40 ते 45 फूट तारळी नदीत मिनीबस कोसळून ५ जण ठार; नवी मुंबईतील नायर कुटूंबियांवर काळाचा घाला

40 ते 45 फूट तारळी नदीत मिनीबस कोसळून ५ जण ठार; नवी मुंबईतील नायर कुटूंबियांवर काळाचा घाला

नवी मुंबई : दिवाळी निमित्त गोवा येथे कौटुंबिक सहल घेऊन जाणाऱ्या नवी मुंबईतील नायर कुटुंबियांची मिनी बस सातारा जिल्ह्यातील तारळी नदीवरील पुलावरून 40 ते 45 फूट खोल नदीत कोसळल्यामुळे झालेल्या अपघातात बस मधील ५ जण ठार तर ८ जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी पहाटे ४. ३० वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातातील जखमीना सातारा येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.या अपघातात मृत झालेल्यामध्ये एकाच कुटुंबातील मधुसुदन गोविंदन नायर (४२) उषा मधुसुदन  नायर (४०),

आदित्य मधुसुदन नायरं (२३) या तिघासह कोपरखैरणे सेक्टर-४ मधील साजन एस.नायर (३५),आरव साजन नायर (३वर्षे) या पाच जणांचा समावेश आहे. तर जखमीमध्ये चालक रिंकू साहू  (३०), मोहन बेलायदन  (५९),  दिव्या मोहन (३० वर्षे), सिजिश शिवदासन (२८), दिपा नायर (३२), दीप्ती  मोहन (२८), लिला मोहन (३५) आणि अर्चना नायर (१५वर्षे ) या आठ  जणांचा समावेश आहे. यातील नायर कुटुंबीय वाशी सेक्टर-१६ मध्ये तर इतर कोपरखैरणे सेक्टर-४ मध्ये राहण्यास आहेत. मूळचे केरळ राज्यातील असलेले हे दोन्ही कुटुंब नवी मुंबईत स्थायिक आहेत. 

दिवाळीची सुट्टी असल्याने नायर कुटुंबीयांनी गोवा येथे कौटुंबिक सहल काढली होती, त्यासाठी त्यांनी मिनी बस देखील केली होती. शनिवारी रात्री या दोन्ही कुटुंबातील सदस्य लहान मुलांसह गोवा येथे जाण्यासाठी निघाले होते. पहाटे ४. ३० वाजण्याच्या सुमारास त्यांची बस  सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातील तारळ नदीवरील पुलावर आली असताना, बस चालकाला डुलकी लागल्याने चालकाचे बस वरील नियंत्रण सुटले.  त्यामुळे सदर बस नदीमध्ये 40 ते 45 फूट खोल नदीत कोसळली. त्यामुळे बसमधील ५ जण जागीच ठार तर ८ जण जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच उंब्रज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, या अपघातातील मृत व जखमींना बाहेर काढले, त्यानंतर सर्वांना सातारा येथील रुग्णालयात दाखल केले. हा अपघातात बस चालकाच्या निष्काळजी पणामुळे झाल्याचे आढळून आल्याने उंब्रज पोलिसांनी बस चालक रिंकू साहू याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या अपघातामुळे नायर कुटुंबीय राहत असलेल्या वाशी सेक्टर-16 मध्ये शोककळा पसरली आहे.

5 killed 8 injured as minibus crashes into 40 to 45 feet Tarli river, Nair families in Navi Mumbai

--------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com