट ॲटॅक आल्याचे कारण सांगत तिला आईच्या उपचारासाठी पैसे पाठवण्यास सांगितले. त्यानुसार महिलेने शौकत अली याने महिलेला ज्या व्यक्तीचा खाते नंबर दिला होता त्या बॅंक खात्यात प्रथम २० हजार व नंतर ३० हजार रुपये मनी ट्रान्झॅक्‍शनच्या माध्यमातून ऑनलाईन पाठवून दिले.

अशी उकळली रक्कम...
शौकत अली याने त्याचे जहाज फिनलॅंड येथे आल्याचे तसेच जहाजात चोरी होत असल्याने त्याच्याकडील पैसे, सोने व इतर सर्व साहित्य तो खारघर येथील तिच्या पत्त्यावर पाठवत असल्याचे सांगून तिला कुरियर केलेली स्लीप पाठवून दिली. त्यानंतर काही दिवसांतच त्याने या महिलेला संपर्क साधून त्याने पाठवलेले कुरियर दिल्लीत कस्टम ऑफिसमध्ये अडकले असून त्यासाठी काही पैसे भरावे लागतील असे तिला सांगितले. त्यानुसार या महिलेला दिल्लीतून २८ नोव्हेंबर रोजी एका व्यक्तीने संपर्क साधून महिलेकडून तब्बल ४२ लाख नऊ हजार रुपये उकळले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे या महिलेच्या लक्षात आले. त्यामुळे तिने खारघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 42 lakh fraud to woman seeking bride