esakal | कोरोना धोक्याची पातळी ओलांडतोय; 0 ते 10 वयोगटातील 51 हजार मुले कोरोनाबाधित
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना धोक्याची पातळी ओलांडतोय; 0 ते 10 वयोगटातील 51 हजार मुले कोरोनाबाधित
  • राज्यात 51 हजार मुलांना कोरोना 
  • शून्य ते दहा वयोगट; मृत्युदर कमी असल्याने दिलासा 

कोरोना धोक्याची पातळी ओलांडतोय; 0 ते 10 वयोगटातील 51 हजार मुले कोरोनाबाधित

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना राज्यातील लहान मुले कोरोनाबाधित होण्याचे प्रमाणही वाढले आहे. राज्यात कोरोनाबाधित होण्याची संख्या 14 लाख 30 हजार 861 एवढी आहे. त्यातील 2 लाख 58 हजार 108 एवढे सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत 37 हजार 758 एवढे मृत्यू झाले आहेत; मात्र या आकडेवारीनुसार अजून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यातील कोरोनाबाधित लहान मुलांनी 50 हजारांचा टप्पा पार केला आहे. राज्यातील 51 हजार 993 लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. शून्य ते 10 वयोगटातील मुलांचे कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण 3.71 टक्के एवढे आहे. 

दीपिकाची चौकशी करणाऱ्या NCBच्या अधिकाऱ्याला कोरोनाची लागण

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग सार्वजनिक आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या अहवालानुसार राज्यातील 51 हजार 993 लहान मुले-मुली कोरोनाबाधित झाली आहेत. लहान मुलांचे कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण जरी वाढत असले तरी त्यांचा मृत्युदर तुलनेने कमी आहे. त्यामुळे ही एक दिलासादायक बाब असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग होण्यामागे त्यांच्या कुटुंबीयांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे सहा वर्षांवरील मुलांनी मास्कचा वापर करावा, असे मत तज्ज्ञ डॉक्‍टरांनी व्यक्त केले. 

वयोगट लागण (आतापर्यंत) 
11 ते 20- 97 हजार 606 
21 ते 30- 2 लाख 40 हजार 767 
31 ते 40- 3 लाख 2 हजार 532 
41 ते 50- 2 लाख 53 हजार 792 

दोन लाखावर ज्येष्ठ नागरिक बाधित 
ज्येष्ठ नागरिकांनी दोन लाखांचा टप्पा पार केला आहे. 51 ते 60 वयोगटातील 2 लाख 26 हजार 58 रुग्ण सापडले आहेत. एकूण रुग्णसंख्येमध्ये हे प्रमाण 15.95 टक्के आहे. 61 ते 70 या वयोगटातील 1 लाख 50 हजार 747 रुग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. 71 ते 80 वयोगटातील 71 हजार 125 रुग्ण कोरोनाग्रस्त आहेत. 

पालकांनी काय करावे? 
मुलांनी हात चांगले धुतले की नाही पाहावे. त्यांना साबण, कोमट पाणी आणि अल्कोहोलयुक्त हॅंड सॅनिटायझरने हात स्वच्छ करायला सांगावे. तोंडाला मास्क लावावा. चांगल्या मास्कचा वापर करावा. घरातून निघण्यापूर्वी मास्क लावूनच निघावे. आपल्या बोटांनी डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करू नये. प्राण्यांपासून लांब राहणे, मिठाचे सेवन करणे टाळावे. बाहेरचे खाद्यपदार्थ घेणे टाळावे. शिंकताना, खोकताना तोंडावर रुमालाचा वापर करणे. भरपूर विश्रांती घेणे. भरपूर पेय घेणे. 

--------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top