सहा वर्षाच्या मुलाला पोलिसांनी केले इन्स्पेक्टर 

विकास काटे
शनिवार, 24 मार्च 2018

आशिषला पोलिस होण्याची प्रचंड इच्छा आहे. उपचार सुरू असतानाच त्याने डॉक्टरांकडे ही इच्छा व्यक्त केली. मग डॉक्टरांनी ही बाब 'माय विष फाउंडेशन' या संस्थेच्या कानावर घातली. 

मुंबई : मुंबई पोलिसांच्या मुलुंड ठाण्यातील पोलिसांनी सहा वर्षीय आशिष मंडल या लहानग्याची पोलिस होण्याची इच्छा पूर्ण केली. दिवसरात्र नागरिकांचे रक्षण करण्याबरोबरच पोलिस आपले सामाजिक भानही जपतात हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले.

आशिष हा मूळचा बिहारमधील कटीहरा या गावचा रहिवासी. त्याला एका दुर्धर आजाराने ग्रासले आहे. या आजारावर गावाकडे उपचार शक्य नाहीत, त्यामुळे त्याच्या आई-वडीलांनी त्याला उपचारासाठी मुंबईतील टाटा हॉस्पिटल येथे आणले. आशिषला पोलिस होण्याची प्रचंड इच्छा आहे. उपचार सुरू असतानाच त्याने डॉक्टरांकडे ही इच्छा व्यक्त केली. मग डॉक्टरांनी ही बाब 'माय विष फाउंडेशन' या संस्थेच्या कानावर घातली. 

माय विष फाउंडेशनने मुलुंड पोलिसांच्या मदतीने आशिषची ही इ्च्छा पूर्ण करायचे ठरवले. त्याप्रमाणे आशिषला एका दिवसासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या खुर्चीत बसवण्यात आले. यामुळे पोलिसांचा दिलदारपणा समोर आलेला आहे. यामुळे आशिषच्याही चेहऱ्यावर एक दिवसासाठी का होईना समाधानाचे हास्य फुलले. माय विष फाउंडेशनने ही संस्था अशा अनेक लोकांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात. पोलिसांनी यासाठी परवानगी दिल्यामुळे माय विष फाउंडेशनने त्यांचे आभार मानले आहेत.

आपल्या मुलाची इच्छा पूर्ण झाल्याने आशिषचे आई-वडील देखील हरखून गेले होते. रोज आजाराने लढणाऱ्या आपल्या मुलाच्या अंगावरील खाकी वर्दी आणि चेहऱ्यावरील हसु पाहून त्यांनी ही मुलुंड पोलीस ठाण्याचे आभार मानले, अशी भावने माय विष फाउंडेशनच्या कार्यकर्त्या दिव्या कोटक यांनी व्यक्त केली. नेहमीच कायदा सुव्यसथा राखण्यात मग्न असलेल्या आणि त्यासाठी प्रसंगी कठोर ही होणाऱ्या मुंबई पोलिसांच्या हळव्या कार्यांचे कौतुक करावे तितके थोडे आहे, असे मत आशिषचे वडील बबलू मंडल यांनी व्यक्त केले. 

Web Title: 6 years old boy became inspector for one day