स्टॉक ब्रोकिग कंपनीकडून गुंतवणूकदारांची 450 कोटींची फसवणूक; संचालकाला पोलिस कोठडी

अनिश पाटील
Saturday, 16 January 2021

चारशेहून अधिक गुंतवणूकदारांची 450 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी स्टॉक ब्रोकिंग कंपनीच्या संचालकाला अटक केली

मुंबई - चारशेहून अधिक गुंतवणूकदारांची 450 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी स्टॉक ब्रोकिंग कंपनीच्या संचालकाला अटक केली. आरोपीला न्यायालयाने 21 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

परेश करिया असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून ते अनुग्रह स्टॉकचे संचालकल आहेत. एका जाहिरात कंपनीचे संचालक आशुतोष शहा यांच्या तक्रारीवरून सप्टेंबर 2020 मध्ये याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. विश्वासघात केल्याप्रकरणी सर्वप्रथम जुहू पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण गुन्ह्यात फसवणूक झालेली रक्कम 450 कोटींच्यावर गेल्यामुळे प्रकरण पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले होते. आरोपीशी संबंधीत अनेक ठिकाणांवरही पोलिसांनी याप्रकरणी शोध मोहिम राबवली होती. या कंपनीचे 30 हजार ग्राहक असून त्यातील सुमारे 40 ग्राहकांनी आतापर्यंत तक्रार केली आहे. त्यात शेअर्समध्ये नुकसान झाल्यामुळे आरोपीने रक्कम देण्यास नकार दिल्याचे सांगितले. त्याशिवाय आरोपीने सेबीच्या नियमावलीचाही भंग केला आहे. चौकशीत आरोपीने आपल्या कंपनीला 600 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले.कोरोना काळात शेअर मार्केट मोठ्या प्रमाणात कोसळले. त्यात त्याला हे नुकसान झाले. त्याची काही गुंतवणूक फंड नसल्यामुळे विकल्या गेल्या. याप्रकरणी आणखी दोघांविरोधातही गुन्हा दाखल आहे. पण अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही. याप्रकरणातील महत्त्वाची माहिती आरोपीकडून घेण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी सेबीशीही संपर्क साधण्यात येणार असल्याचेही अधिका-याने सांगितले. आरोपीला न्यायालाने सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

450 crore fraud by investors from stock broking company Director to police custody
 

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 450 crore fraud by investors from stock broking company Director to police custody